अनुसूचित जाती व नवबौद्ध बचत गटांसाठी मिनी ट्रॅक्टर योजना; २५ जूनपर्यंत अर्ज मागविले * ९० टक्के शासकीय अनुदान
बुलढाणा,दि.12
(जिमाका) : अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता
बचत गटांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत
सन २०२६-२७ या वर्षासाठी मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने पुरवठा योजना राबविण्यात येत
आहे. या योजनेअंतर्गत पात्र बचत गटांना ९ ते १८ अश्वशक्तीचा मिनी ट्रॅक्टर, कल्टिव्हेटर
किंवा रोटॅव्हेटर तसेच ट्रेलर खरेदीसाठी ९० टक्के शासकीय अनुदान देण्यात येणार आहे.
योजनेनुसार मिनी ट्रॅक्टर व उपसाधनांची कमाल किंमत ३.५०
लाख रुपये निश्चित करण्यात आली असून त्यापैकी ३.१५ लाख रुपये शासकीय अनुदान तर उर्वरित
३५ हजार रुपये लाभार्थी बचत गटाचा स्वहिस्सा राहणार आहे. शासनाने निश्चित केलेल्या
मर्यादेपेक्षा अधिक क्षमतेचा अथवा अधिक किंमतीचा ट्रॅक्टर खरेदी केल्यास अतिरिक्त रक्कम
संबंधित बचत गटाला स्वतः भरावी लागणार आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी बचत गटातील किमान ८० टक्के सदस्य
अनुसूचित जाती अथवा नवबौद्ध घटकातील असणे आवश्यक आहे. तसेच अध्यक्ष व सचिव हेही अनुसूचित
जाती किंवा नवबौद्ध समाजातील असावेत. सर्व सदस्य महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे
बंधनकारक आहे. लाभार्थी बचत गटाची निवड झाल्यानंतर शासनमान्य उत्पादकांकडून मिनी ट्रॅक्टर
व उपसाधने खरेदी करावी लागतील. खरेदीची पावती सादर केल्यानंतर अनुदानाचा ५० टक्के हिस्सा
लाभार्थी बचत गटाच्या आधारसंलग्न बँक खात्यात जमा केला जाईल. आरटीओ नोंदणी पूर्ण झाल्यानंतर
उर्वरित अनुदानाची रक्कम अदा करण्यात येईल.
इच्छुक बचत गटांनी विहित नमुन्यातील अर्जासह आवश्यक कागदपत्रे
दि. २५ जून २०२६ पर्यंत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर
सामाजिक न्याय भवन, त्रिशरण चौक, चिखली रोड, बुलढाणा येथे सादर करावेत. अर्जासोबत बचत
गट नोंदणी प्रमाणपत्र, सदस्यांची यादी, जाती व अधिवास प्रमाणपत्रे, आधार कार्ड, रेशन
कार्ड, पॅनकार्ड, बँक पासबुक, ट्रॅक्टर खरेदीचा ठराव, हमीपत्र व इतर आवश्यक कागदपत्रे
जोडणे आवश्यक आहे. या योजनेचा जास्तीत जास्त पात्र बचत गटांनी लाभ घ्यावा, असे आवाहन
सहाय्यक आयुक्त मनोज मेरत यांनी केले आहे.
00000
Comments
Post a Comment