बुलढाण्यात अवैध प्रवासी वाहतुकीवर कारवाई; 4 लाख 26 हजारांचा दंड

 


बुलढाणा,दि.17 (जिमाका) : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) प्रवासी सुरक्षेला प्राधान्य देत आणि शासकीय महसुलातील गळती रोखण्यासाठी जिल्ह्यात अवैध प्रवासी वाहतुकी विरोधात संयुक्त मोहीम राबविण्यात आली. अवैधरित्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या तब्बल 306 वाहनांवर कारवाई करत 4 लाख 26 हजार 500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे, अशी माहिती बुलढाणा विभागाचे सुरक्षा व दक्षता अधिकारी जयंत कांडलकर यांनी दिली.

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानुसार आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या निर्देशानुसार 5 जून ते 15 जून 2026 या कालावधीत ही विशेष मोहीम राज्यभर राबविण्यात आली. सदर मोहिम जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासन, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) आणि एसटी महामंडळाच्या सुरक्षा व दक्षता पथकाने संयुक्त कारवाईचा धडाका लावला. बसस्थानकांच्या 200 मीटर परिसरात अवैधरित्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या तब्बल 306 वाहनांवर कारवाई करण्यात आली असून पोलीस विभागाकडून 2 लाख 8 हजार 500 रुपये तर आरटीओ विभागाकडून 2 कोटी 18 हजार असे एकूण 4 लाख 26 हजार 500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

या मोहिमेत इको, क्रुझर, मॅजिक, मॅक्झिमो, ट्रॅव्हल्स आदी वाहनांवर कारवाई करण्यात आली. मोटार वाहन कायद्यातील कलम 122/177 (नो-पार्किंग व वाहतूक अडथळा), कलम 179 (शासकीय आदेशाचे उल्लंघन) तसेच कलम 66/192(अ) (विनापरवाना प्रवासी वाहतूक) अंतर्गत दंडात्मक कारवाई करण्यात आली.

या संयुक्त मोहिमेचा सकारात्मक परिणाम एसटी महामंडळाच्या उत्पन्नावर दिसून आला आहे. अवैध वाहतुकीला आळा बसल्याने प्रवाशांनी पुन्हा एसटीला पसंती दिली असून बुलढाणा विभागाच्या महसुलात तब्बल 73 लाख 94 हजार 473 रुपयांची वाढ नोंदविण्यात आली आहे. तसेच 1 लाख 17 हजार 970 हून अधिक प्रवाशांची वाढ झाल्याची माहिती प्रशासनाने दिली.

 

यापूर्वी बसस्थानकांच्या प्रवेशद्वारांवर व परिसरात अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने व एजंटांचा मोठा वावर असल्याने वाहतूक कोंडी, अपघाताचा धोका आणि महिला प्रवाशांची गैरसोय होत होती. मात्र या मोहिमेनंतर बुलढाणा, खामगाव, चिखली, शेगाव, मलकापूर, मेहकर आणि जळगाव जामोद येथील प्रमुख बसस्थानके अतिक्रमणमुक्त व मोकळी झाल्याचे प्रशासनाने सांगितले. महिला प्रवाशांनीही या कारवाईचे स्वागत केले असून अवैध प्रवासी वाहनांच्या तुलनेत एसटी बसमधील प्रवास अधिक सुरक्षित असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

बुलढाणा व खामगाव येथील आरटीओ अधिकारी, पोलीस निरीक्षक आणि एसटी सुरक्षा व दक्षता पथकाच्या संयुक्त प्रयत्नातून ही मोहीम यशस्वी झाली. प्रशासनाने स्पष्ट इशारा दिला आहे की, यापुढे बसस्थानकांच्या 200 मीटर परिसरात नियमभंग करताना आढळणाऱ्या वाहनांचे परवाने, परमिट आणि चालकांचे ड्रायव्हिंग लायसन्स किमान तीन महिन्यांसाठी निलंबित करण्यात येतील.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

दत्तक विधान प्रक्रिया; इच्छुक पालकांनी कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करावी