देऊळगाव राजा येथील सरोज महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेतील गैरव्यवहार प्रकरणी 54 जणांविरुद्ध गुन्हा; पीडित ठेवीदारांना संपर्काचे आवाहन
बुलढाणा
दि.11 (जिमाका): सरोज महिला ग्रामीण बिगर शेती सहकारी
पतसंस्था मर्यादित, र. नं. 680, देऊळगावमही ता. देऊळगाव राजा, जि. बुलढाणा येथील गैरव्यवहार
व अपहारीत रक्कम प्रकरणी 54 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा
तपास आर्थिक गुन्हे शाखा, बुलढाणा यांच्याकडून सुरू आहे.
अरुणा मनोज व्यवहारे, विशेष लेखापरीक्षक
वर्ग-1, सहकारी संस्था (साखर), बुलढाणा यांनी सन 2023 ते 2025 या आर्थिक वर्षांच्या
लेखापरीक्षणादरम्यान संस्थेतील आर्थिक गैरव्यवहार उघडकीस आणला. त्यानुसार संस्थेतील
गैरव्यवहारास जबाबदार असलेल्या आजी-माजी अध्यक्षा, संचालिका, व्यवस्थापक, कर्मचारी
वर्ग तसेच काही कर्जदारांविरुद्ध देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात 21 मे 2026 रोजी तक्रार
दाखल करण्यात आली.
या तक्रारीच्या आधारे गुन्हा रजिस्टर
क्रमांक 231/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलमानुसार व महाराष्ट्र सहकारी
संस्था अधिनियम 1960 चे कलम 146 तसेच महाराष्ट्र ठेवीदारांच्या (वित्तीय संस्थांमधील
हितसंबंधांचे संरक्षण) अधिनियम 1999 चे कलम 3 अंतर्गत एकूण 54 आरोपींविरुद्ध गुन्हा
नोंदविण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक, बुलढाणा यांच्या आदेशान्वये या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे
शाखेकडे सोपविण्यात आला असून तपासाची कार्यवाही सुरू आहे. दरम्यान, संबंधित पतसंस्थेतील
सर्व पीडित ठेवीदारांना आवाहन करण्यात आले आहे की, सदर प्रकरणात साक्षीदार म्हणून जबाब
नोंदविणे आवश्यक असल्याने त्यांनी आवश्यक पुरावे व कागदपत्रांसह आर्थिक गुन्हे शाखेशी
संपर्क साधावा.
अधिक माहितीसाठी पोलीस निरीक्षक आशिष
रोही (मो. 9607308224) तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक आर. आर. राऊत (मो. 9503527855)
यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आर्थिक गुन्हे शाखेने केले आहे.
00000
Comments
Post a Comment