Monday 15 May 2023

DIO BULDANA NEWS 13.05.2023

 जवाहर नवोदय विद्यालयाचा उत्कृष्ट निकाल

बुलडाणा, दि. 13 : केंद्रीय उच्च माध्यमिक शिक्षा बोर्ड (सीबीएसई) परीक्षा 2023 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेचा 100 टक्के निकाल लागला आहे. उत्कृष्ट निकालाची परंपरा विद्यालयाने कायम राखलेली असून त्यामध्ये दहावीचे 71 पैकी 71 आणि बारावीचे 73 पैकी 73 विद्यार्थी प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत.

बारावी विज्ञान या शाखेमधून 38 विद्यार्थी परीक्षेला बसलेले होते. ते सर्व विद्यार्थी प्रथम श्रेणी मध्ये उत्तीर्ण झाले आहेत. यामध्ये प्रथम प्रज्वल राउत 91.60 टक्के, द्वितीय गौरव मगर 89.40 टक्के, तृतीय विवेक राजगुरु 87.80 टक्के प्राप्त केले

बारावी कला शाखेतून 35 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. सर्वच्या सर्व विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेले आहेत. प्रथम संकेत कुशवाह 92 टक्के, द्वितीय समृध्दी धामनकर 91.20 टक्के, तृतीय लकी ठाकरे 90.20 प्राप्त केले.

इयत्ता दहावीमधून 71 विद्यार्थी परीक्षेला बसले. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण होऊन सर्व 71 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. प्रथम साक्षी दिवनाले 96.20 टक्के, द्वितीय सृष्टी भालतडक 95.60 टक्के, आदित्य भिवगडे 95.60 टक्के, तसेच अभिषेक तुरुकमाने 95.60 तृतीय समिक्षा देशमुख 95.20 टक्के गुण मिळविले आहे.

विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल विद्यालयाचे प्राचार्य आर. आर. कसर, उपप्राचार्य पी. एन. देशमुख यांनी कौतुक केले आहे.

00000

जवाहर नवोदय विद्यालयातील अकरावीसाठी रिक्त जागांसाठी प्रवेश

*परीक्षेचे अर्ज ऑनलाईन भरण्याची प्रक्रीया सुरु

बुलडाणा, दि. 13 : जवाहर नवोदय विद्यालयातील शैक्षणिक सत्र 2022-23 मध्ये इयत्ता दहावीमध्ये शिकलेल्या सर्व विद्यार्थ्यांना येत्या शैक्षणिक सत्र 2023-24मध्ये इयत्ता अकरावी प्रवेशाकरीता प्रक्रीया सुरू करण्यात आली आहे. दि. 12 मे 2023पासून जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी प्रवेश परीक्षेचे अर्ज ऑनलाईन भरण्याची प्रक्रीया सुरु झाली आहे.

ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत दि. 31 मे 2023 ही असून यावर्षी हे प्रवेश अर्ज संपूर्ण ऑनलाईन पद्धतीने भरले जाणार आहे. यासाठी कोणतीही शुल्क आकारण्यात येणार नाही. त्याकरीता विद्यार्थी हा शैक्षणिक सत्र 2022-23मध्ये बुलडाणा जिल्ह्यातील शासन मान्यताप्राप्त शाळेत दहावीत शिकलेला असावा. विद्यार्थ्याची जन्मतारीख 1  जून 2006 ते 31 जुलै 2008 मधील असावी. ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी माहिती पुस्तकातील नियम व अटी काळजीपूर्वक वाचून अर्ज भरावा. त्याकरीता विद्यार्थ्याचा 10 ते 100 एमबी आकाराचा पासपोर्ट फोटो स्कॅन करुन अपलोड करावा. विद्यार्थी आणि पालकाची सही 10 ते 100 एमबी स्कॅन करुन अपलोड करावी. परीक्षेची तारीख शनिवार, दि. 22 जुलै 2023 असून ऑनलाईन अर्ज भरण्याचे संकेतस्थळ navodaya.gov.in आहे.

00000





बियाणे, खते मुबलक उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न

-पालकमंत्री गुलाबराव पाटील

बुलडाणा, दि. १३ : येत्या खरीप हंगामात सोयाबीन, कापूस आणि तुर पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात होणार आहे. शेतकऱ्यांना बियाणे, खते मुबलक उपलब्ध होण्याबरोबर पिक कर्ज सहज मिळावे यासाठी प्रयत्न करण्यात येतील, अशी माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.

जिल्हा नियोजन समिती सभागृहात आज खरीप हंगामपूर्व आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी खासदार प्रतापराव जाधव, आमदार धीरज लिंगाडे, संजय रायमूलकर, संजय गायकवाड, राजेश एकडे, श्वेता महाले, कृषि सचिव एकनाथ डवले, प्रभारी जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते आदी उपस्थित होते.

श्री. पाटील म्हणाले, जिल्ह्याला सुमारे १५०० कोटी रुपयांचा पतपुरवठा करण्यात येणार आहे. जिल्हा बँक पिक कर्ज देऊ शकत नसल्याने ही जबाबदारी राष्ट्रीय बँकांवर राहणार आहे. त्यामुळे एक लाख ६० हजार रुपयांपर्यंत कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना सीबिलची अट राहणार नाही. शेतकऱ्यांना पेरणी पूर्वी कर्ज पुरवठा व्हावा यासाठी प्रयत्न करण्यात येतील.

जिल्ह्यात ४० टक्के क्षेत्रावर सोयाबीन, कापूस आणि तूर पिकाची पेरणी होणार आहे. पुरेसा पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये. पावसाअभावी उगवण झाली नसल्यास बियाणे टंचाईची शक्यता निर्माण होते. टंचाईमुळे बोगस बियाणे, खते बाजारात दाखल होतात. तसेच इतर उत्पादन खरेदी करण्याची सक्ती होत असल्यास तक्रारीची दखल घेण्यात यावी. भरारी पथक नेमून नियमित कारवाई करण्यात यावी.

कृषि विभागाने शेतकऱ्यांना उपयुक्त सूचना आणि मार्गदर्शन करावे. कृषि विकासासाठी योजनांची अंमलबजावणी योग्यरित्या करावी. शेततळे, शेडनेट यासारख्या योजनांचा लाभ देण्यात यावा.शेतकऱ्यांनी हवामान पद्धतीनुसार शेती करण्यावर भर देऊन पिक पद्धतीत बदल करावा. पिक विम्याचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न करण्यात येतील. अतिवृष्टी आणि गारपिटीमुळे नुकसान भरपाईची मदत वेगवेगळ्या टप्यावर असून लवकरच याचा लाभ देण्यात येणार असल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले.

यावेळी कृषि विभागाच्या योजनेतील लाभार्थींना लाभाचे वाटप करण्यात आले.

००००००

No comments:

Post a Comment