आदिशक्ती संत श्री मुक्ताबाई पालखी आगमनानिमित्त बुलढाण्यात प्रथमच ‘चरणसेवा उपक्रम

 




 

बुलढाणा, दि. 29 (जिमाका): आदिशक्ती संत श्री मुक्ताबाई यांच्या पालखीचे शनिवारी अनेक वारकऱ्यांसह बुलढाणा शहरात आगमन झाले. पालखीच्या स्वागतासह यावर्षी बुलढाणा जिल्ह्यात प्रथमच 'चरणसेवा' हा उपक्रम राबविण्यात आला. आषाढी वारीनिमित्त मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, मुख्यमंत्री सचिवालय, मुंबई यांच्या माध्यमातून गेल्या वर्षापासून राज्यभर राबविण्यात येणारा हा उपक्रम यंदा प्रथमच बुलढाणा जिल्ह्यात आयोजित करण्यात आला.

 

बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांच्या पुढाकाराने व शुभहस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. उपक्रमांतर्गत वसंतप्रभा भौतिक उपचार महाविद्यालय, बुलढाणा तसेच राजर्षी शाहू महाराज आयुर्वेद महाविद्यालय, बुलढाणा येथील विद्यार्थ्यांनी पालखीसोबत आलेल्या वारकऱ्यांना वेदना कमी करण्यासाठी तेल अभ्यंग व भौतिक उपचार (फिजिओथेरपी) करून उपशम चिकित्सा प्रदान केली. दिवसभर अनेक वारकऱ्यांनी या सेवांचा लाभ घेतला.

 

मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, मुख्यमंत्री सचिवालय, मुंबईचे कक्षप्रमुख  रामेश्वरजी नाईक यांच्या मार्गदर्शन व सूचनांनुसार हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात आला. यासाठी बुलढाणा जिल्हा कक्षातील वैद्यकीय अधिकारी डॉ. पंकज राठोड, महसूल सहाय्यक सीमा अहीर तसेच कक्ष समन्वयक गजानन चाटे यांनी नियोजन व अंमलबजावणीसाठी विशेष परिश्रम घेतले.

 

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेत त्यांना तात्काळ वेदनाशामक उपचार उपलब्ध करून देणारा हा उपक्रम वारकऱ्यांसाठी दिलासादायक ठरला. बुलढाणा जिल्ह्यात प्रथमच राबविण्यात आलेल्या या 'चरणसेवा' उपक्रमाचे वारकरी व नागरिकांनी स्वागत केले.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

दत्तक विधान प्रक्रिया; इच्छुक पालकांनी कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करावी