Monday 10 July 2023

DIO BULDANA NEWS 10.07.2023

 शेतकऱ्यांनीखरीप हंगाम पिक स्पर्धेत सहभागी व्हावे

*कृषि विभागाचे आवाहन

बुलडाणा, दि. 10 : पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी येत्या हंगामात खरीप हंगाम पिक स्पर्धा घेण्यात येत आहे. यात शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कृषि विभागातर्फे करण्यात आले आहे.

शेतीची उत्पादकता वाढावी, यासाठी शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात, अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देवून विजेत्या शेतकऱ्यांना गौरव  केल्यास त्यांचे मनोबल वाढण्यास मदत होते. ते अधिक उमेदीने नवनवीन आणि अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करतील. यामुळे कृषि उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल, तसेच परिसरातील इतर शेतकऱ्यांना मार्गदर्शक होवून जिल्ह्याच्या पर्यायाने राज्याच्या एकूण उत्पादनात भर पडेल, यासाठी कृषि विभागातर्फे पिक स्पर्धा राबविण्यात येत आहे.

पिकस्पर्धेतील जिल्ह्याकरिता खरी हंगामातील स्पर्धेसाठी सोयाबीन, तूर आणि मका पिके समाविष्ट करण्यात आली आहेत. प्रती तालुका किमान स्पर्धक संख्या ही सर्वसाधारण गटासाठी 10 आणि आदिवासी गटासाठी 5 शेतकरी राहिल.पिकस्पर्धेमध्ये सहभागी लाभार्थीचे शेतावर त्या पिकाखालील किमान 10 आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे. पुरेशे अर्ज प्राप्त झाल्यानंतर संबंधित पिकाची पिकस्पर्धा संबधित तालुका कृषि अधिकारी जाहीर करतील.

स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकांसाठी स्पर्धेत सहभाग घेता येईल. सर्व गटासाठी प्रवेश शुल्कपिकनिहाय प्रत्येकी 300 रुपये राहणार असून अर्ज दाखल करण्याची अंतिम दि. 31 ऑगस्ट 2023 आहे.पिकस्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी अर्ज विहित नमुन्यामध्ये भरून त्यासोबत प्रवेश शुल्क चलन, सातबारा, आठ अ चा उतारा आणि अनूसुचित जमातीचा असल्यास जात प्रमाणपत्र या कागदपत्राची पूर्तता करून संबधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयात अर्ज सादर करावे लागणार आहे.

तालुका पातळीस्तरावर सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी पहिले 5 हजार रूपये, दुसरे 3 हजार रूपये, तिसरे दोन हजार रूपये बक्षीस असणार आहे.जिल्हा पातळीस्तरावर सर्वसाधारण व आदिवासी गटासाठीपहिले 10 हजार रूपये, दुसरे 7 हजार रूपये, तिसरे 5 हजार रूपये बक्षीस असणार आहे.विभाग पातळीस्तरावर सर्वसाधारण व आदिवासी गटासाठीपहिले 25 हजार रुपये, दुसरे 20 हजार रूपये, तिसरे 15 हजार रूपये बक्षीस असणार आहे. राज्य पातळीस्तरावर सर्वसाधारण व आदिवासी गटासाठीपहिले 50 हजार रुपये, दुसरे 40 हजार रूपये, तिसरे 30 हजार रूपये बक्षीस असणार आहे.

पिकस्पर्धेच्या मार्गदर्शक सूचना कृषि विभागाच्या krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तसेच अधिक माहितीसाठी कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, तालुका कृषि अधिकारी कार्यालय यांच्याशी संपर्क साधावा. मुंग  आणि उडिद या पिकासाठी दि. 31 जुलै 2023 पूर्वी अर्ज सादर करून पिकस्पर्धेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन कृषि उपसंचालक एस.आर.कणखर यांनी केले आहे.

 

00000

No comments:

Post a Comment