आरोग्य विभागात समुपदेशनाद्वारे ४ हजार १९३ कर्मचाऱ्यांच्या पारदर्शक बदल्या

 


बुलढाणा, दि. 9 (जिमाका): सार्वजनिक आरोग्य विभागातील गट-क संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदली प्रक्रियेत यंदा प्रथमच समुपदेशनाधारित, पारदर्शक आणि तंत्रशुद्ध पद्धतीचा अवलंब करण्यात आला. राज्यातील ४ हजार ५०६ बदलीपात्र कर्मचाऱ्यांपैकी ४ हजार १९३ कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी शिफारसी करण्यात आल्याने ही प्रक्रिया राज्य प्रशासनातील आदर्श उपक्रम ठरली आहे.

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया राबविण्यात आली. कर्मचाऱ्यांची सेवा ज्येष्ठता, पसंतीक्रम, दुर्गम भागातील सेवा, वैद्यकीय तसेच कौटुंबिक परिस्थितीचा विचार करून बदल्या करण्यात आल्याने राज्यभरातील कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

आरोग्य विभागाचे प्रधान सचिव, सचिव-२, आयुक्त आरोग्य सेवा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संचालक आरोग्य सेवा (प्राथमिक) डॉ. विजय कंदेवाड यांच्या प्रशासकीय नियोजनातून संपूर्ण प्रक्रियेचे बारकाईने नियोजन करण्यात आले. प्रत्येक परिमंडळासाठी स्वतंत्र वेळापत्रक, मार्गदर्शक सूचना, व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे मार्गदर्शन, हरकतींचे तत्काळ निवारण आणि प्रक्रियेचे व्हिडिओ चित्रीकरण यामुळे पारदर्शकता आणि विश्वासार्हता सुनिश्चित करण्यात आली.

राज्यातील छत्रपती संभाजीनगर परिमंडळ, नागपूर, अकोला, नाशिक, कोल्हापूर, पुणे, लातूर आणि ठाणे या परिमंडळांसह विविध विशेष आरोग्य संस्थांमध्ये १३ ते २३ मे २०२६ या कालावधीत समुपदेशन प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण झाली. बदली प्रक्रियेत परिचारिका संवर्गातील १ हजार ५७५, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (पुरुष) संवर्गातील ८०८, कनिष्ठ लिपिक संवर्गातील १९७, औषध निर्माण अधिकारी संवर्गातील १६० आणि प्रयोगशाळा सहाय्यक संवर्गातील १४९ कर्मचाऱ्यांच्या बदल्या निश्चित करण्यात आल्या. कर्मचारी संघटनांनीही या प्रक्रियेचे स्वागत करत पारदर्शकतेबाबत समाधान व्यक्त केले आहे.

या प्रक्रियेत रिक्त पदे आणि बदलीपात्र कर्मचाऱ्यांची यादी संकेतस्थळ तसेच नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात आली. राज्यस्तरीय निरीक्षकांची नियुक्ती करून प्रत्येक टप्प्यावर देखरेख ठेवण्यात आली. कर्मचाऱ्यांच्या प्रतिक्रिया समाजमाध्यमांवर प्रसिद्ध करण्यात आल्याने प्रक्रियेबाबत विश्वास वाढला आणि कोणत्याही प्रकारच्या संभ्रमाला वाव मिळाला नाही.

आरोग्य विभागातील अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही प्रक्रिया न्याय्य, विश्वासार्ह आणि कर्मचारीहिताची असल्याचे सांगितले. शासनाच्या धोरणात्मक निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करून सार्वजनिक आरोग्य विभागाने कार्यक्षम प्रशासनाचा आदर्श निर्माण केल्याची प्रतिक्रिया विविध स्तरांतून व्यक्त होत आहे.

यावर्षी बदली प्रक्रियेत कर्मचाऱ्यांचे चांगले सहकार्य लाभल्याने बदल्या अधिक नियोजनबद्ध आणि पारदर्शकपणे पार पाडता आल्याची भावना संचालक आरोग्य सेवा (प्राथमिक) डॉ. विजय कंदेवाड यांनी व्यक्त केली. सार्वजनिक आरोग्य विभागातील ही समुपदेशनाधारित बदली प्रक्रिया भविष्यातील कर्मचारी व्यवस्थापनासाठी दिशादर्शक ठरणार असून राज्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम, गतिमान आणि परिणामकारक करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल मानली जात आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

दत्तक विधान प्रक्रिया; इच्छुक पालकांनी कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करावी