महाडीबीटीवरून कापूस उत्पादकता अभियानासाठी अर्ज प्रक्रिया सुरू

 


बुलढाणा, दि. 9  (जिमाका): केंद्र शासनाच्या नव्या कापूस उत्पादकता अभियान(कपास क्रांती - MCP) योजनेला सन २०२६-२७ पासून पुढील पाच वर्षांसाठी मान्यता देण्यात आली असून, या अभियानांतर्गत देशात १२५ लाख गाठी कापूस उत्पादन आणि प्रतिहेक्टर ५५० किलो लिंट उत्पादकता साध्य करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

या अभियानाअंतर्गत शेतकऱ्यांसाठी विविध घटक राबविण्यात येणार आहेत. यामध्ये सघन कापूस लागवड (HDPS), क्लोज स्पेसिंग (CS), एकात्मिक पीक उत्पादन (ICM) प्रात्यक्षिके, बायोचार युनिट तसेच कॉटन श्रेडर या बाबींचा समावेश आहे.

सन २०२६-२७ साठी या योजनेअंतर्गत लाभ घेऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महा-डीबीटी प्रणालीद्वारे ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पीक प्रात्यक्षिके, बायोचार युनिट आणि कॉटन श्रेडर या घटकांचा लाभ घेण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करून शासनाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे यांनी केले आहे. या योजनेमुळे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, उत्पादन खर्चात बचत आणि कापूस उत्पादकतेत वाढ होण्यास मदत होणार असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.

0000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

दत्तक विधान प्रक्रिया; इच्छुक पालकांनी कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करावी