Tuesday 2 May 2023

DIO BULDANA NEWS 02.05.2023

 






उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबीराला सुरूवात

*व्यक्तिमत्व विकासासाठी तज्‍ज्ञांचे मार्गदर्शन

बुलडाणा, दि. 2 : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्र आणि एकविध खेळांच्या संघटनाच्या सहकार्याने दि. 25 एप्रिल 2023 पासून उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण आणि व्यक्तिमत्व शिबीरास सुरूवात झाली आहे. यात खेळासोबतच व्यक्तिमत्व विकासासाठी विविध तज्‍ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येत आहे.

प्रशिक्षणाच्या सकाळच्या सत्रात आहार आणि मधुमेह तज्‍ज्ञ डॉ. अश्विनी जाधव चिखलकर यांनी प्रशिक्षणार्थ्यांना आरोग्य, आाहारविषयक माहिती दिली. यात स्पर्धा आणि धकाधकीच्या जीवनात पालकांकडून मुलांकडे लक्ष दिल्या जात नाही. मुलांनी टीव्ही आणि मोबाईलपासून दुर व्हावे. जेवण करताना मोबाईल किंवा टीव्ही पाहू नये. जेवणावरच आपले लक्ष केंद्रीत करावे. आहार आणि व्यायाम शारीरिक स्वास्थ्यासाठी आवश्यक आहे. बाहेरच्या चटपटीत पदार्थांऐवजी घरचे अन्न खावे. चांगल्या अन्नाबरोबर व्यायामही महत्वाचा आहे.  त्यामुळे कुठलाही खेळ खेळावा, नित्य नियमाने सराव करावा. त्यासाठी रोज मैदानावर यावे.  त्यामुळे आपली उंची वाढण्यास मदत होईल. मैदानी खेळ खेळल्याने रोग प्रतिकारक शक्ती चांगले होते. पौष्टिक आहार, फळे, कडधान्ये, हिरवा भाजीपाला, प्रोटीन आदीचा वापर आपल्या नियमित जेवणात करावा असे त्यांनी सांगितले.

मनोज श्रीवास यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. डॉ. बाबाराव सांगळे यांनी आभार मानले. शिबीरासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, विजय वानखेडे, सुनिल जोशी, हर्षल काळवाघे, दीपक जाधव, भूषण शिरसाट, सुहास राऊत सहकार्य करीत आहेत.

00000

बँक खाते आधार क्रमांकाशी जोडण्याची पोस्टात सुविधा

बुलडाणा, दि. 2 : प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा चौदावा हप्ता बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. हा हप्ता जमा होण्यासाठी लाभार्थ्यांना त्यांचे बँक खाते आधार क्रमांकाशी जोडणे आवश्यक आहे. बँक खाते आधार कार्डशी जोडण्याची सुविधा पोस्ट खात्यात उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या गावातच या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

लाभार्थीना त्यांचे बँक खाते आधार क्रमांकाशी जोडण्याची सुविधा त्यांच्या गावातील पोस्ट मास्टर यांच्यामार्फत उपलब्ध करण्यात आली आहे. यासाठी आधार कार्ड, मोबाईल क्रमांक या कागदपत्रांच्या आधारे आपल्या गावातील पोस्ट विभागाच्या कर्मचाऱ्यांमार्फत इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत (आयपीपीबी) खाते उघडावे. सदरचे बँक खाते आपल्या आधार क्रमांकाशी 48 तासात जोडल्या जाईल. ही पद्धत कोणत्याही अतिरिक्त कागदपत्रांशिवाय करता येणार असल्याने अत्यंत सोपी आणि सुलभ आहे. आयपीपीबीमध्ये बँक खाते सुरू करण्याची सुविधा आपल्या गावातील पोस्ट कार्यालयातच उपलब्ध असल्याने लाभार्थींना इतरत्र जाण्याची गरज भासणार नाही.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबास दोन हजार रूपये प्रति हप्ता याप्रमाणे सहा हजार रूपये प्रतीवर्षी लाभ देण्यात येतो. योजनेचा 14व्या हप्त्याचा लाभ मे किंवा जून 2023 मध्ये जमा होणार आहे. केंद्र शासनाने 14वा हप्त्याचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थींनी त्यांचे लाभ जमा करावयाचे बँक खाते आधार क्रमांकाशी जोडणे बंधनकारक आहे. राज्यात सद्यस्थितीत 12.91 लाख लाभार्थींची बँक खाती त्यांच्या आधार क्रमांकास जोडलेली नाहीत. त्यामुळे या लाभार्थींच्या खात्यात चौदावा हप्त्याचा लाभ जमा होणार नाही.

पीएम किसान योजनेतील प्रलंबित लाभार्थींची बँक खाते आयपीपीबी मध्ये उघडून ती आधार क्रमांकास जोडण्यासाठी राज्याच्या आयपीपीबी कार्यालयास गावनिहाय यादी उपलब्ध करून दिली आहेत. त्याप्रमाणे गावातील पोस्टमास्टर लाभार्थींशी संपर्क करून आयपीपीबीमध्ये बँक खाती सुरू करतील. योजनेच्या 14वा हप्त्याच्या लाभासाठी आधार संलग्न बँक खाते अनिवार्य केले आहे. त्यामुळे आयपीपीबी मार्फत दि. 1 ते 15 मे 2023 कालावधीत गावपातळीवर सर्वत्र मोहिम राबविण्यात येत आहे. आयपीपीबीच्या मोहिमेमध्ये लाभार्थींनी बँक खाते उघडावे, असे आवाहान करण्यात आले आहे.

00000



आरसेटीमधील ब्युटी पार्लर प्रशिक्षण पूर्ण

बुलडाणा, दि. 2 : सेंट्रल बँकेच्या सेंट ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेतर्फे बुलडाणा येथे 30 दिवसीय ब्युटीपार्लरचे प्रशिक्षण पार पडले.

या प्रशिक्षणात जिल्ह्यातील मुली-महिलांनी सहभाग घेतला. प्रशिक्षणासोबतच त्यांना स्वयंरोजगाराचे महत्व समजावे आणि सर्व 18 ते 44 वयोगटातील युवक-युवतींनी आत्मनिर्भर आणि स्वावलंबी बनावे, यासाठी प्रशिक्षण देण्यात आले.

संस्थेचे संचालक श्री. पोटे, प्रशिक्षिका मनिषा देव, स्वप्नील गवई, मार्गदर्शक म्हणून विषयतज्‍ज्ञ रुपाली शिंदे यांनी प्रशिक्षण दिले. प्रशिक्षणात मनिषा देव यांनी उद्योजकीय विकास कार्यक्रमातील आईस ब्रेकिंग, ध्येय निश्चिती, वेळेचे व्यवस्थापन, उद्योजकीय सक्षमता, बँकेची माहिती, विविध कर्ज योजना आणि शासकीय योजना, आर्थिक साक्षरताबाबत मार्गदर्शन केले. व्यवसाय करताना उद्योजकीय ज्ञानाचे महत्त्व पटवून दिले. श्रीमती शिंदे यांनी पार्लरबद्दल आधुनिक ज्ञान विद्यार्थिनींना दिले.

00000

नांदुरा तालुक्यातील जप्त केलेल्या रेतीचा आज लिलाव

बुलडाणा, दि. 2 : नांदुरा तालुक्यातील विविध कारवाईमध्ये जप्त केलेला रेतीचा गुरूवार, दि. 27 एप्रिल 2023 रोजी लिलाव आला. मात्र हर्रासी बोली लावण्यास कोणीही उपस्थित राहिले नसल्याने या रेतीचा बुधवार, दि. 3 मे 2023 रोजी सकाळी 11 वाजता पुन्हा लिलाव करण्यात येणार आहे.

नांदुरा तालुक्यातील मौजे भोटा येथील पुर्णा नदीपत्रातील गट नं. 191 जवळील 594.23 ब्रास, महादेव मंदिराजवळील बरडेश्वर येथे 322.18 ब्रास असा एकूण 916.41 ब्रास रेती, तसेच नांदुरा तालुक्यातील रेतीसाठा जप्त करण्यात आलेल्या मौजे पातोंडा येथील 174.29 ब्रास, मौजे पतोंडा गावानजीक विटभट्टी विरुद्ध बाजुला 696.98 ब्रास, गअ नं. 1 मधील गाव नदी पत्रातील 218.16 ब्रास, पूर्णा नदीपात्रातील 87.23 ब्रास असा एकुण 1176.66 ब्रास रेतीचा लिलाव यात करण्यात येणार आहे.

000000

No comments:

Post a Comment