खरीप हंगाम २०२६ पिकस्पर्धेत सहभागी होण्याचे कृषी विभागाचे आवाहन

 


बुलढाणा, दि. ८ जून : राज्यातील तसेच जिल्ह्यातील पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी आणि प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कृषी विभागामार्फत खरीप हंगाम २०२६ साठी पिकस्पर्धा योजना राबविण्यात येत आहे. या स्पर्धेमुळे शेतकऱ्यांना आधुनिक व अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करण्यास प्रोत्साहन मिळून कृषी उत्पादनात वाढ होण्यास मदत होणार आहे.

बुलढाणा जिल्ह्यासाठी खरीप हंगामातील मुग, उडीद, सोयाबीन, तूर, मका, बाजरी, ज्वारी, भुईमूग व सूर्यफूल या पिकांचा स्पर्धेत समावेश करण्यात आला आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्याच्या स्वतःच्या नावावर जमीन असणे व ती स्वतः कसत असणे आवश्यक आहे. तसेच संबंधित पिकाखाली किमान ४० आर क्षेत्रावर सलग लागवड केलेली असावी. शेतकऱ्यांना एकाच वेळी एकापेक्षा अधिक पिकांसाठी स्पर्धेत सहभागी होता येणार आहे.

स्पर्धेसाठी सर्वसाधारण गटातील शेतकऱ्यांना प्रति पीक ३०० रुपये तर आदिवासी गटातील शेतकऱ्यांना १५० रुपये प्रवेश शुल्क भरावे लागणार आहे. मुग व उडीद पिकांसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ३१ जुलै २०२६ असून सोयाबीन, तूर, मका, ज्वारी, बाजरी, भुईमूग व सूर्यफूल पिकांसाठी ३१ ऑगस्ट २०२६ ही अंतिम तारीख आहे.

स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी विहित नमुन्यातील अर्जासोबत प्रवेश शुल्क चलन, ७/१२ उतारा, ८-अ उतारा तसेच आदिवासी प्रवर्गातील असल्यास जात प्रमाणपत्र जोडून संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयात अर्ज सादर करावेत. प्राप्त अर्जांच्या आधारे संबंधित तालुका कृषी अधिकारी पिकस्पर्धा जाहीर करणार आहेत.

स्पर्धेतील विजेत्यांना तालुका, जिल्हा आणि राज्य स्तरावर आकर्षक रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत. तालुका स्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे ५ हजार, ३ हजार व २ हजार रुपये, जिल्हा स्तरावर १० हजार, ७ हजार व ५ हजार रुपये तर राज्य स्तरावर ५० हजार, ४० हजार व ३० हजार रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत.

पिकस्पर्धेच्या सविस्तर मार्गदर्शक सूचना कृषी विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून अधिक माहितीसाठी संबंधित गावाचे सहाय्यक कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. शेतकरी बांधवांनी मुदतीपूर्वी अर्ज सादर करून मोठ्या संख्येने पिकस्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.

00000

 

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

दत्तक विधान प्रक्रिया; इच्छुक पालकांनी कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करावी