अमृतचा ‘मानसमित्र समुपदेशक प्रशिक्षण कार्यक्रम’ सुरू; मानसिक आरोग्य क्षेत्रात करिअरची संधी

 


 

बुलढाणा,दि.10 (जिमाका) : महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) मार्फत राज्यातील युवक-युवतींसाठी ‘अमृत मानसमित्र समुपदेशक प्रशिक्षण कार्यक्रम’ राबविण्यात येत आहे. मानसिक आरोग्य क्षेत्रात प्रशिक्षित समुपदेशक तयार करून रोजगार, स्वयंरोजगार आणि समाजसेवेच्या नव्या संधी उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.

 

सध्याच्या बदलत्या शैक्षणिक व सामाजिक वातावरणात विद्यार्थ्यांना शैक्षणिक ताणतणाव, भावनिक समस्या, डिजिटल व्यसन, करिअरविषयक संभ्रम तसेच मानसिक आरोग्याशी संबंधित विविध आव्हानांचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर शाळा व महाविद्यालयांमध्ये प्रशिक्षित समुपदेशकांची गरज मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ही गरज लक्षात घेऊन अमृत संस्थेने हा विशेष प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केला आहे.

 

या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र शासनाची अग्रगण्य संस्था महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था (MIMH), पुणे तांत्रिक भागीदार म्हणून कार्यरत असून अभ्यासक्रम, प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि गुणवत्ता नियंत्रणाची जबाबदारी पार पाडणार आहे. प्रशिक्षणामध्ये विद्यार्थी समुपदेशन, बाल व किशोर मानसिक आरोग्य, संवाद कौशल्ये, तणाव व्यवस्थापन, जीवनकौशल्य शिक्षण, आत्महत्या प्रतिबंध, सायबर सुरक्षा, पालक-शिक्षक समन्वय तसेच मानसिक आरोग्य जनजागृती यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांचा समावेश करण्यात आला आहे.

 

प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना ‘अमृत मानसमित्र समुपदेशक’ प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल. त्यानंतर शाळा व महाविद्यालयीन समुपदेशक, जीवनकौशल्य प्रशिक्षक, मानसिक आरोग्य जनजागृती प्रशिक्षक, विद्यार्थी कल्याण अधिकारी तसेच स्वतंत्र समुपदेशन सेवा सुरू करण्याच्या संधी उपलब्ध होऊ शकतात.

 

प्रशिक्षणाचे स्वरूप हायब्रीड (ऑनलाइन व ऑफलाइन) असून त्यामध्ये १५ दिवसांचे प्रत्यक्ष प्रशिक्षण, एक महिन्याची क्षेत्रीय नियुक्ती आणि सहा महिन्यांचे मार्गदर्शन व सुपरव्हिजन यांचा समावेश आहे. प्रत्यक्ष प्रशिक्षण पुणे येथे आयोजित करण्यात येणार आहे.

 

पात्रता : एम.ए./एम.एस्सी. मानसशास्त्र, समुपदेशन मानसशास्त्र किंवा एमएसडब्ल्यू (MSW) पदवीधारक तसेच अमृतच्या लक्षित गटातील पात्र उमेदवार अर्ज करू शकतात.

अर्ज कालावधी : पहिल्या बॅचसाठी ऑनलाइन अर्ज १५ जून २०२६ ते २२ जून २०२६ या कालावधीत स्वीकारले जाणार आहेत. पात्र उमेदवारांची निवड ‘प्रथम येईल त्यास प्राधान्य’ या तत्त्वावर करण्यात येणार आहे.

 

अमृत संस्थेबाबत : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) ही महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था असून खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना इतर कोणत्याही शासकीय संस्था किंवा महामंडळांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा संस्थेचा लक्षित गट आहे. वार्षिक कौटुंबिक उत्पन्न रु. ८ लाखांपेक्षा कमी असलेल्या पात्र व्यक्तींना अमृतच्या विविध योजनांचा लाभ घेता येतो.

 

अधिक माहितीसाठी इच्छुकांनी जिल्हा व्यवस्थापक जिग्नेश कमाणी (मो. ९११२२२७६३७) यांच्याशी संपर्क साधावा. तसेच अमृत जिल्हा कार्यालय, फ्लॅट क्र. ३०५, तिसरा मजला, बुलढाणा प्राईड बिल्डिंग, तहसील कार्यालयासमोर, बुलढाणा येथे भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

दत्तक विधान प्रक्रिया; इच्छुक पालकांनी कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करावी