Tuesday 23 May 2023

DIO BULDANA NEWS 23.05.2023

 शुक्रवारी ऑनलाइन रोजगार मेळावा

बुलडाणा, दि. 23 : सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीची संधी उपलब्ध होण्‍यासाठी मॉडेल करिअर सेंटरतर्फे शुक्रवार, दि. 26 मे 2023 रोजी ऑनलाइन रोजगार मेळावा घेण्यात येणार आहे.

रोजगार मेळाव्यात जबिल सर्किट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड पुणे, मकापेरी एन्व्हायरमेंट प्रायव्हेट लिमिटेड, पुणे या बहुराष्ट्रीय कंपन्यांनी रोजगार मेळाव्याची पदे अधिसूचित केली आहेत. नॅशनल करियर सर्विसेसच्या ncs.gov.in या संकेतस्थळावर नाव नोंदणी केलेल्या दहावी आणि बारावी उत्तीर्ण उमेदवारांना या मेळाव्यात सहभाग नोंदविता येणार आहे. मेळाव्यात सहभागी होण्याकरीता कार्यालयात येण्याची गरज नाही. उमेदवार कोणत्याही ठिकाणावरून कार्यालयाकडून गुगल मीटच्‍या लिंकद्वारे ऑनलाईन सहभाग नोंदवू शकेल.

पात्र उमेदवार शैक्षणिक पात्रतेच्या आधारे एकापेक्षा अधिक पदासाठी अर्ज करू शकेल. मेळाव्याबाबत अधिक माहिती, तसेच ऑनलाईन रोजगार मेळाव्याची लिंक मिळविण्याकरिता मॉडेल करिअर सेंटर, बुलढाणा कार्यालयाशी प्रत्यक्ष किंवा भ्रमणध्वनी द्वारे 7447473585 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मॉडेल करिअर सेंटरचे योगेश लांडकर यांनी केले आहे.

000000

मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी 31 मेपर्यंत मुदतवाढ

बुलडाणा, दि. 23 : सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या केंद्र शासनाच्या भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी दि. 31 मे 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

          शिष्यवृत्तीपासून एकही विद्यार्थी वंचित राहू नये यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार शैक्षणिक वर्ष 2022-23 मधील विद्यार्थ्यांना नवीन अर्ज तसेच अर्ज नुतनीकरण करता येणार आहे. तसेच 2021-22 या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थ्यांना यापूर्वी सादर केलेल्या मात्र त्रृटीत असलेल्या अर्ज त्रृटीची पुर्तता करुन पुन्हा सादर करता येणार आहे.

जिल्ह्यातील सर्व महाविद्यालय आणि विद्यार्थ्यांनी दि. 31 मे 2023 पूर्वी ऑनलाईन परिपूर्ण अर्ज भरावेत. कोणताही विद्यार्थी शिष्यवृतीपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी केले आहे.

000000

मका, ज्वारी, बाजरी खरेदी नोंदणीस मुदतवाढ

बुलडाणा, दि. 23 : केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत योजनेंतर्गत राज्य शासनाच्या वतीने हमी दरात मका, ज्वारी, बाजरी खरेदी करण्यात येत आहे. या नोंदणीसाठी दि. 31 मे 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

मका, ज्वारी, बाजरी खरेदीसाठी नोंदणी दि. ४ मे ते २० मे २०२३ पर्यंत देण्यात आली होती. शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी करून संस्थांकडे उपस्थित राहून लाईव्ह फोटो काढणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी नोंदणी करण्यासाठी हंगाम २०२२-२३चा सातबारा उतारा, पिकपेरा, बँक पासबुकची झेरॉक्स, जनधन पासबुक देऊ नये, आधारकार्ड, बँक खाते सुरु असल्याची खात्री करुन शेतकऱ्यांनी नोंदणी करावी.

जिल्ह्यामध्ये मका, ज्वारी नोंदणीसाठी १३ केंद्रांना मान्यता देण्यात आली आहे. यात तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री समिती मर्यादित बुलढाणा, मेहकर, लोणार, संग्रामपूर, शेगाव, मलकापूर, जळगाव जामोद आणि खामगाव. संत गजानन कृषि विकास शेतकरी उत्पादक कंपनी, मोताळा, सोनपाऊल ग्रो प्रोड्युसर कंपनी, अंजनी खु. केंद्र - साखरखेर्डा, स्वराज्य शेतीपुरक सहकारी संस्था मर्यादित चिखली, माँ जिजाऊ फार्मर प्रोड्युसर कंपनी, नारायणखेड, ता. देऊळगावराजा केंद्र - सिंदखेडराजा, नांदुरा अॅग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी, नांदुरा, केंद्र- वाडी या केंद्राना मान्यता देण्यात आली आहे.

शेतकऱ्यांनी हमीदराचा लाभ घेण्यासाठी स्वत: केंद्रावर उपस्थित राहून नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी एम. जी. काकडे यांनी केले आहे.

00000

 

व्यायामशाळा विकास अनुदानासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 23 : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत व्यायामशाळा विकास अनुदान योजनेंतर्गत विविध अनुदानित शाळा, क्रीडा संस्थांना 7 लाख रुपये अनुदान देण्यात येते. यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

व्यायामशाळा बांधकाम, व्यायाम साहित्य खरेदी, खुले व्यायाम साहित्य खरेदी, व्यायामशाळा दुरुस्ती व नुतणीकरणासाठी अनुदान घेऊ इच्छिणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांनी नियोजित केलेली जागा शासनाने घोषित केलेल्या दलित वस्तीत असणे आवश्यक आहे.  अनुदानाकरीता पात्र संस्थांचा प्राथम्यक्रम स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायत, नगर परिषद, जिल्हा परिषद, सामाजिक न्याय विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या सर्व शासकीय प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, आश्रमशाळा आणि वसतीगृह तसेच क्रीडा विभागाचे संकुले, पोलिस विभागांतर्गत कल्याण निधी समिती, शासकीय स्पोर्टस क्लब, शासकीय महाविद्यालये, शिक्षण विभागाने अनुदानित संबंधित संस्थेस पाच वर्षांपूर्वी अनुदानाचा प्रथम टप्पा 20 टक्के मिळणे आवश्यक आहे. प्राथमिक, माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय या योजनेचा लाभ घेऊ शकतील.

आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करणाऱ्या संस्थांनी दि. 5 जून 2023 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल, क्रीडानगरी, जांभरुन रोड, बुलडाणा येथून विहित नमुना प्राप्त करुन, आवश्यक कागदपत्रांसह परिपूर्ण प्रस्ताव दि. 22 जुन, 2023 पर्यंत सादर करणे आवश्यक आहे.

00000



तंबाखू नियंत्रण पथकाची बुलडाण्यात कारवाई

बुलडाणा, दि. 23 : जिल्हा तंबाखू नियंत्रण पथकाने बुलडाणा शहरातील पानटपरी चालकांवर आज दि. 23 मे 2023 रोजी कारवाई केली. यात 14 हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला.

जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार पोलिस अधीक्षक सुनील कडासने, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भुसारी, जिल्हा आरोग्य अधिकारी श्री. राठोड, श्री. पाटील, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वासेकर, ठाणेदार श्री. काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा अंमलबजावणी पथकाने राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत बुलडाणा शहरातील 58 पानटपरीधारकांवर कारवाई केली. यात 14 हजार 200 रुपये दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई तंबाखू नियंत्रण कक्षाचे जिल्हा सल्लागार डॉ. लता भोसले, समुपदेशक श्री. सरकटे, सामाजिक कार्यकर्ता श्रीमती आराख, अन्न औषध प्रशासन विभाग श्री वसावे, स्थानिक गुन्हे शाखेचे श्री. जुमडे, श्री. बोचे, श्री. खेरडे यांनी ही कारवाई केली.

जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. भुसारी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पाटील यांच्या मार्गदर्शनात संपूर्ण जिल्हाभर गेल्या पाच वर्षापासून हृदयरोग, मधुमेह, अर्धांगवायू, कर्करोग या आजारांसाठी कारणीभूत तंबाखू व्यसनावर मार्गदर्शन, प्रशिक्षण, मुख तपासणी, मुख कर्करोगावरील मोफत शस्रक्रिया आदी उपक्रम राबविण्यात येत आहे. जिल्हा रुग्णालयात जिल्हा तंबाखू नियंत्रण कक्ष ओपीडी नंबर 33 व 34 येथे कार्यरत आहे. नागरिकांनी तंबाखू मुक्तीसाठी मोफत टोल फ्री क्रमांक क्र. 1800112356 व मुखस्वास्थासाठी मोफत टोल फ्री क्रमांक क्र. 1800112032 यावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000

No comments:

Post a Comment