मिशन लक्ष्यवेध योजनेअंतर्गत कुस्ती खेळाडूंसाठी विभागीय निवड चाचणी १० जून रोजी

 


बुलढाणा,दि.9 (जिमाका) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या "मिशन लक्ष्यवेध" या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत कुस्ती या क्रीडा प्रकारासाठी विभागीय क्रीडा निपुणता केंद्राची स्थापना विभागीय क्रीडा संकुल, अमरावती येथे करण्यात येत आहे. या केंद्रासाठी पात्र खेळाडूंची निवड करण्यासाठी १० जून २०२६ रोजी विभागस्तरीय निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे.

 

निवड झालेल्या खेळाडूंना निवासी स्वरूपात दर्जेदार व तंत्रशुद्ध प्रशिक्षण, क्रीडा साहित्य, निवास व भोजन सुविधा, क्रीडा विज्ञान विषयक सहाय्य, देश-विदेशातील स्पर्धांमध्ये सहभागाची संधी तसेच वैद्यकीय विमा संरक्षण शासन मान्यतेनुसार उपलब्ध करून दिले जाणार आहे.

 

निवड चाचणीसाठी पात्रता निकष : वयोमर्यादा : २५ वर्षांखालील मुले व मुली (३१ डिसेंबर २०२६ रोजी), महाराष्ट्र राज्याचा अधिवासी असणे आवश्यक, राज्यस्तरीय पदकप्राप्त अथवा राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सहभाग असलेले खेळाडू,       गत दोन वर्षांतील क्रीडा कामगिरीचे मूल्यांकन केले जाईल,      क्रीडा कौशल्य व शारीरिक तंदुरुस्ती चाचणीत पात्र ठरणे आवश्यक, शासन मान्यताप्राप्त डॉक्टरांचे वैध वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र अनिवार्य.

 

आवश्यक कागदपत्र: जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, आधार कार्ड, क्रीडा कामगिरीची प्रमाणपत्रे, तीन पासपोर्ट आकाराचे फोटो, शाळा/महाविद्यालयाचे बोनाफाईड प्रमाणपत्र व पालकांचे संमतीपत्र.

 

निवड चाचणीचे डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, अमरावती येथे सकाळी ११.३० वाजता उपस्थित राहावे. चाचणी दुपारी १२.०० वाजतापासून सुरु होईल. अधिक माहितीसाठी  जितेंद्र भुयार(मो. ८६६८५४६९५१), अनिल इंगळे (मो. ९९७००७११७२) किंवा अनुप वानखडे (मो. ९८८१९८०२८२) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन क्रीडा विभागाने केले आहे.

0000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

दत्तक विधान प्रक्रिया; इच्छुक पालकांनी कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करावी