जागतिक रक्तदाता दिन उत्साहात साजरा; ५० हून अधिक वेळा रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांचा गौरव; प्रभात फेरीतून जनजागृती
जागतिक रक्तदाता दिन उत्साहात साजरा;
५० हून अधिक वेळा रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांचा गौरव; प्रभात फेरीतून
जनजागृती
बुलढाणा, दि. 15 : जिल्हा रुग्णालय व राजमाता
जिजाऊ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जागतिक
रक्तदाता दिन’ उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. रक्तदानाविषयी जनजागृती
निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या प्रभात फेरीस नागरिकांचा
उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
‘रक्तदान हेच जीवनदान’ हा
संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी आयोजित प्रभात फेरीला प्रमुख उपस्थिती लाभलेले
डॉ. अजित शिरसाठ यांनी हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ केला. फेरीदरम्यान रक्तदानाचे
महत्त्व, सुरक्षित रक्तसाठ्याची गरज आणि स्वेच्छा रक्तदानाचे फायदे याबाबत
जनजागृती करण्यात आली.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण
म्हणजे समाजहितासाठी आणि गरजू रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी सातत्याने ५० पेक्षा
अधिक वेळा स्वेच्छेने रक्तदान करणाऱ्या आदर्श रक्तदात्यांचा प्रमाणपत्र देऊन
सन्मान करण्यात आला. त्यांच्या सामाजिक बांधिलकीचा गौरव करत उपस्थितांनी त्यांचे
अभिनंदन केले.
कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार होते. अध्यक्षीय भाषणात
त्यांनी नियमित रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित करत रक्तदाते हे समाजातील खरे
जीवनदाते असल्याचे सांगितले. रक्तदानामुळे अनेक रुग्णांना नवजीवन मिळत असून
प्रत्येक निरोगी नागरिकाने रक्तदानासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी
आयोजनासाठी रक्त संक्रमण अधिकारी डॉ. कविता पवार, डॉ. मिहीर बेदमुथा, रक्तपेढी
वैज्ञानिक अधिकारी गौरव कुलकर्णी, विष्णू मुंढे, तांत्रिक पर्यवेक्षक विनोद झगरे,
रक्तपेढी तंत्रज्ञ आकाश जाधव, प्रिती साळोखे, शितल इंगळे तसेच समुपदेशक आकाश
हिवाळे, धनंजय गोतमारे आणि कक्षसेवक सरला सपकाळ यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे
सूत्रसंचालन समुपदेशक अर्चना जाधव यांनी केले. या प्रसंगी वैद्यकीय अधिकारी,
कर्मचारी, रक्तदाते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0000
.jpg)
.jpg)
Comments
Post a Comment