Friday 14 July 2023

DIO BULDANA NEWS 13.07.2023

 उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना अडीच लाखाचा पुरस्कार

*कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना तीन हजार शिष्यवृत्ती

*शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, गुणवत्ता पुरस्कार

बुलडाणा, दि. 13 :  अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थी आर्थिक कारणामुळे शिक्षणापासून वंचित राहू नये, तसेच त्यांना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे, यासाठी सामाजिक न्याय विभागातर्फे विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येतात. राजर्षि छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती आणि गुणवत्ता पुरस्कार या दोन योजनेने विद्यार्थ्यांची आर्थिक अडचण दूर केली असून पुढील शिक्षणासाठी त्यांना प्रोत्साहन देण्याचे महत्वाचे कार्य केले आहे.  

अनुसूचित जाती आणि नवबौद्ध विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा सुधारावा आणि त्यांच्या गुणवत्तेमध्ये वाढ व्हावी, तसेच सर्वसाधारण विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्पर्धेमध्ये ते टिकून राहावेत, यासाठी गुणवंत विद्यार्थ्यांना सक्षम करण्यासाठी राजर्षि छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते. दहावीमध्ये 75 टक्के आणि त्यापेक्षा जास्त गुण मिळवून अकरावीमध्ये प्रवेश घेणाऱ्या अनुसूचित जातीच्या मुला-मुलींसाठी ही योजना लागू आहे.

शिष्यवृत्ती योजना अकरावी आणि बारावीमध्ये शिकणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालयातील अनुसूचित जाती आणि नवबौध्द मुला-मुलींना दिली जाते. विद्यार्थ्यांना दहा महिन्यांकरीता दरमहा 300 रुपयांप्रमाणे संपूर्ण वर्षभरासाठी तीन हजार इतकी शिष्यवृत्ती दिली जाते. या शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज सादर करावे लागतात.

इयत्ता दहावी आणि बारावीत विशेष उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाच्या मुलामुलींना उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्याकरिता राजर्षि छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार प्रदान केले जातात. सर्वसाधारण विद्यार्थ्यांमधून राज्यात प्रथम आलेल्या विद्यार्थ्यास 2 लाख 50 हजार रुपयांचा हा पुरस्कार दिला जातो.

सर्वसाधारण विद्यार्थ्यांमधून प्रत्येक बोर्ड मध्ये प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांस 1 लाख रुपये, प्रत्येक विभागीय बोर्डाच्या गुणवत्ता यादीमध्ये आलेल्या प्रत्येक अनुसूचित जाती, विजाभज आणि विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यास 50 हजार, सर्वसाधारण विद्यार्थ्यांमधून तालुक्यामध्ये प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना 10 हजार, सर्वसाधारण विद्यार्थ्यांमधून प्रत्येक माध्यमिक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयांमधून दहावी आणि बारावीच्या परीक्षेत प्रथम आलेल्या विद्यार्थ्यास पाच हजार रुपये रोख, स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येते. 

उच्च शिक्षणासाठी गुणवत्ता शिष्यवृत्ती

देशातील नामांकित शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश मिळालेल्या अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांना मोफत उच्च शिक्षण देण्यासाठी ही योजना राबविली जाते. योजनेच्या लाभासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न 6 लाख रुपयांपर्यंत असावे. विद्यार्थी राज्य शासनाने मान्य केलेल्या संस्थेत प्रवेशित असावा लागणार आहे.

वसंतराव नाईक गुणवत्ता पुरस्कार

इयत्ता दहावी आणि बारावीमध्ये राज्य आणि बोर्डात प्रथम येणाऱ्या विमुक्त जाती व भटक्या समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणास प्रोत्साहन देण्यासाठी वसंतराव नाईक गुणवंत पुरस्कार दिला जातो. दहावीत राज्यात प्रथम आलेला विद्यार्थी आणि विद्यार्थिनीला प्रत्येकी एक लाख, दहावीच्या परीक्षेत विभागीय बोर्डात प्रथम आलेला विद्यार्थी आणि विद्यार्थिनीला प्रत्येकी 51 हजार आणि बारावीच्या परीक्षेत प्रथम आलेला विद्यार्थी व विद्यार्थिनीला प्रत्येकी 51 हजार रोख, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येते.

00000

युवतींसाठी राजमाता जिजाऊ स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण

*तालुकास्तरावर तीन दिवसांचे कार्यक्‌रम

*युवतींना नि:शुल्क प्रशिक्षण देण्यात येणार

बुलडाणा, दि. 13 : अलिकडील काळात महिला आणि मुलींवर होणारे क्रुर हिंसाचार आणि त्यातून केली जाणारी हत्या शासन आणि समाजासमोरील मोठे आव्हान ठरत आहे, त्यातून प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. राज्यातील महिला आणि मुलींवर होणाऱ्या अत्याचाराला आळा घालण्यासाठी राज्यात राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

राज्यात राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम तालुकास्तरावर आयोजन आणि अंमलबजावणी करण्यात येत आहे, यासाठी भारतीय स्त्री शक्ती संस्था आणि विद्यार्थी ट्रस्टचे सहकार्य देण्यात येणार आहे, जिल्ह्यातील सर्व तालुकास्तरावर राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन आणि अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकारी आणि संरक्षण अधिकारी यांनी समन्वयाने कार्यक्रम राबविण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी यांनी सोपविली आहे.

महिला व मुलींवर होणाऱ्या अत्याचाराला आळा घालण्यासाठी राज्यात राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम आयुक्त, महिला व बाल विकास, पुणे यांच्या अधिपत्याखालील महात्मा गांधी प्रशासन प्रशिक्षण संस्था या स्वायत्त संस्थेच्या माध्यमातून राबविण्यासही मान्यता देण्यात आली आहे. सदर प्रशिक्षण हे महात्मा गांधी प्रशासन प्रशिक्षण या स्वायत्त संस्थेच्या माध्यमातून राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण प्रशिक्षक कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयुक्त, महिला व बाल विकास यांच्या स्तरावरून अव्यावसायिक तत्वावर आणि कोणताही आर्थिक मोबदला मिळणार नसल्याच्या अटीवर संस्थेची निवड करण्यात येणार आहे.

यात शैक्षणिक संस्था, राज्यातील विद्यापिठे, विद्यार्थी संघटना, विद्यार्थी निधी ट्रस्ट, स्वयंसेवी संस्था, भारतीय स्त्री शक्ती, तसेच युवतींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्याचे नियोजन दोन टप्प्यात करण्यात आले आहे. पहिल्या टप्यात दिले जाणारे समुपदेशन पहिल्या दिवशी महिला व मुलींवरील हिंसाचार संकल्पना आणि सद्यस्थिती ९० मिनिटे आणि तंत्रज्ञान व महिला व मुलींना असलेले धोके या विषयावर तज्‍ज्ञ अधिकारी ६० मिनिटे मार्गदर्शन करणार आहे. निवड झालेल्या संस्थेमार्फत प्रशिक्षण पुर्णतः निःशुल्क देण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्यात दिले जाणारे प्रशिक्षण व त्याचा सराव यासाठी दुसऱ्या दिवशी तालुक्यांमध्ये प्रत्येकी 20 प्रशिक्षकाद्वारे एक हजार युवतींना स्वसंरक्षण प्रशिक्षणाचे वेळापत्रकानुसार स्वसंरक्षणाचे प्राथमिक प्रशिक्षण ४५ मिनिटे, आधुनिक प्रशिक्षण ४५ मिनिटे असे राहील. तिसऱ्या दिवशी प्रात्यक्षिक सराव ९० मिनिटेप्रमाणे दोन दिवसीय प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

तीन दिवसीय प्रशिक्षणापैकी पहिल्या टप्यात दिले जाणारे समुपदेशन हे पहिल्या दिवशी दि. १७ जुलै २०२३ रोजी नगर परिषद, टॉऊन हॉल, नांदुरा येथे सकाळी १० ते १ यावेळेत दिले जाणार आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशीचे प्रशिक्षण हे संबधित युवतींच्या शाळा आणि महाविद्यालयात ५० मुलींची बॅचेससाठी १ प्रशिक्षक याप्रमाणे वेळेनुसार पार पडणार आहे, सदर प्रशिक्षण १५ ते २५ वर्षे या वयोगटातील मुलींसाठी आहे,

नांदुरा तालुक्यातील शाळा व महाविद्यालयांनी युवतींना राजमाता जिजाऊ युवती स्वसंरक्षण तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी होण्यास प्रोत्साहीत करावे, तसेच shakti.msbsvet.edu.in या संकेतस्थळावर युवतींनी प्रशिक्षण कार्यक्रमास सहभाग घेण्यासाठी नोंदणी करावी अथवा बाल विकास प्रकल्प अधिकारी, नांदुरा आणि संरक्षण अधिकारी नांदुरा कार्यालयात नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000

गजानन महाराज पालखीनिमित्त वाहतूक मार्गात बदल

बुलडाणा, दि. 13 : श्री गजानन महाराज पालखीचे दि. 16 जुलै 2023 रोजी दुपारी 2 वाजता माळ सावरगाव, ता. सिंदखेडराजा येथे जिल्ह्याच्या हद्दीत आगमन होत आहे, परतीच्या पालखी बंदोबस्तासाठी दि. 16 ते 17 जुलै 2023 पर्यंत वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात आला आहे.

सध्याचा प्रचलित मार्ग मालेगाव (जिल्हा वाशिम) मेहकर- सुलतानपुर - सिंदखेडराजा - न्हावा- जालना या रस्त्याला पर्यायी मार्ग मालेगाव (जिल्हा वाशिम) मेहकर - चिखली - देऊळगाव राजा - जालना या रस्त्यावर दि. 16 जुलै 2023 रोजी 00.01 वाजल्यापासून ते दि. 17 जुलै 2023चे 24.00 वाजेपर्यंत वळविण्यात आली आहे.

000000

शाळा नोंदणी सॉफ्टवेअर कार्यशाळेस उपस्थित राहण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 13 : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा क्रीडा परिषदेच्या वतीने तालुका ते राष्ट्रीयस्तरापर्यंत विविध खेळांच्या क्रीडा स्पर्धा घेण्यात येतात. सन 2023-24 या वर्षापासून क्रीडा स्पर्धांचे आयोजनापुर्व ऑनलाईन पद्धतीने शाळांच्या नोंदणीकरीता ऑनलाईन सॉफ्टवेअर आणि ॲपच्या माध्यमातून शाळांची प्रवेशिका, प्रवेश फी आणि इतर आवश्यक माहिती या कार्यशाळेमध्ये तज्‍ज्ञ मार्गदर्शकांमार्फत दरम्यान देण्यात येणार आहे. यावेळी क्रीडा शिक्षक यांनी संगणक चालकासह उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन जिल्हा क्रीडा संकुल, क्रीडानगरी, जांभरुन रोड, बुलढाणा येथे सोमवार, दि. 17 जुले 2023 रोजी दोन सत्रामध्ये करण्यात आले आहे. यामध्ये सकाळच्या सत्रात सकाळी 10 ते 1 वाजेपर्यंत मोताळा, मलकापूर, खामगाव, शेगाव, संग्रामपूर, जळगाव जामोद आणि नांदुरा, तर दुपारच्या सत्रामध्ये दुपारी 2 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत बुलडाणा, सिंदखेड राजा, मेहकर, लोणार, चिखली आणि देऊळगाव राजा या तालुक्यांमधील शाळा आणि महाविद्यालयातील क्रीडा शिक्षक व संगणकचालक यांनी तालुकानिहाय ऑनलाईन प्रशिक्षण कार्यशाळेस उपस्थित राहावे.

सदर प्रशिक्षणास जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयातील क्रीडा शिक्षक, संगणक चालक अनुपस्थित राहिल्यास आणि त्यामुळे शाळेचा संघ स्पर्धेस वंचित राहिल्यास संबंधित शाळा, महाविद्यालय जबाबदार राहतील, याची नोंद घ्यावी. जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयातील क्रीडा शिक्षक यांनी संगणक चालक यांच्यासह उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी केले आहे.

00000

राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी नामांकने करण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 13 : लहान मुलांना असामान्य शौर्यासाठी आणि शैक्षणिक, क्रीडा, कला व संस्कृती तसेच समाजसेवेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल भारत सरकारकडून पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार देण्यात येतो. पुरस्कारासाठी awards.gov.in पोर्टल सुरू करण्यात आले आहे.  इच्छुकांनी दि. 31 ऑगस्ट 2023 पर्यंत नामांकने सादर करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000

No comments:

Post a Comment