Thursday 27 July 2023

DIO BULDANA NEWS 27.07.2023

 



शालेय क्रीडा स्पर्धांसाठी ऑनलाईन प्रक्रिया

-जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड

*शाळा, महाविद्यालयांनी नोंदणी करण्याचे आवाहन

 

बुलडाणा, दि. 27 : येत्या शैक्षणिक वर्षात क्रीडा विभागातर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या शालेय क्रीडा स्पर्धाऑनलाईन प्रक्रिया होणार आहे. सहभागासाठी शाळा, महाविद्यालयांची नोंदणी अनिवार्य आहे. याच सॉफ्टवेअरद्वारे क्रीडा स्पर्धेची प्रक्रिया होणार आहे, त्यामुळे शाळा, महाविद्यालयांनी नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड यांनी केले आहे.

जिल्हा क्रीडा परिषदेची सभा बुधवारी, दि. 26 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव उपस्थित होते.

शासनाच्या निर्णयानुसार सर्व शालेय क्रीडा स्पर्धांसाठी ऑनलाईन प्रक्रिया आवश्यक केली आहे. यातूनच स्पर्धेचे प्रमाणपत्र, विभाग, राज्य स्पर्धेसाठी आदेश पत्र, तसेच प्रवेश अर्ज आदी कामे करणे सुलभ होणार आहे. कामकाज पेपरलेस होणार असल्याने गतीमानता येणार आहे.

क्रीडा विभागातर्फे यावर्षी 90 क्रीडा स्पर्धा घेण्यात यातील कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, मैदानी स्पर्धा, कुस्ती, फुटबॉल, क्रिकेट, योगासन, बुद्धीबळ, बॅडमिंटन या दहा खेळांच्या स्पर्धा तालुकास्तरावर घेण्यात येणार आहे. या स्पर्धा 9 ऑगस्ट ते 14 ऑक्टोबर दरम्यान घेण्यात येणार आहे. जिल्ह्यात 15 विभागीय क्रीडा स्पर्धा घेण्यात येणार आहे. तसेच तलवारबाजीची राज्यस्तरीय स्पर्धा घेण्यात येणार आहे. या सर्व स्पर्धा उत्कृष्टरित्या पार पाडाव्यात, यासाठी नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी यावेळी दिल्या.

00000

सैनिकी मुलींचे वसतिगृह भाड्याने देण्यासाठी प्रस्ताव आमंत्रित

बुलडाणा, दि. 27 : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या अधिपत्याखालील सैनिकी मुलींचे वसतिगृह भाडेतत्वावर देण्यात येणार आहे. यासाठी इच्छुकांनी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सैनिकी मुलींचे वसतिगृह, गायरान परीसर, सागवन, बुलडाणा हे निसर्गरम्य वातावरणात असून प्रशस्त दोन मजली इमारत आहे. या वसतिगृहापासून राजर्षी कॉलेज ऑफ इंजिनिअरींग आणि फार्मसी कॉलेज जवळ आहे. इमारतीमध्ये राहण्यासाठी १२ रूम, स्वयंपाकगृह, भोजनकक्ष तथा मनोरंजन हॉल तसेच पाच हजार चौरस फुटाचे प्रशस्त क्रिडांगणआणि येण्या-जाण्यासाठी ३० फुट सिमेंट रस्ता आहे.

ईच्छुकांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, बसस्थानकासमोर, बुलडाणा, दूरध्वनी क्र. 07262-242208 या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक अधिकारी यांनी केले आहे.

00000

निर्यात वाढीसाठी बुधवारी कार्यशाळा

बुलडाणा, दि. 27 :नागपूर येथील विदेश व्यापार महानिदेशालयातर्फे निर्यातवाढीसाठी बुधवारी, दि. 2 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 11 ते 1 वाजेदरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात एक्स्पोर्ट आउटरिच कार्यक्रम घेण्यात येणार आहे. यात अतिरिक्त महासंचालक डॉ. व्ही. रमण, मार्गदर्शन करणार आहेत.

नागपूर येथील डीजीएफटी तज्‍ज्ञांची चमू आयइसी, कस्टम प्रक्रिया, एमएसएमइ योजना, निर्यात कसे मिळवावे, बायर-सेलर मीट, इपीसीची भूमिका, वित्तीय सहायता मिळण्यासाठी पर्याय, ई-कॉमर्स बाबत सादरीकरण करणार आहेत.

जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड यांचेही मार्गदर्शन होणार आहे. निर्यातीसंदर्भात अडचणी, विविध योजनांबाबत प्रश्नोत्तरांना तज्‍ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. पंतप्रधानांच्या संकल्पनेच्या अंमलबजावणीसाठी निर्यात बंधू योजनेच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्याला निर्यात केंद्रात बदलण्यासाठी, स्थानिक वस्तू व सेवांच्या निर्यातीला वाव मिळुन प्रोत्साहन देण्यासाठी, आत्मनिर्भर भारत संकल्पनेनुसार व्होकल फॉर लोकल आणि मेक इन इंडियासाठी प्रत्येक जिल्हा हा निर्यात केंद्र करण्याचा मानस आहे. जिल्ह्यातील निर्यातीस वाव, तसेच प्रोत्साहन मिळून उत्पादन आणि रोजगार निर्मिती होणार आहे.

जिल्ह्यातील उद्योजक, औद्योगिक संघटना एफपीओ, शेतकरी कंपन्या एफपीओ, एक्स्पोर्ट करण्यास इच्छुक युवक-युवती, तसेच कार्यरत एक्स्पोर्टर्सनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सुनिल पाटील यांनी केले आहे.

000000

रक्षाबंधनासाठी पोस्टाची विशेष व्यवस्था

बुलडाणा, दि. 27 : यावर्षीच्या रक्षाबांधनानिमित्त पोस्ट ऑफीसतर्फे राखी पाठविण्याची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

यावर्षी पोस्ट ऑफिस मार्फत देश-विदेशात राखी पाठवण्याची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. राखी पाठविण्यासाठी पाकिटावर ‘राखी टपाल’ नमूद करून अचूक पिन कोड लिहावा, नागरिकांनी आपल्या नजिकच्या पोस्ट ऑफिसमार्फत राखी, भेटवस्तू पाठविण्याच्या सोयीचा लाभ घ्यावा, असे आवाहन डाक अधीक्षक गणेश अंभोरे यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment