Wednesday 19 July 2023

DIO BULDANA NEWS 19.07.2023

 



पिक विम्यासाठी चार लाख शेतकऱ्यांची नोंदणी

-जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड

*साडेपाच लाख पिक विमा नोंदणीचे उद्दिष्ट

बुलडाणा, दि. 19 : शासनाने यावर्षीपासून एक रूपयात विमा काढण्याची योजना सुरू केली आहे. यासाठी शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. 31 जुलैपर्यंत पिक विमा काढण्याची मुदत आहे. तरीही आतापर्यंत चार लाख १० हजार ५७८ शेतकऱ्यांनी पिक विमा काढला आहे. जिल्ह्यातून सुमारे साडेपाच लाख शेतकऱ्यांची पिक विमासाठी नोंदणी करण्याचे उद्दिष्ट असल्याचे असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड यांनी आज घेतलेल्या पत्रपरिषदेत दिली.

जिल्हाधिकारी डॉ. तुम्मोड म्हणाले, गेल्या वर्षीच्या पीक विमा कंपनीचा अनुभव पाहून यावेळचे नियोजन करण्यात आले आहे. सध्या शेतकऱ्यांनी पिक विमा काढण्यासाठी पुढे येणे गरजेचे आहे. आधार, पॅन आणि बँकेची माहिती यावरून पिक विमाची कार्यवाही करण्यात येत आहे. शेतकऱ्यांमध्ये जागृती व्हावी, यासाठी तीन वाहनाद्वारे प्रचार करण्यात येत आहे. तसेच कृषि उत्पन्न बाजार समिती आणि कॉमन सर्व्हीस सेंटरवर पिक विमा काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी सर्व सरपंचांना पत्र देण्यात आले आहे.

यावर्षीच्या खरीप पिकाची परिस्थिती सध्यस्थितीतील पावसामुळे चांगली झाली आहे. जिल्ह्यात 98 टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. दुबार पेरणीचे संकट नसले तरी पुरेसा बियाण्यांचा साठा उपलब्ध आहे. तसेच डीएपी खताचा साठा बफर स्टॉक मोकळा करण्यात आला आहे. जून महिन्याच्या तुलनेत जुलै महिन्यात चांगला पाऊस झाला आहे. सरासरी पावसाच्या 30 टक्के पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात 98 टक्के क्षेत्रावर पेरणी झाली असून यावर्षी सोयाबीन, कापूस, तूर, मका ही मुख्य पिक आहेत.

जिल्ह्यात काही ठिकाणी कपाशीवर लाल्या रोग आल्याची तक्रारी प्राप्त झाल्या. मात्र एवढ्या लवकर कपाशीवर लाल्या रोग पडत नाही. कृषि शास्त्रज्ञांच्या मते आवश्यक अन्नद्रव्ये मिळाले नसल्याने पिकाची पाने लाल पडत आहेत. याबाबत कृषि विद्यापिठाची चमू गुरूवारी येऊन पाहणी करणार आहेत. तसेच पिकांचे नमूने नागपूर येथे पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली.

00000

सर्व शिधावाटप दुकानामधून पोस्‍ट बँकेच्या सेवा

बुलडाणा, दि. 19 : केंद्र शासनाच्या निर्णयानुसार रास्त भाव दुकानातून भारतीय पोस्ट पेमेंट बँकेच्या सुविधा मिळणार आहे. नागरिकांनी या सेवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन डाक विभागाने केले आहे.

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक द्वारे सर्व शिधावाटप, रास्त भाव दुकानांमधून बँकेच्या सेवा उपलब्ध करून देण्यासाठी शिधावाटप, रास्त भाव दुकानदारांकडे बँकांचे व्यावसायिक प्रतिनिधी नियुक्त करण्यात येणार आहेत. इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक ही केंद्र शासनातर्फे चालविण्यात येणारी १०० टक्के सरकारच्या मालकीची बँकिंग सेवा देणारी बँक आहे. भारत सरकारच्या दळणवळण मंत्रालयांतर्गत असलेल्या टपाल विभागातर्फे ही सेवा चालविली जाते. देशातील सर्वात सुलभ, परवडणारी आणि विश्वासार्ह बँक बनण्याच्या दृष्टीकोनातून बँकेची सुरुवात केली आहे.

बँकेतर्फे धन हस्तांतरण, थेट लाभ हस्तांतरण, देयक भरणा, आरटीजीएस आदी सुविधा देण्यात येतात. सदर बँक ही 100 टक्के कागदविरहित कामकाज असणारी बँक आहे, जी ग्राहकांना ओटीपी किंवा बायोमेट्रिक वापरून डिजिटल व्यवहाराद्वारे मोबाईल अप्लिकेशन, पोस्टमन आणि पोस्ट ऑफिसमधून व्यवहार करण्यास सक्षम करते. बँक आपल्या पोस्टमनच्या माध्यमातून ग्राहकांना घरपोच सेवा देण्यात अग्रेसर आहे. बँकांमार्फत दिल्या जाणाऱ्या सेवा रास्त भाव दुकान मार्फत दिल्या जाऊ शकतात. तसेच दोन्ही विभागांसाठी परस्पर फायदेशीर ठरू शकते, त्याचबरोबर रास्त भाव दुकानदाराचे उत्पन्न सुधारेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, यामुळे बँकांमार्फत दिल्या जाणाऱ्या सेवा ग्रामीण जनतेपर्यंत पोहोचतील.

सामान्य नागरिकांसाठी, विशेषत: दुर्गम भागात बँकिंग आणि नागरिक केंद्रित सेवा मोठ्या प्रमाणात सुधारतील. या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी रास्त भाव दुकानदारांमध्ये जागरूकता निर्माण करून जेथे शक्य असेल तेथे बँकांच्या सेवा प्रदान करता येतील. हा उपक्रम यशस्वी झाल्यास लाखो नागरिकांच्या जीवनमानात सुलभता येणार आहे. ही सेवा यशस्वी करावी, असे आवाहन डाक अधिक्षक गणेश आंभोरे यांनी केले आहे.

000000

मेहकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत पदभरती

बुलडाणा, दि. 19 : मेहकर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत घड्याळी तासिका तत्वावर पदभरती करण्यात येणार आहे. ही रिक्त पदे शैक्षणिक वर्ष सन 2023-24मध्ये नियमित शिल्पनिदेशक रुजू होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात भरण्यात येणार आहे.

संस्थेतील जोडारी या व्यवसायासाठी शिल्पनिदेशक, 1 पद भरण्यात येणार आहे. यासाठी पात्रता ही अनुभव  प्रमाणपत्र, आयटीआय डिप्लोमा, डिग्री, सीटीआय, शैक्षणिक कागदपत्रे, तसेच संगणकाचे ज्ञान आवश्यक आहे. संधाता व्यवसायासाठी शिल्पनिदेशक 2 पदे, विजतंत्री साठी शिल्पनिदेशक 2 पदे, सुतार कामासाठी शिल्पनिदेशक 1 पदे, इम्पलाबिलीटी स्कीलसाठी शिल्पनिदेशक 1 पदे भरण्यात येणार आहे.

उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती सह दि. 31 जुलै 2023पर्यंत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, डोणगाव रोड, मेहकर येथे अर्ज पाठवावेत, असे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य व्ही. बी. शिरसाट यांनी केले आहे.

000000000




मिलीपेड्स किडींचे उपाययोजना करण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 19 : पैसा, वाणी, मिलीपेड्स या किडींमुळे होणाऱ्या शेतीपिकाच्या नुकसानीवर उपाय योजना कराव्यात, असे आवाहन कृषि विभागातर्फे शेतकऱ्यांना करण्यात आले आहे.

किडीच्या उपाययोजना करण्यासाठी शेतातील पालापाचोळा किंवा वाळलेले, कुजलेले काडीकचरा गोळा करून नष्ट करावे. वाणी रात्री जास्त सक्रीय असल्याने रात्रीच्या वेळी, शेतात गवताचे ढीग करून ठेवावेत आणि सकाळी गवताच्या ढिगाखाली जमा झालेले वाणीचे समूह जमा करून मिठाच्या किंवा साबणाच्या द्रावणात टाकावे. शेतातील आर्द्रता आणि लपण्याची ठिकाणे कमी करून बांधावरील गवत दगड काढून बांध  मोकळा ठेवावा.

जास्त आर्द्रता व अन्नाचा पुरवठा नसल्यास काही दिवसातच वाणी मरतात. ज्या ठिकाणी शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वी बियाण्याला बीज प्रक्रिया केली आहे, तेथे प्रादुर्भाव कमी आढळून येतो. पिकामध्ये वेळेवर कोळपणी करावी, त्यामुळे जमिनीतील अंडी आणि लपून बसलेल्या वाणी किडी उघड्या पडून नष्ट होतात. चांगला पाऊस पडल्यास या किडींचे नैसर्गिकरीत्या नियंत्रण होते. ज्या शेतांमध्ये वारंवार या किडींचा प्रादुर्भाव होत असेल तिथे पेरणीपूर्वी कार्बोसेलफॉन 6 टक्के दाणेदार किंवा क्लोरोपायरीफॉस १० टक्के दाणेदार किंवा फिप्रोनील 3 टक्के दाणेदार ५ किलो प्रति १०० किलो शेणखतात मिसळून एक हेक्टर शेतात पसरावे. सदरील किटकनाशके प्रयोगामध्ये परिणामकारक आढळून आले आहे. शेतकऱ्यांनी या उपाययोजनांचा अवलंब करावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मनोज ढगे यांनी केले आहे.

00000

नागरिकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन

*पालखीमुळे मार्गात बदल

बुलडाणा, दि. 19 : श्री संत गजानन महाराज यांच्या परतीच्या पालखीनिमित्त सिंदखेडराजा-मालेगाव मार्गात बदल करण्यात आले आहे. नागरिकांनी याबाबत नोंद घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

सध्या प्रचलित असलेला सिंदखेडराजाकडून येणारी संत गजानन महाराज पालखी शहरात प्रवेश करणार असल्याने मेहकर शहराचे मुख्य मार्गाने पालखी परिक्रमा करणार असल्यामुळे ही वाहतूक सुलतानपूर, मेहकर, मालेगाव या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्ग सिंदखेराजा-देऊळगांव राजा-चिखली-लोणार फाटा-सारंगपुर फाटा-खंडाळा बायपास मार्गे वाशिमकडे वळविण्यात आली आहे. तर मालेगाव, डोणगाव, मेहकर, सुलानपूर रस्ता पर्यायी मार्ग खंडाळा बायपास, सोनाटी बायपास, लोणार फाटा मार्गे चिखलीकडे वळविण्यात आली आहे. हा वाहतूक बदल दि. 19 जुलै 2023 रोजी दुपारी 1 वाजेपासून ते दि. 20 जुलै 2023 रोजी सकाळी 5 वाजेपर्यंत राहणार आहे. या पर्यायी मार्गाचा नागरिकांनी अवलंब करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड यांनी केले आहे.

0000000

सफाई कर्मचाऱ्यांनी कर्ज योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 19 : राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त व विकास महामंडळ, नवी दिल्ली यांच्या कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील सफाई कर्मचाऱ्यांकरीता 81 कर्ज प्रकरणांचे भौतिक आणि 3 कोटी 70 लाख रुपये एवढ्या रकमेचे आर्थिक उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. इच्छुक अर्जदारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने mpbcdc.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर सादर करावेत, असे आवाहन महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक मिलिंद धांडे यांनी केले आहे.

0000000

बाल संरक्षणासाठी कार्यरत संस्थांनी अर्ज करण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 19 : जिल्ह्यातील बालकांच्या संरक्षणासाठी कार्यरत संस्थांकडून स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधीची सदस्य म्हणून नामनिर्देशन करण्यात येणार आहे. यासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 कलम 44 व 45 तसेच महाराष्ट्र राज्य बाल न्याय नियम 2018 मधील तरतुदीनुसार प्रतिपालकत्व व 26 नुसार प्रायोजकत्व योजनेबाबत तरतुद करण्यात आली आहे. या योजनेच्या प्रभवी अमलबजावणीकरीता जिल्हास्तरावर प्रायोजकत्व आणि प्रतिपालकत्व मान्यता समिती गठन करण्यात येणार आहे. समितीवर जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्यामार्फत जिल्ह्यात बाल संरक्षण क्षेत्रात कार्य करणाऱ्या स्वयंसेवी संस्थाकडून एका स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधीचे सदस्य म्हणून नामनिर्देशन मागविण्यात येत आहे. प्रतिपालकत्व आणि प्रायोजकत्व मान्यता समितीमध्ये सदस्य म्हणून निवडण्याकरीता प्रस्तावासहित अर्ज जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, सुवर्णनगर, बसस्थानक मागे, मुठ्ठे ले आऊट, डॉ. जोशी हॉस्पिटल जवळ, बुलडाणा या पत्यावर दि. 27 जुलै 2023 पर्यंत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांनी केले आहे.

0000000

एकविध क्रीडा संघटनेची आज सभा

बुलडाणा, दि. 19 : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद आणि एकविध खेळाच्या अधिकृत संघटनांच्या तांत्रिक सहकार्याने दरवर्षी तालुका ते राज्यस्तरापर्यंतच्या विविध खेळांच्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. यासाठी गुरूवार, दि. 20 जुलै 2023 रोजी दुपारी 4 वाजता सभा आयोजित करण्यात आली आहे.

सन 2023-24 मध्ये विविध खेळांच्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन आणि नियोजन करण्याचे दृष्टीने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, क्रीडानगरी, जांभरुन रोड येथे, जिल्हा क्रीडा अधिकारी यांचे अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील सर्व 93 खेळ प्रकाराच्या एकविध खेळ संघटनांचे पदाधिकारी यांची सभा घेण्यात येणार आहे. जिल्ह्यातील एकविध खेळ संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक संघटनेस संलग्न असलेल्या राज्य संघटनेच्या संलग्नतेच्या प्रमाणपत्रासह सभेकरीता उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment