राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा कोलवड येथून शुभारंभ; जिल्ह्यात २ लाख ३० हजार बालकांना पोलिओचे दोन थेंब देण्याचे उद्दिष्ट
बुलढाणा,
दि. 30 (जिमाका): पोलिओमुक्त भारताचा दर्जा कायम राखण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय
पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ रविवारी प्राथमिक आरोग्य केंद्र हतेडी
अंतर्गत उपकेंद्र कोलवड येथे उत्साहात झाला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी
गुलाब खरात यांच्या हस्ते पाच वर्षांखालील बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब
पाजून मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रणजीत मंडाले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र सरपाते,
वैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण जवंजाळ, डीईएमओ राजेश धुताडमल, समुदाय आरोग्य अधिकारी, गावाच्या
सरपंच सौ. मीराताई पवार, उपसरपंच चंद्रभागाताई पाटील, आशा स्वयंसेविका, आरोग्य कर्मचारी
तसेच लाभार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राष्ट्रीय
पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील ० ते ५ वर्षे वयोगटातील २ लाख
३० हजार ४०१ बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात
आले आहे. यासाठी जिल्हाभरात २ हजार ६९ लसीकरण बूथ उभारण्यात आले असून मोहिमेच्या प्रभावी
अंमलबजावणीसाठी आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी, आशा स्वयंसेविका आणि स्वयंसेवक
कार्यरत आहेत.
यावेळी
मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात यांनी पालकांना आवाहन करताना सांगितले की, पाच
वर्षांखालील प्रत्येक बालकाला पोलिओचे दोन थेंब पाजणे ही पालकांची जबाबदारी असून कोणतेही
बालक लसीकरणापासून वंचित राहू नये, यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. उपस्थित मान्यवरांनीही
पालकांनी आपल्या बालकांना पोलिओचे दोन थेंब पाजून राष्ट्रीय मोहिमेला यशस्वी करण्याचे
आवाहन केले.
00000






Comments
Post a Comment