सामाजिक न्याय दिनानिमित्त बुलढाण्यात राजर्षी शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी
बुलढाणा, दि. 30 (जिमाका) : समाज
कल्याण कार्यालय व जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने 26 जून
रोजी राजर्षी शाहू महाराज यांची जयंती तथा सामाजिक न्याय दिन विविध उपक्रमांनी उत्साहात
साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात राजर्षी
शाहू महाराज व अन्य महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून तसेच दीपप्रज्वलनाने
करण्यात आली. त्यानंतर 'नशामुक्त भारत अभियान' अंतर्गत उपस्थितांनी व्यसनमुक्तीची सामूहिक
शपथ घेतली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक आयुक्त मनोज मेरत हे होते. प्रमुख
पाहुणे म्हणून जिल्हा समाज कल्याण अधिकारी प्रमोद येंडाले, सहाय्यक संचालक (इतर मागास
व बहुजन कल्याण) दिपाली पाडवी, माजी प्राचार्य विष्णु पाटील आणि समाजसेविका शाहीनी
पठाण उपस्थित होत्या. यावेळी समाज कल्याण विभागाच्या विविध पुरस्कारांचे मानकरीही मोठ्या
संख्येने उपस्थित होते.
प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्राचार्य
विष्णु पाटील यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आणि कृषी
क्षेत्रातील योगदानाचा सविस्तर आढावा घेतला. समाजात समता, सामाजिक न्याय आणि लोककल्याणकारी
प्रशासनाची मूल्ये रुजविण्यासाठी शाहू महाराजांचे विचार आजही तितकेच प्रेरणादायी असल्याचे
त्यांनी सांगितले. महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या
विचारांवर समाजाने आपली जीवनदिशा निश्चित करावी, असे आवाहन त्यांनी केले.
शाहीर डी. आर. इंगळे यांनी राजर्षी
शाहू महाराज यांच्या जीवनकार्यावर आधारित समाजप्रबोधनपर गीत सादर करून उपस्थितांची
मने जिंकली. तसेच समाज कल्याण विभागाच्या विविध पुरस्कारांचे मानकरी डी. आर. इंगळे,
पी. डी. महाले, गोडेकर, जाधव, सावळे आदींचा विशेष सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास
समाजभूषण पुरस्कार प्राप्त मानकरी, शासकीय निवासी शाळा व वसतिगृहांचे मुख्याध्यापक,
गृहपाल, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, महाविद्यालयीन व शालेय विद्यार्थी तसेच नागरिक
मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहल
काळवाघे व संदीप कपले यांनी केले. अध्यक्षीय समारोपात सहाय्यक आयुक्त मनोज मेरत यांनी
सामाजिक न्यायाची मूल्ये समाजात अधिक दृढ करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करण्याचे
आवाहन केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी समाज कल्याण कार्यालयातील सर्व अधिकारी
व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
000
Comments
Post a Comment