Wednesday 12 July 2023

DIO BULDANA NEWS 12.07.2023

 कौशल्याची मागणी सर्वेक्षण मोहिमेत सहभाग नोंदवावा

-जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड

बुलडाणा, दि. 12 : उद्योजकांना त्यांच्या अपेक्षेनुसार मनुष्यबळ उपलब्ध होण्यासाठी उद्योगातील आवश्यक जॉबरोलनिहाय नोंदणी 31 जुलैपर्यंत करावी, तसेच कौशल्याची मागणी सर्वेक्षण मोहिमेत उद्योजकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड यांनी केले आहे.

उद्योजकांच्या समस्या जाणून घेताना मनुष्यबळाच्या प्रश्नाबाबत जिल्हाधिकारी डॉ. तुम्मोड यांनी उद्योजकांच्या सोयीसाठी शासनाने उद्योजकांना आवश्यक असलेल्या मनुष्यबळाच्या उपलब्धतेसाठी नोंदणी करावी. या नोंदणीमुळे मनुष्यबळ उपलब्ध होण्यासोबतच उद्योजक आणि रोजगार आवश्यक असलेल्या युवकांची सोय होणार आहे. जिल्ह्यामध्ये उत्पादन आणि सेवा क्षेत्रातील सूक्ष्म, लघु आणि मोठ्या उद्योगांमध्ये कुशल, अर्धकुशल आणि अकुशल अशा विविध प्रकारच्या जॉबरोलनिहाय आवश्यक असलेल्या कौशल्याची गरज असते. ही गरज कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता आणि नाविण्यता विभागाकडे नोंदविल्यास त्या कौशल्य अभ्यासक्रमाचा समावेश कौशल्य विकास प्रशिक्षणामध्ये करण्यात येणार आहे.

शासनाच्या प्रयत्नामुळे प्रशिक्षणामध्ये यशस्वी उमेदवारांना रोजगार, स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याच्या प्रमाणात वाढ होते. त्यानुसार जिल्ह्यात सर्वेक्षण मोहिम सुरू करण्यात आली आहे. सर्व उद्योगांकरिता मनुष्यबळामध्ये कौशल्याची आवश्यकता नोंदणी दि. 31 जुलै 2023 पर्यंत करता येणार आहे. सदर मोहिमेंतर्गत सर्वेक्षणासाठी गुगल फॉर्म तयार करण्यात आला आहे. या गुगल फॉर्म लिंकद्वारे उद्योगातील आवश्यक जॉबरोलनिहाय कौशल्याची गरज नोंदवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड यांनी आस्थापनाना केली आहे.

नोकरी ईच्छुक उमेदवारांना रोजगार उपलब्ध करून देणे, तसेच उद्योजकांना आवश्यक मनुष्यबळ पुरविण्यासाठी उद्योजक आणि कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविण्यता विभागाद्वारे करार करण्यात येत आहे. जिल्ह्यातील उद्योगांनी करार करण्याचा सूचना जिल्हाधिकारी डॉ. तुम्मोड यांनी दिल्या. यावेळी सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी या मोहिमेची सविस्तर माहिती दिली.

00000

जिल्ह्यात नव भारत साक्षरता कार्यक्रम राबविण्यात येणार

बुलडाणा, दि. 12 : जिल्ह्यातील निरक्षर नागरिकांना साक्षर करण्यासाठी जिल्ह्यात नव भारत साक्षरता कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. यात पहिल्या टप्प्यात 15 वर्षावरील वयोगटातील निरक्षरांना साक्षरता आणि संख्याज्ञान देण्यात येणार आहे. निरक्षरांना शिकविण्यासाठी शाळास्तरावर स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात येणार आहे.

जिल्ह्यात तीन लाख 95 हजार निरक्षरांची नोंद करण्यात आली आहे. या निरक्षरांना 15 ते 35 आणि 35 वर्षापेक्षा अधिक अशा दोन वयोगटात 2030 पर्यंत शिक्षित करण्यात येणार आहे. यासाठी 2027 पर्यंत कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. यात शाळा हे केंद्रबिंदू मानून या परिसरात असलेल्यांची सुशिक्षितांची स्वयंसेवकांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणातून निवडक स्वयंसेवकांना प्रशिक्षण आणि प्रशिक्षणासाठी लागणारे साहित्य देण्यात येणार आहे. यात प्रामुख्याने महिला, अनूसुचित जाती, जमाती, इतर मागास प्रवर्ग, अल्पसंख्याक, दिव्यांग व्यक्ती, वंचित, उपेक्षित घटक अशा प्राधान्य क्रमानुसार साक्षरता मोहिम राबविण्यात येणार आहे.

जिल्ह्यात सेवानिवृत्त शिक्षकांची संख्या मोठी आहे. शिक्षण विभागातर्फे सेवानिवृत्त शिक्षकांना आवाहन करून या उपक्रमात सहभागी करून घेतल्या जाणार आहे. राज्य शासनाने ठरवून दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे कार्यवाही करावी. अभ्यासक्रम ठरवून स्वयंसेवकांना प्रशिक्षण दिल्यास या नव भारत साक्षरता उपक्रमाचे चांगले परिणाम दिसून येतील, असेही जिल्हाधिकारी डॉ. तुम्मोड म्हणाले.

निरक्षरांच्या प्रगतीसाठी एनसीईआरटीमार्फत अभ्यासक्रम निश्चित करण्यात येणार आहे. तसेच दोन टप्प्यात निरक्षरांच्या प्रगतीची तपासणी करण्यात येणार आहे. या परीक्षा जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतर्फे घेतल्या जाणार आहे. निरक्षरांना साक्षर करण्यासाठी या उपक्रमांत स्वयंसेवकांची भूमिका महत्वाची राहणार आहे. या कार्यासाठी स्वयंसेवकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड यांनी केले.

बैठकीला योजना शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली ठग, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य मारोती गायकवाड, प्राथमिक शिक्षणाधिकारी बी. आर. खरात, मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्र. द. राठोड, जिल्हा सांख्यिकी अधिकारी ज. भा. आढाव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अमोल डिघुळे आदी उपस्थित होते.

00000

ऑनलाईन त्रैमासिक विवरणपत्र ई-आर-1 भरणे आवश्यक

बुलडाणा, दि. 12 : शासकीय, निमशासकीय कार्यालये, आस्थापना, तसेच अनुदानित, विनाअनुदानित शाळा, महाविद्यालयांनी ऑनलाईन त्रैमासिक विवरणपत्र ई-आर-1 भरणे आवश्यक आहे. यासाठी संबंधितांनी कार्यवाही करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांनी विकसित केलेल्या mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर रोजगार विषयक सेवा ऑनलाईन पद्धतीने देण्यात येत आहे. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, बुलडाणा कार्यालयाकडे नोंदणीकृत सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, आस्थापना, तसेच अनुदानित, विनाअनुदानित शाळा, महाविद्यालयांनी सेवायोजन कार्यालयात रिक्तपदे अधिसूचित करणे सक्तीचे कायदा 1959नुसार जून 2023चे त्रैमासिक विवरण पत्र (ईआर-1) दि. 30 जुलै 2023 पर्यंत mahaswayam.gov.in संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने भरणे बंधनकारक आहे.

ऑनलाईन त्रैमासिक विवरण पत्र ईआर-1 भरण्यास काही अडचणी निर्माण झाल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, बुलडाणा  प्रशासकीय इमारत, बस स्टँड समोर, बुलडाणा कार्यालयाशी प्रत्यक्ष संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त, प्रांजली बारस्कर यांनी केले आहे.

00000

अमजद खान राजा खानच्या नातेवाईकांनी संपर्क करण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 12 : जिल्हा बालकल्याण समितीने शासकीय मुलांचे निरीक्षण गृह, बालगृह बुलडाणा येथे प्रवेशित अमजद खान राजा खान, वय 13 वर्षे, हा संस्थेने काळजी व संरक्षणाच्या दृष्टीने पुन:श्च दाखल झाला आहे. मुलाच्या नातेवाईकांनी संस्थेशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मुलाखतीच्या वेळी अमजद खान राजा खान यांचे जवळचे कोणीही नातेवाईक नसल्याचे आणि आठवत नसल्याचे सांगितले आहे. मुलगा लहान असताना मलाकापूर रेल्वे स्थानकापासून नागपूर येथे रेल्वेने पोहचला. नागपूर येथील संस्थेमध्ये दाखल होऊन त्याने तेथील मुलाखतीच्या वेळी तो बुलडाणा जिल्ह्यातील असल्याचे सांगितले. त्यामुळे बुलडाणा संस्थेस दाखल केले होते. बाल कल्याण समिती, बुलडाणा यांच्या आदेशानुसार पुढील पुनर्वसनाकरीता दि चिल्ड्रेन्स एड सोसायटीचे डेव्हिड ससून ओद्योगिक शाळा, बालगृह, माहिम मुंबई येथे पाठवण्यात आले होते. तेथे दोन वर्षे मुलास ठेवण्यात आले. पुनश्च त्यास शासकीय मुलांचे निरीक्षण गृह, बालगृह, बुलडाणा या संस्थेत दाखल झाला आहे. सदर बालकाचे दत्तक विधान प्रक्रियेकरीता लिगल फ्री करणे आवश्यक आहे. बालकांच्या आई-वडिलांनी किंवा नातेवाईकांनी 10 दिवसाच्या आत शासकीय मुलांचे निरीक्षणगृह, बालगृह बुलडाणा, चिखली रोड, हाजी मलंग दर्गामागे, शरद कला महाविद्यालय परिसर, बुलडाणा येथे संपर्क साधावा, तसेच दुरध्वनी क्रमांक 07262-295062 अथवा अधीक्षक महेंद्र अष्टेकर यांच्याशी संपर्क क्रमांक 9049952024वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

0000000

No comments:

Post a Comment