जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत मंजूर विकास कामांच्या गुणवत्तेवर भर द्या तसेच iPAS प्रणालीचा 100 टक्के वापर करावा - पालकमंत्री मकरंद जाधव पाटील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत विविध योजनांचा आढावा
बुलढाणा,
दि. 22 (जिमाका): राज्याचे मदत
व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद जाधव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली
आज जिल्हाधिकारी कार्यालयातील जिजाऊ सभागृह येथे जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित
करण्यात आली. पालकमंत्री दृकश्राव्य माध्यमातून बैठकीला मार्गदर्शन करत होते. यावेळी
राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री तथा सहपालकमंत्री संजय सावकारे, केंद्रीय आयुष राज्यमंत्री
प्रतापराव जाधव, कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर, आमदार किरण सरनाईक, चैनसुख संचेती,
संजय गायकवाड, श्वेता महाले, सिद्धार्थ खरात, मनोज कायंदे हे दृकश्राव्य माध्यमातून
सहभागी झाले होते.
बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण कुमार देवरे, जिल्हा
परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात, पोलीस अधीक्षक निलेश तांबे, उपवनसंरक्षक
जमीर शेख, जिल्हा नियोजन अधिकारी राहुल पवार, निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश कव्हळे यांच्यासह
विविध विभागांचे कार्यालय प्रमुख उपस्थित होते.
यावेळी जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन
2026-27 चा आढावा घेण्यात आला. या योजनेअंतर्गत जिल्ह्यासाठी 533 कोटी रुपयांचा मंजूर
नियतव्यय असून शासनाकडून 60 टक्के निधी प्राप्त झाला असल्याची माहिती बैठकीत देण्यात
आली.
सर्वसाधारण योजनेतील गाभा क्षेत्रासाठी 357.28 कोटी
रुपयांची तरतूद करण्यात आली असून त्यापैकी 214.37 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला
आहे. सामाजिक व सामूहिक सेवेसाठी 209.51 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. याशिवाय
कृषी व संलग्न सेवा क्षेत्रासाठी 53.35 कोटी, ग्रामीण विकासासाठी 27.20 कोटी, पाटबंधारे
व पूरनियंत्रणासाठी 32.22 कोटी आणि ऊर्जा विकासासाठी 35 कोटी रुपयांची तरतूद करण्यात
आली आहे.
बैठकीत जिल्हा वार्षिक योजना (आदिवासी घटक कार्यक्रम)
सन 2026-27 चा देखील आढावा घेण्यात आला. या योजनेसाठी 20.78 कोटी रुपयांचा मंजूर नियतव्यय
असून त्यापैकी 12.47 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. कृषी व संलग्न सेवा, सामाजिक
व सामूहिक सेवा, पाटबंधारे व पूरनियंत्रण, परिवहन आणि नाविन्यपूर्ण योजना या क्षेत्रांमध्ये
विविध विकासकामे हाती घेण्यात येणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.
तसेच अनुसूचित जाती उपयोजना सन 2026-27 अंतर्गत
99 कोटी रुपयांचा मंजूर नियतव्यय असून त्यापैकी 59.40 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला
आहे. कृषी व संलग्न सेवा, सामाजिक व सामुदायिक सेवा, उद्योग व खाणकाम तसेच नाविन्यपूर्ण
योजना या क्षेत्रांतील कामांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
यावेळी जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांच्या कामांचा
सविस्तर आढावा घेण्याचे निर्देश पालकमंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिले. जिल्हा वार्षिक
योजना, जल जीवन मिशन तसेच मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजना अंतर्गत सुरू असलेल्या
कामांची स्थिती जाणून घेत त्यांनी कामे दर्जेदार व वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
तसेच नाला खोलीकरणाच्या कामांना अधिक वेगाने गती देण्याचे निर्देश देत, आवश्यक निधी
लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
तसेच स्मशानभूमी विकासासाठी सन 2026-27 या आर्थिक
वर्षात ज्या गावांमध्ये स्मशानभूमी नाही, त्या गावांमध्ये स्मशानभूमीची कामे प्राधान्याने
घ्यावीत, असे निर्देश पालकमंत्री यांनी दिले.
बैठकीत 'क' वर्ग दर्जाच्या तीन तीर्थक्षेत्रांचे
प्रस्ताव प्राप्त झाल्याची माहिती देण्यात आली. यात बुलढाणा तालुक्यातील रुईखेड टेकाळे
येथील दत्त महानुभाव समाजसेवा मंडळ, मेहकर तालुक्यातील शेंदला येथील संत गजानन महाराज
संस्थान तसेच खामगाव तालुक्यातील घाटपुरी येथील सद्गुरु श्रीधर महाराज चॅरिटेबल ट्रस्ट
यांच्या प्रस्तावांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले.
iPAS प्रणालीचा 100 टक्के वापर यंत्रणेने करावा
तसेच विहीत मुदतीत प्रशासकीय मान्यता प्राप्त करून घ्यावी. तसेच विकास कामांच्या अंमलबजावणीत
गुणवत्ता, पारदर्शकता आणि वेळेचे नियोजन यांना प्राधान्य देऊन नागरिकांना अधिकाधिक
सुविधा उपलब्ध करून देण्याचे आवाहन पालकमंत्री मकरंद जाधव पाटील यांनी यावेळी केले.
0000








Comments
Post a Comment