एकल महिलांच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासन खंबीर; ३० जून रोजी जिल्हास्तरीय चर्चासत्राचे आयोजन

 



 

बुलढाणा,दि.24(जिमाका) :  जागतिक एकल महिला दिनानिमित्त जिल्हा महिला व बाल विकास विभाग, कृषी समृद्धी मल्टिपर्पज फाउंडेशन आणि आस्था संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने २३ जून रोजी 'सखी निवास' येथे एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बोलताना जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अमोल डिघुळे यांनी संकटांशी दोन हात करत कुटुंबाचा गाडा हाकणाऱ्या एकल महिलांच्या पाठीशी जिल्हा प्रशासन खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही दिली.

शासन स्तरावर सध्या एकल महिलांसाठी सर्वसमावेशक धोरण तयार केले जात असून या धोरणात कोणत्या घटकांचा समावेश असावा, याबाबत एकल महिलांनी आपल्या लेखी सूचना प्रशासनाकडे सादर कराव्यात, असे आवाहन अमोल डिघुळे यांनी केले. या धोरणाच्या पार्श्वभूमीवर आगामी ३० जून रोजी जिल्हा परिषद बुलढाणा येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात 'जिल्हास्तरीय चर्चासत्राचे' आयोजन करण्यात आले असून या चर्चासत्रात जिल्ह्यातील एकल महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपली स्पष्ट मते मांडावीत, असे आवाहनही त्यांनी पुढे बोलताना केले.

महात्मा ज्योतिराव फुले यांच्या २०० व्या जयंती महोत्सवाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाने हे एकल महिला धोरण निश्चित करण्यासाठी पुढाकार घेतला असून महिलांनी स्वतः पुढे येऊन आपले प्रश्न मांडणे गरजेचे असल्याचे मत मिशन वात्सल्य समितीच्या सदस्या आशा सिरसाट यांनी व्यक्त केले. तसेच एकल महिलांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊन स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राच्या विविध योजनांचा व कर्जाचा लाभ घ्यावा, बँकांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रशासन पूर्ण सहकार्य करेल, असा विश्वास मिटकॉनचे जिल्हा समन्वयक कैलास खराटे यांनी दिला. या प्रसंगी जिल्हा परिविक्षा अधिकारी सुरेषा पवार, रामेश्वर वसू व महेंद्र सौभागे यांनीही उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले.

0000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

दत्तक विधान प्रक्रिया; इच्छुक पालकांनी कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करावी