Monday 31 July 2023

DIO BULDANA NEWS 31.07.2023

 



अंमली पदार्थांबाबत पालकांनी सजग राहावे

-जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड

बुलडाणा, दि. 31 : शाळकरी मुलांमध्येही अंमली पदार्थ सेवन करण्याचे प्रकार समोर येत आहेत. यामुळे युवा पिढी वाईट मार्गावर जात असल्याने पालकांनी मुलांकडे लक्ष देऊन अंमली पदार्थाबाबत पालकांनी सजग राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड यांनी केले.

अंमली पदार्थ विरोधी कारवाई समितीची सभा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक लांडे आदी, मेहकर उपविभागीय अधिकारी दिनेश गिते आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. तुम्मोड म्हणाले, प्रतिबंधात्मक कारवाई करताना प्रामुख्याने ज्या युवांवर अंमली पदार्थाचा दुष्परिणाम जाणविणार आहे, त्या ठिकाणी कारवाई होणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांमध्ये याबाबत जागृती करावी. पोलिस विभागाने केंद्रप्रमुखांच्या बैठकीमध्ये शाळा परिसरात होणाऱ्या अंमली पदार्थाबाबत माहिती द्यावी. तसेच पालक-शिक्षक सभेमध्ये अंमली पदार्थाची माहिती देण्यासंबंधी शाळांना देण्यात याव्यात. यामुळे मुलांमध्ये जागरुकता निर्माण होण्यास मदत होईल.

            अंमली पदार्थांना आळा घालण्यासाठी राज्याच्या सिमेवर कडक कारवाई करावी. प्रतिबंधात्मक कारवाई करताना राज्य आणि जिल्ह्याच्या सिमेवर तपासणी करावी. इतर राज्यात जाणाऱ्या अवैध दारूवर कारवाई करावी. तसेच दारूप्राशन करून वाहन चालविल्यामुळे धाब्यावर दारू किंवा तत्सम अंमली पदार्थ उपलब्ध होणार नाही, यासाठी कारवाई करण्यात यावी. अवैधरित्या दारू विक्री प्रकार पूर्णपणे बंद कराव्यात. जिल्ह्यातील अवैध धंद्यावर पोलिसांनी वचक निर्माण करावा. पोलिसांनी दाखल केलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईवर तात्काळ निर्णय घेण्यात येईल. समृद्धी महामार्ग आणि इतर प्रमुख रस्त्यांवर प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करण्याची कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

000000

पिक विमा काढण्यासाठी सोमवारपर्यंत मुदतवाढ

बुलडाणा, दि. 31 : खरीप हंगाम 2023 साठी प्रधानमंत्री पिक विमा योजनेतून पिक विमा काढण्यास सोमवार, दि. 3 ऑगस्ट 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी या वाढीव मुदतीत पिक विमा काढावा, असे आवाहन कृषि विभागातर्फे करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांना यावर्षीपासून फक्त 1 रुपयात पिक विमा काढावयाचा आहे. यासाठी 31 जुलै 2023 अंतिम मुदत देण्यात आली. शेतकऱ्यांच्या सोयीसाठी मुदतवाढ देण्यात आली असून आता दि. 3 ऑगस्ट 2023 पर्यंत विमा काढता येणार आहे.  खरीप हंगाम 2023 पासून सर्वसमावेशक पिक विमा योजना राबविण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. यात शेतकऱ्यांना प्रती अर्ज केवळ 1 रुपया विमा हप्ता भरावयाचा आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी सातबारा उतारा, आठ अ, बँक पासबुक, आधार कार्ड, पीक पेरणी स्वयं घोषणापत्र या कागदपत्रांची छायांकित प्रत सादर करावे, लागणार आहे.

खरीप हंगामातील खरीप ज्वारी, मूग, उडीद, तूर, मका, सोयाबीन, कापूस अशा एकूण सात पिकांसाठी विमा संरक्षण प्राप्त झाले आहे. शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी दि. 3 ऑगस्ट 2023 पर्यंत अर्ज करावेत, अधिक माहितीसाठी तालुका कृषि अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, बँकेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी केले आहे.

00000

डोळ्यांच्या आजाराबाबत नागरिकांनी काळजी घ्यावी

*आरोग्य विभागाचे आवाहन

बुलडाणा, दि. 31 : जिल्ह्यात सर्वत्र डोळ्यांच्या आजाराची साथ आली आहे. या आजाराबाबत नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. डोळ्यांच्या आजाराचा संसर्ग आणि घ्यावयाच्या काळजीबाबत आरोग्य यंत्रणांनी मार्गदर्शक सूचना केल्या आहेत.

डोळे येणे म्हणजे काय

आपल्याकडे पावसाळ्यात पाऊस पडत नाही. तेव्हा काही ठिकाणी उकाडा असतो. हवेतील दमटपणा या ऋतूत वाढलेला असतो. हे वातावरण संसर्गजन्य रोगांसाठी पोषक असते. सर्दी, पडसे, खोकला, ताप अशा आजाराबरोबरच दरवर्षी या दिवसात डोळे येण्याचीही साथ पसरते. या आजाराला conjunctivitis असेही म्हणतात. डोळे आलेल्या व्यक्तीच्या दीर्घकाळ संपर्कात येणे, तसेच अशा व्यक्तीचा रुमाल, त्याने वापरलेले डोळ्यांचे औषध अशा वस्तू वापरल्यामुळे निरोगी व्यक्तीलाही या साथीचा संसर्ग होण्याची शक्यता असते.

डोळे येण्याचा संसर्ग कसा होतो

डोळे येण्याचा संसर्ग सामान्यतः प्रथम एका डोळ्याला होतो. पण एक डोळा आल्यानंतर दुसऱ्या डोळ्यालाही संसर्ग होतोच असे नाही. एकदा व्यक्तीचे डोळे येऊन गेल्यास पुन्हा डोळे येण्याचा संसर्ग होत नाही, असे म्हटले जाते. त्यात तथ्य नाही. एकदा डोळे येऊन गेले की त्या साधीविरोधात शरीरात प्रतिकारशक्ती तयार होते, हे खरे, परंतू पुन्हा संसर्ग होणार नाही, असे नाही.

लक्षणे

डोळ्यांना संसर्ग झाल्याचे ओळखणे फारसे कठिण नाही. डोळ्यांत सतत काहीतरी गेल्याची भावना होणे, डोळ्यातून पाणी आणि घाण येणे, डोळा लाल होणे, ही डोळे येण्याची सामान्य लक्षणे आहेत. ही लक्षणे आधी एका डोळ्याला आणि नंतर दुसऱ्या डोळ्याला दिसू लागतात. संसर्गामुळे डोळ्यांच्या आतल्या कोपऱ्यांना आणि पापण्यांच्या आतल्या भागांना सूज येऊन लाल दिसू लागतात. डोळ्यातून पाणी येऊन किंवा पस सदृश्य घाण येऊन प्रसंगी पापण्या चिकटतात. काहीवेळा डोळ्यांना डोळे जड वाटते. एकदम तीव्र प्रकाश डोळ्यांना सहन होत नाही. काहींना कानाच्या समोरील भागातील ग्रंथींना सूज येते. विशिष्ट प्रकारच्या विषाणू संसर्गामुळे डोळे येण्याबरोबरच ताप, सर्दी, घसा दुखणे यात तक्रारीही जाणवतात. डोळे येण्याचा संसर्ग जीवाणूजन्य असेल, तर त्यामुळे दृष्टीवर सहसा काहीही परिणाम होत नाही. संसर्ग विषाणूजन्य असल्यास डोळ्यांना तात्पुरते अंधुक दिसणे, तीव्र प्रकाशाचा त्रास होणे, ही लक्षणे दिसू शकतात.

हा गंभीर आजार नव्हे पण

डोळे येणे हा गंभीर आजार नव्हे, तरीही डोळे आलेल्या व्यक्तीने साथ पसरणे टाळण्यासाठी घरीच थाबावे.

काय काळजी घ्यावी

वातानुकुलित वातावरणात हा संसर्ग झपाट्याने पसरतो. डोळे आलेल्या व्यक्तीने वापरलेल्या रुमाल, टिशू, साबण, टॉवल अशा वस्तू इतरांनी वापरू नयेत. डोळ्यांचा संसर्ग चार-पाच दिवस टिकतो. मग बरा होतो. पण या आजारावर स्वतःच्याच मनाने घरगुती उपाय करू नयेत. तुरटी, दूध, काजळ आणि इतर वस्तूंचा वापर करू नये. औषधांच्या दुकानातून कोणतेही डोळ्यांचे ड्रॉप अंदाजाने वापरू नयेत. संसर्ग झाल्याचे लक्षात येताच नेत्रतज्‍ज्ञांचा सल्ला घ्यावा.

डोळे आलेल्या व्यक्तीने घराबाहेर पडताना अथवा आपल्या कामाच्या ठिकाणी जाताना गॉगल वापरावा. डोळे चोळण्याची इच्छा झाली, तरी गॉगल घातल्यामुळे ते जाणीवपूर्वक टाळणे शक्य होते. यामुळे संसर्ग पसरण्याला अटकाव होऊ शकतो. डोळ्यांना वारंवार हात लावू नये. स्टेरॉइड ड्रॉपचा अतिवापर करू नये. संसर्ग झालेल्या डोळ्यांच्या रुग्णांचे ड्रॉप दुसऱ्याने टाकू नये. डोळ्यांना स्वच्छ पाण्याने सतत धुवावे. आपल्या सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवावा. कचऱ्यावर माशा बसून डोळ्याची साथ पसरवतात. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच औषधी डोळ्यात टाकावी, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक यांनी केले आहे.

000000








विभागीय आयुक्तांकडून अपघातातील जखमींची विचारपूस

*मृत्यू झालेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांचे सांत्वन

बुलडाणा, दि. 31 : मलकापूर येथील राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या दोन ट्रॅव्हल्सच्या अपघातातील जखमींची विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी मृत्यू झालेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांचे सांत्वन केले.

अमरनाथ यात्रेवरून येणारी बस आणि नागपूर-नाशिक खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसचा शनिवार, दि. 29 जुलै रोजी पहाटे तीन वाजता अपघात झाला. यात सहा प्रवाशांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती प्राप्त होताच विभागीय आयुक्त डॉ. निधी पांण्डेय यांनी जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड यांच्या समवेत घटनास्थळाला भेट दिली. अपघातानंतर गुरूद्वारा येथे थांबविण्यात आलेल्या प्रवाशांची भेट घेतली. यावेळी त्यांनी अपघातात मृत्यू पावलेल्यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच मृत्यूमुखी पडलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांच्या दु:खात सहभागी असल्याचे सांगितले. प्रवाशांना त्यांच्या गावी जाण्याची व्यवस्था केली. तसेच रस्त्यांमधील प्रशासकीय अधिकारी यांचे संपर्क क्रमांक दिले. प्रवासात मदत लागल्यास या क्रमांकावर संपर्क करण्यास सांगितले.

डॉ. पाण्डेय यांनी जिल्हा सामान्य रूग्णालयात अपघातातील जखमींची भेट घेतली. यावेळी त्यांच्या समवेत जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड, मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते आदी उपस्थित होते. यावेळी त्यांनी जखमींची आस्थेने चौकशी करून लवकर बरे होण्याच्या सदिच्छा दिल्या. तसेच जखमींवर योग्य उपचार करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या.

000000

राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य आ. ऊ. पाटील यांचा दौरा

बुलडाणा, दि. 31 : राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य आ. ऊ. पाटिल हे सोमवार, दि. 7 ऑगस्ट 2023 रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. श्री. पाटील दौरा कार्यक्रमादरम्यान विविध विभागांच्या बैठका घेणार आहेत.

श्री. पाटील यांच्या दौऱ्यानुसार, रविवार, दि. 6 ऑगस्ट 2023 रोजी सायंकाळी सात वाजता बुलडाणा येथील शासकीय विश्रामगृह येथे आगमन व मुक्काम. सोमवार, दि. 7 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, माध्यमिक व प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्यासोबत प्राथमिक व माध्यमिक शिक्षक संवर्गाच्या इतर मागासवर्ग बिंदुनामावली व जिल्हा बदलीबाबत बैठक व चर्चा करतील. त्यानंतर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती यांच्याशी बैठक व चर्चा करतील. दुपारी 2 वाजता शासकीय विश्रामगृह, खामगाव येथे आगमन. दुपारी 3 ते 4 वाजेपर्यंत खामगाव येथील लखेरा, लखेरिया जात समुहाची क्षेत्र पाहणी करतील. दुपारी 4 वाजता खामगाव येथून शेगाव कडे रवाना होतील. दुपारी 4.40 वाजता शासकीय विश्रामगृह शेगाव येथे आगमन. सायंकाळी 5 वाजता हडगर समाजासोबत बैठक घेतील. सायंकाळी 6.30 वाजता शेगाव येथून अकोला कडे प्रयाण करतील.

000000




अनुसूचित जाती उपयोजनेतून दर्जेदार कामे निर्माण व्हावी

-जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड

बुलडाणा, दि. 31 : जिल्ह्याला अनुसूचित जाती उपयोजनेतून निधी प्राप्त होतो. या निधीतून नागरिकांना उपयुक्त आणि दर्जेदार कामे निर्माण व्हावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड यांनी केले.

सन 2023-24 या वर्षातील अनुसूचित जाती उपयोजनेतून करण्यात येणाऱ्या कामांची माहिती जिल्हाधिकारी यांनी घेतली. यावेळी समाज कल्याण सहायक आयुक्त डॉ. अनिता राठोड उपस्थित होत्या.

जिल्हाधिकारी डॉ. तुम्मोड म्हणाले, अनुसूचित जाती उपयोजनेतून नियतव्यय प्राप्त झाला आहे. त्यानुसार विभागांनी आपली मागणी नोंदवावी. उपयोजनेतून कामे करताना त्यातून संपत्ती निर्माण होईल, अशी कामे करण्यात यावीत. गेल्या वर्षी करण्यात आलेल्या कामांची गुणवत्ता तपासण्यात यावी. तसेच कामांबाबतचे रेकॉर्ड करून चांगल्या कामांची पुस्तिका तयार करावी.

जिल्हा नियोजनमध्ये यावर्षीपासून जिल्ह्याची बलस्थाने शोधून कामे करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे अनुसूचित जाती उपयोजनेतून विकासाची कामे करण्यात यावीत. गेल्या कालावधीत पूरामुळे पाच तालुक्यातील रस्ते, शाळा इमारतींचे नुकसान झाले आहे. जिल्हा नियोजन आणि अनुसूचित जाती उपयोजनेतून निधी उपलब्ध असल्याने ही कामे तातडीने करता येणे शक्य आहे. यादृष्टिकोनातून प्रत्येक विभागांनी आपले प्रस्ताव सादर करावेत. अनुसूचित जाती उपयोजनेतून नाविन्यपूर्ण योजनेसाठी निधी राखीव ठेवण्यात आला आहे. यासाठी विभागांनी प्रस्ताव सादर करावेत. आलेल्या प्रस्तावाची छाननी करून अंतिम करावेत, त्यांना प्राधान्याने निधी उपलब्ध करून द्यावा, अशा करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

000000


No comments:

Post a Comment