Friday 19 May 2023

DIO BULDANA NEWS 19.05.2023

 खरीप हंगामात सोयाबीन उत्पादकता वाढविण्याचे उद्दिष्ट

*सोयाबीनचे अपेक्षित उत्पादनासाठी अष्ठसुत्री वापरावी

बुलडाणा, दि. 18 : जिल्ह्याची ओळख सोयाबीनचा हब म्हणून आहे. खरीपातील एकूण लागवड क्षेत्रापैकी सुमारे 75 टक्के क्षेत्रावर सोयाबीन पीक घेतल्या जाते. सध्या पिकाची उत्पादकता लक्षात घेता उत्पादकता वाढविण्यास मोठा वाव आहे. सन 2022-23 मध्ये जिल्ह्याची सरासरी उत्पादकता 1 हजार 693 किलो प्रति हेक्टर आहे. ती सन 2023-24 या वर्षात वाढवून 1 हजार 862 किलो करण्याचे उद्दिष्ट कृषि विभागाने निश्च‍ित केले आहे.

नियोजित उत्पादकता साध्य करण्याकरीता शेतकऱ्यांनी काही बाबींचा अंगिकार केल्यास निश्च‍ित साध्य करता येऊ शकते. याकरीता हलक्या जमिनीत हे पिक अपेक्षित उत्पादन देऊ शकत नाही. त्याकरीता मध्यम ते भारी जमीनीवर पिकाची  लागवड करावी. सोयाबीन पिकाच्या उगवणीकरीता 25 डिग्री सेल्सिअस तापमानाची आवश्यक आहे. संपूर्ण वाढीच्या अवस्थेत सर्वसाधारणपणे 22 ते 35 डिग्री सेल्सीअस तापमानात पिक चांगले येते. या पिकाकरीता 750 ते 1000 मीमी पाऊस आवश्यक आहे. सुरुवातीच्या पिकाचे अवस्थेत कमी पाणी लागत असून दाणे भरण्याच्या अवस्थेत पाण्याची जास्त आवश्यकता असते.

सोयाबीन हे पिक स्वपरागसिचिंत असून सुधारीत वाणच या पिकाची उपलब्ध आहेत. त्यामुळे दरवर्षी बाजारातील बियाणे खरेदी न करता तीन वर्षातून एकदा प्रमाणित बियाणे खरेदी करावे. प्रमाणित बियाण्यापासून उत्पादित सोयाबीन दोन वर्ष घरगुती पद्धतीने साठवून ठेऊन वापर करता येतो. यामुळे बियाण्यावर होणारा खर्च बचत करता येऊ शकते. घरगुती पद्धतीने साठवून ठेवलेल्या बियाण्याची स्थानिक पातळीवर स्पायरल सेपरेटरद्वारे प्रतवारी करुन बियाणे म्हणून वापर करता येईल.

घरगुती पद्धतीने साठवून ठेवलेल्या बियाण्याची उगवण क्षमता स्थानिक पातळीवर उपलब्ध होणारे साहित्य गोणपाठ, टिशू पेपर, वर्तमानपत्राचा कागद किंवा मातीच्या ट्रेचा वापर करुन उगवण क्षमता तपासून घ्यावी. याकरीता पोत्यातील बियाणे निवडून न घेता 100 बिया एका गोणपाटावर 10चे रांगेत ठेऊन असे चार गोणपाट तयार करावे, ओल्या गोणपाटाची गुंडाळी करुन ठेवाव्या व 5 ते 7 दिवसानंतर कोंब आलेले बियाणे मोजून सरासरी टक्केवारी काढावी. 70 किंवा 70 टक्के पेक्षा जास्त उगवणक्षमता आलेले बियाणे पेरणी करीता उपयोगात आणावे.

सोयाबीन पिकास प्रथम बुरशीनाशक थायरम 37.5 + कार्बोझींग 37.5 टक्के 3 ग्रॅम प्रति किलो बियाणे लावावे. वेगवेगळ्या किडी रोगापासून पिकांचे सुरुवातीचे काळात संरक्षण करण्याकरीता रासायनिक आणि जैविक बिजप्रक्रिया करणे आवश्यक असते. थायोमिथोक्झाम 30 टक्के एफएस 3 ते 5 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास लावल्यास खोडमाशी पासून संरक्षण मिळते. इमॅडोक्लोप्रिड 48 टक्के एफएसमुळे इतर रसशोषण करणाऱ्या किडीपासून संरक्षण मिळते.      

पिकासाठी जिवाणू संवर्धन वापर महत्वाचा ठरतो. जमिनीत उपलब्ध असणारे विविध अन्नद्रव्य पिकास उपलब्ध होण्याकरीता जिवाणू चा महत्वाचा सहभाग असतो. याकरीता रायझोबियम + पीएसबी + केएमबी प्रत्येकी 25 ग्रॅम प्रति किलो बियाणे याप्रमाणात पेरणीपूर्वी बियाण्यास लावावे. बियाण्यास प्रथम बुरशीनाशक आणि नंतर किटकनाशकाची किंवा काही कंपनीचे दोन्ही औषधे एकत्रित असलेले संयोजन बाजारात उपलब्ध झालेले आहेत, ते वापरुन रासायनिक बिजप्रक्रिया करावी. जैविक बिजप्रक्रिया पेरणीपुर्वी दोन तास अगोदर रायझोबियम + पीएसबी + केएमबी किंवा लिक्वीड कॉन्सर्सिया वापरुन जैविक बिजप्रक्रिया करावी. रासायनिक बुरशीनाशक उपलब्ध न झाल्यास प्रथम ट्रायकोडर्मा 5 ग्रॅम किंवा 6 मिली प्रति किलो बियाण्यास बिजप्रक्रिया करावी. त्यानंतर जैविक बिजप्रक्रिया पेरणीपुर्वी दोन तास अगोदर करावी.

जैविक औषधाची बिजप्रक्रिया करणे पेरणीवेळी शक्य न झाल्यास ट्रायकोडर्मा 5 ते 10 किलो + 100 किलो शेणखत किंवा 2 लिटर ट्रायकोडर्मा + 100 किलो शेणखतात मिसळून सावलीखाली सात दिवस मिश्रणावर पॉलीथिन पेपर झाकावे. सात दिवसानंतर जमिनीमध्ये  मिसळून द्यावे, पीएसबी व रायझोबियम 3 ते 5 किलो + 50 किलो शेणखत मिसळून जमिनीमध्ये द्यावे.

योग्य वाणाची निवड करताना शक्यतोवर 10 वर्षाआतील प्रसारित वाणाची निवड पेरणीकरिता करावी. जुने झालेले वाणाची किडरोग प्रतिकारकक्षमता कमी होऊन पिक किड व रोगास बळी पडते. याकरीता आपल्या भागात शिफारस केलेले वाण निवडावे. उभट वाढणारी वाण JS 93-05, JS 95-60, MAUS-162 या वाणाचे जमिनीच्या मगदुराप्रमाणे 26 ते 30 किलो प्रति एकर बियाणे वापरावे. तसेच फांद्या करणारे वाण KDS-726, KDS-753 व मध्यम फांद्या करणारे वाण JS-335, DS-228 व MAUS-612, फुले किमया (KDS-753), ही असून जमिनीच्या मगदुराप्रमाणे व पाण्याची उपलब्धता पाहून वाणाची योग्य निवड करावी. ज्या ठिकाणी संरक्षित ओलीताची सोय असेल व जमिन भारी असेल, अशा ठिकाणी फुले संगम (KDS-726), फुले दुर्वा, (KDS-992) यासारखे वाण निवडावे. या वाणासाठी जमिनीच्या मगदुराप्रमाणे टोकण पद्धतीने लागवडीकरीता एकरी 16 ते 20 किलो बियाणे वापरावे.

पेरणी व पेरणीच्या पद्धती मध्ये सोयाबीन पिकाचे अधिक उत्पादन येण्यासाठी पेरणीची पद्धत योग्य निवडणे फार महत्वाचे आहे. सोयाबीन पिकास सुरुवातीच्या काळात पाणी कमी लागते. परंतू पावसाळा जास्त असल्याने पिक पाण्यात सापडून योग्य वाढ होत नाही. या उलट पिकास दाणे भरण्याचे अवस्थेत पाण्याची जास्त गरज असते. अशावेळी पावसात खंड असतो. त्यामुळे दाणे योग्य पद्धतीने भरत नाहीत. परिणामी उत्पादन कमी येते. यावर मात करण्याकरीता पेरणीची योग्य पद्धत निवडुन पेरणी करावी. सरी-वरंबा पद्धतीने टोकण लागवड, बेडवर लागवड किंवा बीबीएफ यंत्राद्वारे पेरणी करावी.

पेरणीची वेळ 7 जून ते 15 जुलै असून पेरणी करण्यास उशीर झाल्यास कमी कालावधीचे वाण वापरावे. 75 ते 100 मीमी पाऊस किंवा जमीन 6 इंच खोल ओलीची खात्री करुन वापसा आल्यानंतर पेरणी करावी. पेरणी करताना बियाणे 3 ते 5 सेमी खोलीवरच पेरावे.

पेरणीचे अंतर हे उभट वाढणारे वाण, हलकी जमीन 30 सेमी, मध्यम जमीन 37.5 सेमी, भारी जमीन 45 सेमी, जास्त फांद्या करणारे वाण हलकी जमीन 45 सेमी, मध्यम फांद्या करणारे वाण मध्यम जमीन 45 सेमी. जास्त फांद्या करणारे मध्यम जमीन 52.5 सेमी, मध्यम फांद्या करणारी भारी जमीन 52.5 से.मी., जास्त फांद्या करणारे वाण भारी जमीन 60 सेमी, जास्त फांद्या करणारी खूप भारी जमीन 75 सेमी दोन ओळीतील अंतर ठेऊन पेरणी करावी.

तण नियंत्रण करताना जमिनीतील सेंद्रीय कर्ब व प्रति ग्रॅम जिवाणूची उपलब्धता लक्षात घेता शक्यतो तणनाशकाचा वापर टाळुन भौतिक पद्धतीने तण नियंत्रण करावे. अपवादात्मक परिस्थीतीतच तणनाशकाचा वापर करावा. सुरुवातीचे 30 ते 35 दिवस पिक तणविरहित ठेवावे. पेरणी नंतर लगेचच उगवणपूर्व फ्लुमीऑक्झीन 50 टक्के एससी 5 मीली प्रती 10 लिटर पाणी घेऊन फवारणी करावी किंवा पेरणीनंतर 15 ते 20 दिवसाच्या दरम्यान तण दोन ते तीन पानावर असताना इमॅझीथायपर 20 मिली प्रती 10 लिटर पाणी किंवा क्विझॅलोपॉप पी. इथाईल 5 टक्के इसी 20 मीली प्रती 10 लिटर पाणी यापैकी कोणत्याही एका तणनाशकाची  फवारणी नॅपसॅक पंपाद्वारे करावी. तणनाशक फवारणीपूर्वी पंप स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावे. तणनाशकाच्या फवारणी करीता गढूळ  पाण्याचा वापरु नये. तणनाशकाची फवारणी करताना वापरण्यात येणारे पाणी आम्लधर्मी असावे. त्याकरीता लिटमस पेपर द्वारे तपासणी  करावी. पाणी अल्कधर्मी असल्यास सिट्रीक अॅसिड मिसळून पाणी आम्लधर्मी करुन वापरल्यास तणाचे प्रभावी नियंत्रण होते. फवारणी करीत असताना जमिनीत पुरेसा ओलावा असणे आवश्यक आहे.

 रासायनिक खत मात्रा ही विद्यापिठाचे शिफारशीनुसार व माती परिक्षण अहवालानुसार रासायनिक खताची मात्रा पेरणी बरोबर द्यावी. अकोला विद्यापिठाचे N-12 : P-30: K-12 ची प्रति एकर शिफारस असून बाजारात उपलब्ध असलेल्या रासायनिक खतामधून ही मात्रा देण्यात यावी. तसेच 12:32:16, 10:26:26, 18:46:00 इत्यादी संयुक्त खतामधून मात्रा देत असल्यास एकरी 8 किलो गंधकाची मात्रा पेरणी बरोबर द्यावी. उभ्या सोयाबीन पिकास युरीया खत देऊ नये. त्यामुळे फायदा होण्याऐवजी नुकसानच संभवते. चालू खरीप हंगामात इफ्को द्वारा नॅनो डीएपी द्रवरुप (8:16:0) उपलब्ध झाले आहे. नॅनो डीएपी पिकास वापरायचे असल्यास पेरणीसोबत द्यावयाची रासायनिक खताची मात्रा 50 टक्के कमी वापरुन पेरणी करावी. पेरणीनंतर पिक 30 ते 35 दिवसाचे असताना 2 ते 4 मीली नॅनो डीएपी प्रति लिटर पाण्यात टाकून फवारणी करावी. नॅनो युरिया व नॅनो डीएपीचा वापर केल्यास पिकाचे संवर्धनाबरोबरच पर्यावरण राखण्यास मदत होते व रासायनिक खतावरील खर्च कमी करता येऊ शकतो.

आंतरमशागत करताना सोयाबीन पिकाचा फुलावर येण्याचा कालावधी जातीपरत्वे 35 ते 45 दिवसांनी फुलधारणा होते. त्यामुळे आंतरमशागतीचे कामे, कोळपणी, निंदणी आदी पिके फुलावर येण्यापूर्वी करुन घ्यावी. पिक फुलावर असताना आंतरमशागत करु नये. एकात्मिक किडरोग व्यवस्थापन करताना सोयाबीन पिकावर सुरुवातीच्या काळात खोडमाशी ही किड येते. याकरीता 5 टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी.

विविध प्रकारच्या अळ्या उंट अळी, तंबाखूवरील पाने खाणारी अळी, घाटेअळी इत्यादी करिता फेरोमेन ट्रॅप व ल्युर्स हेक्टरी 15 ते 20 व पक्षी थांबे 15 ते 20 लावावे. पिकांचे नियमित निरीक्षण घ्यावी. निरीक्षणात प्रति मिटर 3 ते 5 पेक्षा जास्त अळ्या आढळून आल्यास किड आर्थिक नुकसान पातळीचे वर गेले, असे समजून योग्य किटकनाशकाची फवारणी करावी.

 

किडरोग व्यवस्थापन फवारणीची वेळ

कीड व रोग

फवारणीची  वेळ

कीटकनाशकाचे प्रमाण प्रति १० लिटर पाणी

किड व रोग

 

पेरणीनंतर 10 ते 15 दिवसांनी

ट्रायझोफॉस 20 मिली + 5 टक्के निंबोळी अर्क किंवा क्लोरॅनट्रानिलीप्रोल 18.5 ईसी-3 मिली

खोडमाशी

पेरणीनंतर 20 ते 25 दिवसांनी किंवा

एखादे पान कडेने वाळू लागते व त्याची फांदी सुकलेली आढळते

ट्रायझोफॉस 20 मिली + 5 टक्के निंबोळी अर्क किंवा क्लोरॅनट्रानिलीप्रोल 18.5 ईसी-3 मिली

चक्रीभुंगा

फुलोरा अवस्था

क्लोरोपायरीफॉस किंवा क्विनॉलफॉस 20 मिली किंवा इमामेक्टीन बेंझोएट 4 ग्रॅम, एकरी 20 ते 25 पक्षी थांबे उभे करावेत.

पाने खाणाऱ्या अळ्या (स्पोडोप्टेरा, उंट, केसाळ व घाटे अळी)

शेंगात दाणे भरताना

 

इमामेक्टीन बेंझोएट 4 ग्रॅम किंवा

क्लोरॅनट्रानिलीप्रोल 18.5 ईसी-3 मिली

 

पाने खाणाऱ्या अळ्या (स्पोडोप्टेरा, उंट, केसाळ व घाटे अळी)

प्रादुर्भाव दिसताच

बाविस्टीन- 10 ग्रॅम

 

शेंगाचा करपा

प्रादुर्भाव दिसताच

डायथेन एम 45-25 ग्रॅम किंवा प्रोपिकोनॅझोल 10 मीली

 

तांबेरा

प्रादुर्भाव दिसताच

या रोगाची लक्षणे आढळून आल्यास तात्काळ प्रादूर्भावग्रस्त रोपे नष्ट करावे व रस शोषणाऱ्या किडीचा प्रादूर्भाव कमी करण्यासाठी 15 ते 20 निळे व पिवळे चिकट सापळे प्रति हेक्टर वापरावे.

सोयाबीन पिवळा मोझॅक

 

प्रादुर्भाव दिसताच

सोयाबीन मोझॅक

प्रादुर्भाव दिसताच

जर पेट्रोल पंपाने फवारणी केल्यास किटकनाशकाचे  प्रमाण तिप्पट करावे.

 

काढणी व मळणी करताना पिक परिपक्व झाल्यानंतर मजूराच्या सहाय्याने कापणी करुन मळणी यंत्राद्वारे मळणी करावी किंवा MAUS-162 सारखे वाण लागवड केले असल्यास हार्वेस्टरद्वारे मळणी करावी, असे आवाहन कृषि विभागान केले आहे.

00000

लेख

शाश्वत उत्पन्नासाठी संपूर्ण अनुदानावर फळबाग योजना

*स्व. भाऊसाहेब फुंडकर योजना

          शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न मिळवून देण्यासाठी राज्यात स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना राबविण्यात येते. जिल्ह्यात फळबागाचे क्षेत्र वाढावे, यासाठी कृषि विभागातर्फे स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना राबविण्यात येते. शंभर टक्के अनुदानावर ही योजना राबविण्यात येत आहे.

महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून शेतकऱ्यांचे शाश्वत उत्पादन वाढीसाठी ही योजना राबविण्यात येते. रोहयोतून प्रामुख्याने शेत आणि बांधावर फळझाडे लागवड करण्यात येते. यात शंभर टक्के अनुदान देण्यात येते. ही योजना कृषि, ग्राम विकास आणि वनविभागाच्या माध्यमातून राबविली जाते. यात दोन हेक्टरपर्यंत फळबाग लागवडीचा लाभ देण्यात येतो.

ग्रामपंचायतीची मान्यता प्राप्त झाल्यानंतर सदर कामास तांत्रिक व प्रशासकीय मान्यता कृषी विभागामार्फत देण्यात येते. फळबाग, वृक्ष, फुलझाडे या योजनेत लागवड केली जाते.  निवड झालेल्या लाभार्थींना कृषी विभागामार्फत शासकीय फळ रोपवाटिकेमधून जातीवंत कलमे, रोपे अनुदानावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, तसेच फळबाग लागवडीचे सर्व प्रकारचे तांत्रिक मार्गदर्शन करण्यात येते.

या योजनेसाठी पात्र लाभार्थी हा अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती, विमुक्त जमाती, दारिद्र्य रेषेखालील इतर कुटुंबे, स्त्री कुटुंबप्रमुख असलेली कुटुंबे, दिव्यांग व्यक्ती कुटुंबप्रमुख असलेली कुटुंबे, भूसुधारक योजनेचे लाभार्थी, प्रधानमंत्री आवास योजना, ग्रामीण योजनेखालील लाभार्थी, अनुसूचित जमाती व अन्य परंपरागत वन निवासी (वन हक्क मान्य करणे) अधिनियम 2006नुसार पात्र व्यक्ती, कृषी कर्जमाफी योजना 2008 नुसार लहान शेतकरी एक हेक्टरपेक्षा जास्त परंतू दोन हेक्टरपर्यंत जमीन असलेले जमीन मालक व कूळ, सीमांत शेतकरी, सीमांत शेतकरी हे एक हेक्टरपर्यंत जमीन असलेले शेतकरी, जमीन मालक व कूळ. महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेसाठी जॉब कार्ड धारक 1 ते 11 प्रवर्गातील कोणतीही व्यक्ती वैयक्तिक लाभार्थी म्हणून योजनेचा लाभ घेण्यास पात्र ठरतो.

या योजनेच्या लाभासाठी महाडीबीटी पोर्टलवर कधीही अर्ज करता येतो. यासाठी आवश्यक कागदपत्रे ही सातबारा, 8अ, आधारकार्ड, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक झेरॉक्स, जॉब कार्ड, दारिद्र्य रेषेखालील अल्याचा दाखला, जातीचा दाखला किंवा जातीचा उल्लेख असलेली कोणतेही अधिकृत शासनाचे पुरावे सादर करावी लागतात. योजनेत समाविष्ट फळपिके, वृक्ष, फुलपिके ही 59 प्रकारची फळपिके, वृक्ष, फुल पिके, मसाला पिके औषधी वनस्पती आदींसाठी सहाय्य केले जाते.

महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवडीसाठी शंभर टक्के अनुदान उपलब्ध आहे. शेतकऱ्यांनी याचा लाभ घेऊन फळझाडाची लागवड करून शाश्वत उत्पन्न घ्यावे. इच्छुक शेतकऱ्यांनी नजिकच्या ग्रामपंचायत किंवा कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.

 

गजानन कोटुरवार,

जिल्हा माहिती अधिकारी,

बुलडाणा.

00000

लेख

आपदग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात

*गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना

शेती करताना नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात आणि मानवनिर्मित, तसेच अन्य कोणत्याही कारणामुळे होणारे अपघात यामुळे शेतकऱ्यांचा मृत्यू किंवा कायमचे अपंगत्व येते. या परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्य शासनाची गोपीनाथ मुंड शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना महत्वपूर्ण ठरत आहे.

घरातील व्यक्तीच्या झालेल्या अपघातामुळे कुटुंबाच्या उत्पन्नाचे साधन बंद होते. ऊन अडचणीची परिस्थिती निर्माण होते. अशा अपघातग्रस्त शेतकरी अथवा त्यांच्या कुटुंबास आर्थिक लाभ देण्यासाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना ही योजना २००५-०६ पासून राबविण्यात येत होती. या योजनेत बदल करून दि. १९ एप्रिल २०२३ पासून अपघाती मृत्यू, अपंगत्वासाठी नवीन ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना’ राबविण्यास मान्यता दिली आहे. या नवीन योजनेत शेतकऱ्यांसाठी अनुकूल कार्यपद्धती अवलंबली आहे. योजनेचे प्रस्ताव मंजुरीचे अधिकार तालुकास्तरावरील तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली समितीला देण्यात आले आहेत. अपघात घडल्यानंतर 30 दिवसाच्या आत परिपूर्ण प्रस्ताव वारसदारानी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सादर करावयाचा आहे. त्यानंतर त्याची तपासणी करून त्वरीत मदत वाटप थेट बँक खात्या करण्याची कार्यवाही तालुका कृषी अधिकारी करणार आहे.

अपघाताचे स्वरूपामध्ये शेती व्यवसाय करताना होणारे अपघात, रस्ता, रेल्वे अपघात, पाण्यात बुडून मृत्यू कीडनाशके हाताळताना अथवा अन्य कारणामुळे विजेचा धक्का बसल्यामुळे झालेला अपघात, वीज पडून मृत्यू, खून, उंचावरून पडून झालेला अपघात, सर्पदंश, विंचू दंश, नक्षलवाद्याकडून झालेल्या हत्या, जनावरांचे हल्ल्ये, चावणे यामुळे जखमी किंवा मृत्यू, दंगल अन्य कोणतेही अपघात, तसेच अपघाताच्या व्याख्येनुसार कोणतेही अनपेक्षित आकस्मिक दुर्दैवी अपघातामुळे होणारे मृत्यू अथवा अपंगत्व यासह आता बाळंतपणातील मृत्यूचा देखील समावेश करण्यात आला आहे.

कुटुंबाची व्याख्या आणि अनुदानात अपघाताच्या दिवशी स्वतः वहितीधारक खातेदार असलेले शेतकरी आणि शेतकऱ्यांच्या कुटुंबातील खातेदार म्हणून नोंद नसलेला कोणताही एक सदस्य यात आई-वडील, शेतकऱ्याचा पती-पत्नी, मुलगा आणि अविवाहित मुलगी यापैकी कोणताही एक व्यक्ती, असे १० ते ७५ वर्षे वयोगटातील एकूण दोन जणांना समावेश राहणार आहे. अपघाती मृत्यू, तसेच अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन अवयव अथवा एक डोळा व एक अवयव कायमस्वरूपी निकामी झाल्यास २ लाख रूपये, अपघातामुळे एक डोळा अथवा एक अवयव कायमस्वरूपी निकामी झाल्यास १ लाख रूपये लाभ अनुदान देण्यात येणार आहे.

योजनेच्या लाभासाठी अपघात घडल्यानंतर तीस दिवसांच्या आत सातबारा उतारा, मृत्यूचा दाखला, फेरफार उतारा ६ ड, वारसनोंद उतारा ६ क, शेतकऱ्याच्या वयाचा दाखल्यामध्ये शाळा सोडल्याचा दाखला, आधारकार्ड, निवडणूक ओळखपत्र, प्रथम माहिती अहवाल, स्थळ पंचनामा, पोलिस पाटील माहिती अहवाल, मरणोत्तर अहवाल, शवविच्छेदन अहवाल, वाहन परवाना, पाण्यात बुडून बेपत्ता झाल्यास प्रथम माहिती अहवाल आणि शेतपूर्ती बंधपत्र आवश्यक, बाळंतपणात मृत्यू झाला असल्यास शासकीय आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र, अपंगत्व असल्यास अपंगत्वाचे प्रमाणपत्र, ही कागदपत्रे संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सादर करावे लागणार आहे.

 

गजानन कोटुरवार,

जिल्हा माहिती अधिकारी,

बुलडाणा.

00000



महिलांसाठी पेपर कव्हर इन्व्हलप प्रशिक्षण संपन्न

बुलडाणा, दि. 19 : सेंट्रल बँक सेंट ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेतर्फे दि. 7 ते 16 मे दरम्यान सुंदरखेड ग्रामीण येथे दहा दिवसीय पेपर कव्हर इन्व्हलप तयार करण्याचे प्रशिक्षण पार पडले.

सुंदरखेडमधील महिलांनी यात सहभाग घेऊन स्वयंरोजगाराकडे पाऊल टाकले आहे. प्रशिक्षणादरम्यान कार्यालयामध्ये लागण्याऱ्या सर्व प्रकारच्या फाईल, लिफाफे, तसेच दिवाळी उत्सवासाठी लागणारे आकाश कंदील, केक बॉक्स, मिटाई बॉक्स तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.

यावेळी संस्थेचे संचालक श्री. पोटे, प्रशिक्षक मनिषा देव, सहायक स्वप्नील गवई यांनी प्रशिक्षनार्थ्यांना मार्गदर्शन केले. आरसेटी तर्फे विविध प्रशिक्षण देण्यात येते. तसेच बेरोजगारांना स्वयंरोजगार निर्माण व्हावा, यासाठी सहकार्य करण्यात येते.

00000

लेख

शेतकऱ्यांसाठी पीएम प्रणाम योजना

*रासायनिक खताच्या वापरात बचत

आधुनिक शेतीच्या वाटेवर वाटचाल करीत असताना उत्पादन वाढीसाठी शेतीत विविध प्रयोग करण्यात येतात. त्याचबरोबर रासायनिक खताचा वापर असंतुलित होत असतो, त्यामुळे शेतीचा उत्पादन खर्च वाढतो. रासायनिक खताचा योग्य वापर करण्यासाठी माती परिक्षण करुन त्यानंतर दिल्या जाणाऱ्या पिकनिहाय शिफारशींचा विचार करुन खताच्या योग्य मात्रा दिल्यास, उत्पादन खर्च कमी होऊन रासायनिक खताच्या असंतुलित वापरामुळे जमिनीचे नुकसान टाळता येऊ शकते. त्यासाठी नॅनो खताची पीएम प्रणाम योजना राबविण्यात येत आहे.

खर्चाचा भाग म्हणून जर रासायनिक खताचा वापर कमी करण्यासाठी पिक आणि जमिनीच्या प्रतवारीनुसार गरजा या गोष्टींची संपुर्ण माहिती असावी. युरियाच्या अतिरिक्त वापराचे दुष्परिणामामुळे पिकाची अधिक वाढ होते. विशेष करुन पिकाची पाने लुसलुशीत आणि मऊ होतात. टणकपणा व कणखरपणा कमी झाल्याने कीड रोगाचा विशेष करुन रसशोषक किडीचा प्रादुर्भाव वाढतो. सहाजिकच किटकनाशकाचा वापर करणे भाग पडते आणि उत्पादन खर्चात वाढ होते.

युरिया खताची अवाजवी वापरामुळे जमिनीच्या आरोग्यावर परिणाम होतो, जमिनीतील कार्ब : नत्र यांचे गुणोत्तर कमी होऊन सूक्ष्मजीवांची संख्या कमी होते. त्याचा परिणाम उत्पन्नावर होऊन उत्पादनात घट होते.

युरियाचा वापर कमी करण्यासाठी तृणधान्य पिकांना अॅझीटोबॅक्टर जिवाणू संवर्धक आणि द्विदल पिकांना रायझोबियम या जिवाणू संवर्धकांची २५० ग्रॅम प्रति १० किलो बियाणे याप्रमाणे प्रक्रिया करावी. यामुळे पिकांमध्ये १५ ते २० टक्के नत्राची बचत होते. विशेष बाब म्हणजे ऊसामध्ये ५० टक्केपर्यत बचत होते. नत्र खते उघड्यावर फेकून देऊ नये. खते दिल्यानंतर जास्त पाणी देऊ नये. निचऱ्याद्वारे ऱ्हास होत नाही. हिरवळीचे खते, सेंद्रीय खते आणि द्विदल धान्य वापरल्याने जमिनीतील कर्बाचे प्रमाण वाढते. जमिनीची सुपिकता वाढते.  तसेच रासायनिक खतामध्ये बचत होते.

शेणखत चांगले कुजलेले असावे अन्यथा पिक वाढीच्या अवस्थेत नत्राची कमतरता जाणवते, तसेच अर्धवट कुजलेल्या शेणखतामुळे हुमणी आणि इतर किटकांचा प्रादुर्भाव जाणवतो. शेणखताचा वापर पेरणीच्या 15-20 दिवस आधी करावा. खुप आधी टाकल्यास त्याची कार्यक्षमता पर्यायाने कमी होते. गांडुळ खताचा वापर करताना ते शक्यतो स्वतः तयार केलेले असावे, विकत आणल्यास त्याची गुणवत्ता तपासून घ्यावी. हिरवळीचे खत गिरीपुष्प, शेवरी पेरतानाच द्यावे, त्यामुळे पुढील 20-25 दिवसात त्यांचे विघटन होऊन नत्राची उपलब्धता होते. धैंचा किंवा बोरु २५ ते ४० किलो प्रति हेक्टर या प्रकारच्या हिरवळीच्या खताचा वापर पेरणीच्या 30-35 दिवसानंतर अथवा फुलोऱ्यावर येण्याआधी करावा. पिकांचे अवशेष शेतात असल्यास ते जागीच गाडुन टाकावे. मुग, चवळी, सोयाबीन, मटकी, कुळीत, गवार ही पिके फुलोऱ्याआधी जमिनीत गाडुन टाकावे. बाजारामध्ये विविध प्रकारच्या सेंद्रिय निविष्ठा उपलब्ध आहेत. त्याच्या गरजेनुसार उपयोग करून अनावश्यक खर्च टाळावा.

मृदा आरोग्य अबाधित राखण्यासाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन चालना देण्याकरिता मृद तपासणीवर आधारित राज्यात ३१ जिल्ह्यास्तरावर शासकीय मृद तपासणी प्रयोगशाळा आहेत. या प्रयोगशाळांमध्ये प्रमुख आणि सूक्ष्म अन्नद्रव्य विश्लेषण करण्यात येते. त्यानुसार खताच्या वापराबाबत शिफारस करण्यात येते. त्याप्रमाणे खताचे नियोजन केल्यास बऱ्याच प्रमाणात रासायनिक खतांची बचत करता येईल. तसेच उत्पादन खर्च कमी होईल.

नॅनो युरिया, नॅनो डीएपीचा वापर महत्वाचा ठरत आहे. नॅनो युरिया हा नत्राचा स्त्रोत असून, नॅनो डीएपी हे नायट्रोजन व फॉस्फरसचे उत्कृष्ट स्त्रोत आहे. हे द्रव रुपातील खते असल्यामुळे यांचा वापर जमिनीद्वारे न करता पानांवर फवारण्यासाठी केला जातो. त्यामुळे जमिनीचे आरोग्य, पाणी व पर्यावरण प्रदूषण होत नाही. पारंपारिक खतांच्या किंमतीपेक्षा कमी किंमत असल्यामुळे उत्पादनाचा खर्च कमी झाल्यामुळे उत्पन्न वाढ होते. त्यामुळे बाजारामध्ये उपलब्ध नॅनो युरियाची ५०० मिली बॉटलची किंमत २२५ रूपये इतकी असून पारंपरिक युरियाच्या ४५ किलो बॅगची किंमत २६६ रुपये इतकी आहे. पिकासाठी उपलब्ध नत्राचे प्रमाण तुलनात्मक सारखेच आहे. नॅनो डीएपीची ५०० मिलि बॉटलची किंमत ६०० रूपये इतकी असून पारंपारिक डीएपीच्या ५० किलो बॅगची किंमत १३५० इतकी आहे. तुलनात्मकदृष्ट्या उत्पादन खर्चाचा विचार केल्यास पारंपारिक युरिया व डीएपीऐवजी नॅनो युरिया आणि नॅनो डीएपीचा वापर कमी खर्चाचा आहे.

खरीप-२०२३ साठी केंद्र शासनाकडील मंजूर आवंटनापैकी १० टक्के पारंपारिक युरियाचे आवंटन कमी करुन १७ लाख नॅनो युरियाच्या बॉटलचे आवंटन करण्यात आले आहे. नॅनो युरिया आणि नॅनो डीएपीच्या बॉटल बाजारात उपलब्ध आहे. शेतकऱ्यांसाठी असलेल्या पीएम प्रणाम योजनेचे मुख्य उद्दिष्ट रासायनिक खताचा संतुलित, शाश्वत वापरास प्रोत्साहन देऊन धरणी मातेचे आरोग्य वाचवण्यासाठी रासायनिक खतांचा असंतुलित वापर टाळून सेंद्रिय, जैविक आणि नॅनो खताचा अवलंब करणे.आहे.

राज्यामध्ये लोकसहभागातून मातृभुमीचे आरोग्य पुनर्संचयित करण्याबाबत जागरुकता निर्माण करणे. नैसर्गिक, सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देणे, सेंद्रिय, जैविक आणि नॅनो खताच्या वापरास प्रोत्साहन देणे, नैसर्गिक साधन संपत्तीचे संवर्धन करणे, ही या योजनेची उद्दिष्टे आहेत.

मातीची सुपीकता पुनर्संचयित होणे. खतांच्या लिचिंग निक्षालनामुळे दूषित होणारे भु जलाचे प्रमाण कमी होईल. हरितगृह वायुचे उत्सर्जन कमी होऊन सेंद्रिय कार्बचे प्रमाण सुधारेल, ही या योजनेची फायदे आहेत.

मागील तीन वर्षाच्या सरासरी वापराच्या तुलनेत युरिया, डीएपी, एनपीकेएस आणि एमओपी या रासायनिक खतांचा वापर कमी करुन चालू वर्षाच्या खत वापराशी तुलना करुन बचत  होणाऱ्या अनुदानाच्या वाट्यापैकी ५० टक्के रक्कम राज्याना मिळणार आहे. सदर रक्कमेपैकी ६५ टक्के अनुदानाची रक्कम राज्यातील भांडवली प्रकल्पासाठी खर्च करण्यात येईल. उर्वरीत अनुदानाची रक्कम राज्याना कृषी विकास कार्यक्रमासाठी  दिली जाणार आहे.

 

मनोजकुमार ढगे,

जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी,

बुलडाणा.

000000

No comments:

Post a Comment