प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानांतर्गत जिल्हाभर विशेष आरोग्य शिबिरे; १ हजार ६०२ गरोदर मातांची तपासणी
बुलढाणा,दि.10 (जिमाका) : प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान
(PMSMA) अंतर्गत जिल्हाभर विशेष आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले. आरोग्य शिबिरांमध्ये
एकूण १ हजार ६०२ गरोदर मातांची तपासणी करुन त्यांना आवश्यक उपचार, समुपदेशन व आरोग्यविषयक
मार्गदर्शन करण्यात आले.
जिल्हा आरोग्य
अधिकारी डॉ. अमोल गिते व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली
प्राथमिक आरोग्य केंद्र हतेडी येथे जिल्हास्तरीय विशेष आरोग्य शिबिर उत्साहात पार पडले.
शिबिराचे उद्घाटन जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. मिलिंद जाधव तथा तालुका आरोग्य
अधिकारी डॉ. महेंद्र सरपाते यांच्या हस्ते झाले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण
जंवजाळ तसेच जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी राजेश धुतडमल उपस्थित होते.
प्रधानमंत्री
सुरक्षित मातृत्व अभियानांतर्गत जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थांमध्ये विशेष शिबिरांचे
आयोजन करण्यात आले. शिबिरात कार्यक्षेत्रातील तसेच कार्यक्षेत्राबाहेरील गरोदर मातांची
स्त्रीरोग तज्ज्ञांच्या उपस्थितीत सखोल आरोग्य तपासणी करण्यात आली. जोखीमग्रस्त (हाय
रिस्क) गर्भवती महिलांची विशेष तपासणी करून त्यांना आवश्यक उपचार, समुपदेशन व आरोग्यविषयक
मार्गदर्शन देण्यात आले.
यावेळी प्रधानमंत्री
जन आरोग्य योजना (आयुष्मान भारत) अंतर्गत ई-केवायसी शिबिराचेही आयोजन करण्यात आले.
पात्र लाभार्थ्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करून त्यांना आयुष्मान भारत कार्डांचे
वितरण करण्यात आले. शिबिरादरम्यान सर्व एएनसी मातांची हिमोग्लोबिन, रक्तातील साखर,
एचआयव्ही, रक्तदाब, वजन तसेच सोनोग्राफीसह विविध आवश्यक वैद्यकीय तपासण्या करण्यात
आल्या. गर्भधारणेदरम्यान घ्यावयाची काळजी, संतुलित व पोषक आहाराचे महत्त्व आणि नियमित
आरोग्य तपासणीची आवश्यकता याबाबत गरोदर महिलांचे समुपदेशन करण्यात आले.
प्रधानमंत्री
सुरक्षित मातृत्व अभियानाला दहा वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर देशभरात
"PMSMA ची दहा वर्षे, सुरक्षित गर्भधारणा, निरोगी माता, सक्षम भारत" या संकल्पनेवर
आधारित विशेष उपक्रम राबविण्यात येत आहेत.
जिल्ह्यात आयोजित
विशेष आरोग्य शिबिरांमध्ये एकूण १ हजार ६०२ गरोदर मातांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी
३९४ माता जोखीमग्रस्त आढळून आल्या असून त्यांना विशेष वैद्यकीय सेवा व समुपदेशन देण्यात
आले. तसेच २४० मातांची सोनोग्राफी तपासणी करण्यात आली. अधिक उपचारांची आवश्यकता असलेल्या
२१६ मातांना उच्चस्तरीय आरोग्य संस्थांकडे संदर्भित करण्यात आले.
सुरक्षित मातृत्व
व माता-बाल आरोग्य संवर्धनासाठी अशा उपक्रमांचे विशेष महत्त्व असल्याचे मान्यवरांनी
सांगितले. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र हतेडी तसेच जिल्ह्यातील
सर्व आरोग्य संस्थांमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.
Comments
Post a Comment