बुलढाण्यात अवैध मद्यविक्री विरोधात धडक मोहीम; ११० गुन्हे, १४.६८ लाखांचा मुद्देमाल जप्त

 


बुलढाणा,दि.16 (जिमाका) : पुणे जिल्ह्यात मिथेनॉलमिश्रित विषारी दारू सेवनामुळे घडलेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने बुलढाणा जिल्ह्यात अवैध मद्यनिर्मिती, वाहतूक आणि विक्रीविरोधात विशेष मोहीम राबवून मोठी कारवाई केली आहे. २९ मे ते १४ जून २०२६ या कालावधीत करण्यात आलेल्या कारवाईत ११० गुन्हे नोंदविण्यात आले असून १०८ आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच ९ वाहने जप्त करून एकूण १४ लाख ६८ हजार ४४५ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या बुलढाणा, देऊळगाव राजा, खामगाव आणि भरारी पथकातील अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील विविध हातभट्टी केंद्रे आणि अवैध मद्यविक्रीच्या ठिकाणांवर छापे टाकले. भिलवाडा, डोंगरखंडाळा, सुंदरखेड, बोराखेडी, मातला, बोरी आडगाव, देवघाबा, उंबरखेड शिवार, कोलवड, रणथम, जामोद, सुनगाव, गवळीपूरा, शहापूर, मानसगाव, शिरोळा, खामखेड आणि कवठळ आदी भागांत ही कारवाई करण्यात आली.

ही मोहीम डॉ. राजेश देशमुख (आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य), प्रसाद सुर्वे (सह आयुक्त, अंमलबजावणी व दक्षता), डॉ. पराग नवलकर (विभागीय उपआयुक्त, अमरावती विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच चारुदत्त हांडे (अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, बुलढाणा) यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आली.

दरम्यान, जिल्ह्यातील अनुज्ञप्तीधारकांकडून नियमांचे काटेकोर पालन व्हावे यासाठी विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. विना मद्यसेवन परवाना मद्यविक्री, अल्पवयीनांना मद्य उपलब्ध करून देणे किंवा निर्धारित वेळेपेक्षा आधी अथवा नंतर मद्यविक्री केल्यास संबंधितांवर तात्काळ कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा विभागाने दिला आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाने नागरिकांनाही अवैध मद्यविक्री, हातभट्टी, हॉटेल-धाब्यांमधील बेकायदेशीर मद्यव्यवहार अथवा वाहतुकीबाबत माहिती देण्याचे आवाहन केले आहे. यासाठी टोल फ्री क्रमांक 18002339999, व्हॉट्सअॅप क्रमांक 8422001133 तसेच विभागाच्या ऑनलाइन पोर्टलवर तक्रार नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. "अवैध मद्यविक्री व हातभट्टी निर्मूलनासाठी जिल्ह्यातील कारवाई यापुढेही अधिक तीव्र करण्यात येणार आहेत," असे राज्य उत्पादन शुल्क विभागाने स्पष्ट केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

दत्तक विधान प्रक्रिया; इच्छुक पालकांनी कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करावी