मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण 30 जूनपासून; बुलढाण्यात २०.९४ लाख मतदारांची घरपोच पडताळणी

 


बुलढाणा,दि.12 (जिमाका) : मतदार याद्या अधिक अचूक, पारदर्शक आणि अद्ययावत करण्यासाठी निवडणूक विभागामार्फत ‘विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम-२०२६ राबविण्यात येत असून, या अंतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत घरोघरी भेट देऊन मतदारांची प्रत्यक्ष पडताळणी करणार आहेत.

या मोहिमेदरम्यान बीएलओ मतदारांना अंशतः भरलेले गणना पत्र (Enumeration Form) प्रत्येकी दोन प्रतींमध्ये वितरीत करतील. पात्र मतदारांनी या गणना पत्रातील माहितीची पडताळणी करून आवश्यक दुरुस्त्या कराव्यात, दोन्ही प्रतींवर स्वाक्षरी करून अद्ययावत छायाचित्र जोडावे आणि ते संबंधित बीएलओकडे जमा करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण २  हजार २८८ बीएलओ नियुक्त करण्यात आले असून, त्यांच्या माध्यमातून सुमारे २०.९४ लाख मतदारांची प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे. या प्रक्रियेत निवडणूक अधिकाऱ्यांसोबतच राजकीय पक्षांचे सहकार्यही महत्त्वाचे मानले जात आहे. मतदार यादीतील दुबार नावे, मृत व्यक्तींची नावे वगळणे तसेच नव्याने पात्र ठरलेल्या मतदारांची नोंदणी अधिक प्रभावीपणे करण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर राजकीय पक्षांनी बूथ लेव्हल एजंट (BLA) नियुक्त करावेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. त्यामुळे संपूर्ण प्रक्रिया अधिक पारदर्शक व विश्वासार्ह होण्यास मदत होणार आहे.

विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरणही करण्यात येणार आहे. मतदार यादी तयार करण्यासाठी १ ऑक्टोबर २०२६ हा अर्हता दिनांक निश्चित करण्यात आला आहे. ५ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर प्राप्त दावे व हरकतींवर निर्णय घेऊन ७ ऑक्टोबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रकाशित करण्यात येणार आहे. मतदार याद्या अधिक अचूक व त्रुटीरहित करण्याच्या या महत्त्वपूर्ण उपक्रमात सर्व मतदारांनी बीएलओंना आवश्यक सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

0000

Comments

Popular posts from this blog

मत्स्यव्यवसाय अंतर्गत सहकारी संस्थांकडून तलाव ठेक्याने घेण्याबाबत प्रस्ताव आमंत्रित

बुलढाणा जिल्ह्याची महान हो कीर्ती

दत्तक विधान प्रक्रिया; इच्छुक पालकांनी कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करावी