दिव्यांगांसाठी मोफत संगणक व व्यावसायिक प्रशिक्षणाची सुवर्णसंधी; प्रवेश प्रक्रिया सुरू
बुलढाणा, दि. 22 (जिमाका): महाराष्ट्र
शासनाच्या दिव्यांग कल्याण आयुक्तालय, पुणे तसेच जिल्हा परिषद, सांगली अंतर्गत
कार्यरत असलेल्या शासकीय प्रौढ दिव्यांग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह, मिरज येथे सन
२०२६-२७ शैक्षणिक वर्षासाठी दिव्यांग युवकांसाठी मोफत संगणकीय व व्यावसायिक प्रशिक्षणाच्या
प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील दिव्यांगांसाठी मोफत
प्रशिक्षण देणारी ही एकमेव शासकीय संस्था असून, संस्थेला अखिल भारतीय स्तरावरील
प्रतिष्ठेचा ‘फिक्की अवॉर्ड १९९९’ प्राप्त झाला आहे.
संस्थेमध्ये सर्टिफिकेट इन कॉम्प्युटर ऑपरेशन विथ एम.एस.
ऑफिस तसेच मोटार अँड आर्मेचर वायंडिंग व सबमर्सिबल पंप (सिंगल फेज) हे
एक वर्ष कालावधीचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसाय
शिक्षण व प्रशिक्षण मंडळ, मुंबई यांची या अभ्यासक्रमांना मान्यता आहे.
प्रवेशासाठी अर्जदाराचे वय १६ ते ४० वर्षांदरम्यान असणे आवश्यक
असून, प्रवेश फक्त दिव्यांग मुलांसाठी उपलब्ध आहे. संगणक अभ्यासक्रमासाठी किमान
आठवी उत्तीर्ण तर इलेक्ट्रिक अभ्यासक्रमासाठी किमान नववी उत्तीर्ण शैक्षणिक
पात्रता आवश्यक आहे.
प्रशिक्षणार्थींना राहण्याची, जेवणाची व प्रशिक्षणाची संपूर्ण
मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याशिवाय अद्ययावत संगणक प्रयोगशाळा,
इंटरनेट सुविधा, भरपूर प्रात्यक्षिक प्रशिक्षण, अनुभवी प्रशिक्षकांचे मार्गदर्शन
तसेच स्वयंरोजगारासाठी समाज कल्याण विभागाच्या बीजभांडवल योजनेचा लाभ मिळण्याची
संधी उपलब्ध आहे.
प्रवेश अर्ज व माहितीपत्रक शासकीय प्रौढ दिव्यांग प्रशिक्षण
केंद्र व वसतिगृह, टाकळी रोड, म्हेत्रे मळा, गोदड मळ्याजवळ, मिरज (जि. सांगली)
येथे मोफत उपलब्ध आहेत. अर्ज पोस्टाद्वारे किंवा प्रत्यक्ष संस्थेत जमा करता
येतील. अर्जासोबत शाळा सोडल्याचा दाखला, गुणपत्रिका, अपंगत्व प्रमाणपत्र, आधार
कार्ड, यूडीआयडी कार्ड, अधिवास प्रमाणपत्र व उत्पन्नाचा दाखला यांच्या छायाप्रती
जोडणे आवश्यक आहे.
मर्यादित जागा उपलब्ध असल्याने पात्र
दिव्यांग युवकांनी त्वरीत अर्ज करावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले
आहे. तसेच ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांनी आपल्या परिसरातील गरजू दिव्यांग
बांधवांपर्यंत या योजनेची माहिती पोहोचवून त्यांना लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित
करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.
संपर्क :
०२३३-२२२२९०८, ९९२२५७७५६१, ९३२५५५५९८१.
00000
Comments
Post a Comment