विशेष सखोल पुनरिक्षण मोहिमेसाठी राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसोबत समन्वय बैठक
बुलढाणा,
दि. 25 (जिमाका) : भारत निवडणूक
आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण (एसआयआर) मोहिमेच्या प्रभावी
अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण कुमार देवरे यांच्या अध्यक्षतेखाली 22 जून
रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसोबत
समन्वय बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुहासिनी गोणेवार
उपस्थित होत्या.
बैठकीत विशेष सखोल पुनरिक्षण मोहिमेचा उद्देश, मतदार
याद्यांची अचूकता व अद्ययावतीकरणाची प्रक्रिया, तसेच निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक
सूचनांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. पात्र मतदारांची नोंदणी, नवमतदारांचा समावेश,
मृत अथवा स्थलांतरित मतदारांची नावे वगळणे आणि मतदार याद्यांमधील त्रुटी दूर करण्यासाठी
राजकीय पक्षांचे सहकार्य महत्त्वाचे असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
जिल्हाधिकारी डॉ. देवरे यांनी मतदार यादी पुनरिक्षण
प्रक्रियेत सर्व संबंधितांनी सक्रिय सहभाग नोंदवून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन
केले. मतदार यादी अधिक अचूक, पारदर्शक आणि सर्वसमावेशक करण्यासाठी प्रत्येक स्तरावर
दक्षता घेण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली.
बैठकीदरम्यान उपस्थित पदाधिकाऱ्यांनी विविध सूचना
व मुद्दे मांडले. त्यावर निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी आवश्यक मार्गदर्शन करून शंकांचे
निरसन केले. विशेष सखोल पुनरिक्षण मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी प्रशासन आणि राजकीय
पक्षांनी संयुक्तपणे कार्य करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
बैठकीस विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी तसेच निवडणूक
विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
0000
Comments
Post a Comment