स्वाधार योजनेच्या अर्जातील त्रुटी पूर्ततेसाठी ७ जुलैपर्यंत मुदतवाढ; विद्यार्थ्यांना समाजकल्याण विभागाचे आवाहन
बुलढाणा,दि.25(जिमाका)
: अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील शासकीय वसतिगृहात
प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून
देणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब
आंबेडकर स्वाधार योजनेच्या अर्जांमधील त्रुटी दूर करण्यासाठी
समाजकल्याण विभागाने ७ जुलै २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे.
समाजकल्याण विभागामार्फत
राबविण्यात येणाऱ्या या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना भोजन, निवास व इतर शैक्षणिक
सुविधांसाठी आवश्यक आर्थिक मदत त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट जमा केली
जाते. शैक्षणिक सत्र २०२४-२५ व २०२५-२६ मधील काही विद्यार्थ्यांचे परीक्षेचे निकाल
प्रलंबित असल्यामुळे अनेकांना ‘सेंड बँक’ अर्ज पुढे पाठविता आले नव्हते.
या विद्यार्थ्यांना
योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागू नये, यासाठी अर्जातील त्रुटींची पूर्तता
करून ‘सेंड बँक’ अर्ज फॉरवर्ड करण्यासाठी ७ जुलैपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली
आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या लॉगिनमधील अर्जांची तपासणी करून आवश्यक कागदपत्रे व
माहिती अद्ययावत करावी, तसेच त्रुटी दूर करून अर्ज तातडीने फॉरवर्ड करावेत, असे
आवाहन करण्यात आले आहे.
याशिवाय, ज्या
विद्यार्थ्यांनी अद्याप स्वाधार योजनेचे अर्ज संबंधित कार्यालयात सादर केलेले
नाहीत, त्यांनीही विहित मुदतीत अर्ज सादर करावेत. विभागाने दिलेली ही मुदत अंतिम
असून विद्यार्थ्यांनी विलंब न करता आवश्यक कार्यवाही करावी, असे स्पष्ट करण्यात
आले आहे.
समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त मनोज
मेरत यांनी विद्यार्थ्यांना वेळेत अर्ज प्रक्रिया पूर्ण करून
शासनाच्या या महत्त्वपूर्ण योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.
00000
Comments
Post a Comment