Monday 29 May 2023

DIO BULDANA NEWS 29.05.2023

 आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी खेळाडूंसाठी आर्थिक सहाय्य योजना

बुलडाणा, दि. 29 : अधिकृत आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी, तसेच सहभागी झालेल्या होतकरु खेळाडूंना प्रशिक्षण आणि इतर बाबींसाठी आर्थिक सहाय्य देण्यात येते. यासाठी खेळाडूंनी प्रस्ताव सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

राज्यात क्रीडा संस्कृतीची जोपासना आणि संवर्धन परिणामकारक करण्यासाठी, तसेच राज्यातील खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर दर्जेदार कामगिरी करुन पदक विजेते खेळाडू तयार व्हावेत, यासाठी क्रीडा विषयक तंत्रशुद्ध प्रशिक्षण, खेळाडूंच्या दर्जात सुधारणा, दर्जेदार पायाभूत सुविधा, खेळाडूंचा गौरव, क्रीडा प्रशिक्षकांना अद्यावत तंत्रज्ञानाची ओळख यासाठी क्रीडा धोरण 2012 तयार करण्यात आले आहे. यात राज्यातील खेळाडूंना अधिकृत आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आर्थिक सहाय्य देण्यात येते. ही योजना संचालनालय स्तरावर कार्यान्वीत आहे. शासनाच्या निर्णयानुसार अधिकृत आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठीचा प्रवास खर्च, प्रवेश शुल्क, निवास, भोजन, तसेच देश-विदेशातील स्पर्धापूर्व प्रशिक्षण उपकरणे, तज्‍ज्ञ क्रीडा प्रशिक्षकांचे मार्गदर्शन शुल्क, प्रशिक्षण कार्यक्रम शुल्क, आधुनिक क्रीडा साहित्य आयात किंवा खरेदी करणे, गणवेश आदी बाबींसाठी अर्थसहाय्य दिले जाते.

या योजनेत ऑलिम्पिक गेम्स, विश्व अजिंक्यपद स्पर्धा, एशियन गेम्स, राष्ट्रकुल स्पर्धा, राष्ट्रकुल युवा स्पर्धा, एशियन चॅम्पियनशिप, युथ ऑलिम्पिक, ज्युनिअर विश्व अजिंक्यपद स्पर्धा, शालेय आशियाई, जागतिक स्पर्धा, पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा, पॅरा एशियन स्पर्धा, ज्युनियर एशियन चॅम्पियनशिप, एशियन कप आणि वर्ल्ड कप या स्पर्धांना अधिकृत स्पर्धा म्हणून मान्यता देण्यात आली आहे. ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये ज्या खेळ, क्रीडा प्रकारांचा समावेश असेल तेच खेळ, क्रीडा प्रकार इतर स्पर्धांमध्ये आर्थिक सहाय्य मिळण्यास पात्र आहेत. मात्र कबड्डी, खो-खो, मल्लखांब या देशी खेळांचा अपवाद करण्यात आला आहे.

अधिकृत आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी किंवा सहभागी झालेल्या खेळाडूंनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज परिपूर्ण भरुन देणे आवश्यक आहे. संपूर्ण कागदपत्रांसह संबंधित जिल्ह्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत किंवा आयुक्त, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे यांच्याकडे सादर करावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी केले आहे.

00000




राज्य उत्पादन शुल्कचे महिनाभरात 100 गुन्हे नोंद

बुलडाणा, दि. 29 : राज्य उत्पादन शुल्क विभागाने मे महिन्यात अवैध दारू विरोधात 100 गुन्हे नोंद केले. अधीक्षक भाग्यश्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मे महिन्यात आतापर्यंत हातभट्टी दारूविरूद्ध मोहिमेंतर्गत जिल्ह्यात अवैध मद्यनिर्मिती, विक्री आणि वाहतुकीचे 100 गुन्हे नोंदविले आहे. यात 102 आरोपींसह 4 वाहने असा एकूण 1 हजार 226 लिटर हातभट्टी दारू, 38 हजार 302 लिटर मोहा रसायन, 196.92 लिटर देशी दारू आणि 46.44 लिटर विदेशी दारूसह 9 लाख 71 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.

बुलडाणा तालुक्यातील कैकाडी पुरा, भिलवाडा, परदेशीपुरा, पळसखेड नाईक, डोंगरखंडाळा, भादोला, येळगांव, मढ, बोराखेडी, लासुरा, नरवेल, तसेच चिखली कार्यक्षेत्रातील गवळीपुरा चिखली, गवळीपुरा लोणार, चायगाव, खामगाव कार्यक्षेत्रातील देऊळगाव साकर्शा, वाडी शिवार मेहकर, शिराळा, मानेगाव फाटा, आरेगाव कळंम्बेश्वर या परिसरामध्ये मोहिमेंतर्गत अवैध हातभट्टी दारू निर्मिती, विक्री व वाहतुकीबाबत गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

बनावट मद्य तसेच गावठी हातभट्टी दारूच्या सेवनामुळे जिवीतहानी किंवा गंभीर स्वरुपाचे आजार होण्याची किंवा अन्य दुर्घटना होण्याची दाट शक्यता असल्याने जिल्ह्यातील नागरीकांनी मद्यसेवन परवाना प्राप्त करून केवळ शासनमान्य अबकारी मद्यविक्री अनुज्ञप्त्यांमधूनच मद्य खरेदी आणि सेवन करावे. तसेच आपल्या परिसरात अवैध मद्यविक्री किंवा बनावट मद्यनिर्मिती होत आढळल्यास टोल फ्री नंबर 18002339999 किंवा व्हॉट्सॲप नंबर 8422001133, किंवा excisesuvidha.mahaonline.gov.in या विभागाच्या पोर्टलवर तात्काळ माहिती कळवावी.

जिल्ह्यातील किरकोळ आणि ठोक मद्य अनुज्ञप्तीधारकांच्या अनुज्ञप्तीमध्ये बनावट मद्य आढळून आल्यास अनुज्ञप्ती कायमस्वरूपी रद्द करण्यात येईल. तसेच मद्य बाळगताना मद्य सेवन, मद्य वाहतूक करताना अथवा मद्य विक्री करताना किंवा आपल्या जागेचा वापर अवैध ढाबा चालविण्यासाठी दिल्यास त्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 अंतर्गत कठोर कार्यवाही करण्यात येणार आहे.

00000

No comments:

Post a Comment