Tuesday 28 February 2023

DIO BULDANA NEWS 28.02.2023

 


सामाजिक न्यायच्या चित्ररथाला हिरवी झेंडी

*योजनांची माहिती ग्रामीण भागात पोहोचणार

बुलडाणा, दि. 28 : सामाजिक न्याय विभागाच्या चित्ररथाला समाज कल्याण सहायक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी सामाजिक न्याय भवन येथे हिरवी झेंडी दाखविली. येत्या महिन्यात हा चित्ररथ सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची जिल्हाभरात प्रसिद्धी करणार आहे.

यावेळी जिल्हा माहिती अधिकारी गजानन कोटुरवार, वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक प्रदिप धर्माधिकारी, समाज कल्याण निरीक्षक प्रमोद खांदवे आदी उपस्थित होते.

विशेष घटक योजनेतून या चित्ररथाची संकल्पना साकारण्यात आली आहे. विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृहे, विविध शिष्यवृती योजना, आंतरजातीलय विवाह प्रोत्साहन, शासकीय पुनर्वसन योजना, राजर्षि शाहू गुणवत्ता पुरस्कार, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, आर्थिक सहाय्य योजना, कर्मवीर दादासाहेब पाटील सबळीकरण योजना, कन्यादान योजना, स्वाधार योजना आदी योजनांची माहिती या चित्ररथाच्या माध्यमातून देण्यात आली आहे.

हा चित्ररथ जिल्ह्यातील सर्व तालुक्यात प्रामुख्याने ग्रामीण भागात फिरणार आहे. चित्ररथामध्ये असणाऱ्या एलईडी दृकश्राव्य माध्यमातून विविध योजनांची माहिती देण्यात येणार आहे. सर्वसामान्य नागरिकांपर्यंत शासनाच्या योजनांची माहिती पोहोविण्यासाठी चित्ररथ प्रयत्न करणार आहे. या चित्ररथाच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या योजनांच्या माहितीचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी केले आहे.

000000




विशेष घटक योजनेतून चांगल्या पायाभूत सुविधा उभाराव्यात

-जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड

बुलडाणा, दि. 28 : मागासवर्गीयांच्या विकासासाठी विशेष घटक योजनेतून जिल्ह्याला चांगला निधी प्राप्त झाला आहे. या निधीतून चांगल्या पायाभूत सुविधा उभारण्यात याव्यात, तसेच हा निधी खर्च होण्यासाठी यंत्रणांनी पुढाकार घ्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड यांनी यांनी केले.

सामाजिक न्याय विभागाच्या विशेष घटक योजनेबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. यावेळी समाज कल्याण सहायक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांच्यासह विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. तुम्मोड यांनी विशेष घटक योजनेतून निधी मिळविणाऱ्या यंत्रणांना दोन वर्षात निधी खर्च करण्याचा कालावधी दिला आहे.  मात्र दोन वर्षाचा अवधी न पाहता निधी याच आर्थिक वर्षात खर्च करण्याचा प्रयत्न करावा. नगर प्रशासन विभागातर्फे या योजनेतून एकही प्रस्ताव सादर केला नाही. येत्या आठ दिवसात प्रस्ताव सादर करून त्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व परवानगी घेण्यात याव्यात. नगर प्रशासनातर्फे निधी मागणी प्रस्ताव सादर केले नसल्यास हा निधी इतर विभागांना देण्यात येईल. नाविन्यपूर्ण योजनांमधून विकास कामे करताना ती चांगल्या दर्जाची व्हावीत, कामे करताना संपूर्ण निधी होण्यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश दिले.

          यावेळी कृषि विभाग, जिल्हा परिषद, उपनिबंधक, सहकारी संस्था, महावितरण, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, महिला व बालविकास, जिल्हा माहिती कार्यालय आदी विभागांचा आढावा घेण्यात आला.

00000







देऊळगाव मही ग्राम क्रीडा संकुलाच्या कामास सुरूवात

बुलडाणा, दि. 28 : देऊळगाव राजा तालुका क्रीडा संकुलांतर्गत देऊळगाव मही ग्राम क्रीडा संकुलाच्या कामास सुरूवात करण्यात आली आहे. या पहिल्या टप्प्यात मैदान सपाटीकरणाच्या कामाचे भूमिपूजन आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते रविवार, दि. 26 फेब्रुवारी 2023 रोजी पार पडले.

भूमिपूजन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी देऊळगांव मही ग्रामच्या सरपंच वंदना शिंगणे, तहसीलदार शाम धनमणे उपस्थित होते. आमदार डॉ. शिंगणे यांच्या प्रयत्नातून ग्राम क्रीडा संकुलासाठी देऊळगाव मही येथील 2 हेक्टर जागा क्रीडा सुविधा उभारणीकरीता प्राप्त झाली आहे. त्यानुसार ग्राम क्रीडा संकुल मैदानाच्या क्रीडाविषयक विकास करावयाचे दृष्टीने सन 2022-23 या वर्षात जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत मैदानाच्या सपाटीकरणासाठी 7 लाख रूपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे.

येत्या काळात विविध क्रीडा विषयक सुविधा निर्माण करण्यात येणार आहे. क्रीडांगणावर 200 मीटर, 400 मीटर धाव मार्ग, क्रीडांगणाभोवती भिंत, तारेचे कंपाऊंड,  क्रीडांगणावर विविध खेळांचे मैदान, क्रीडांगणावर प्रसाधनगृह, क्रीडांगणावर पिण्याच्या पाण्याची सुविधा, क्रीडांगणावर भांडारगृह, क्रीडांगणावर फ्लड लाईटची सुविधा, क्रीडा साहित्य, क्रीडांगणावर माती, सिमेंटचा भराव असलेली प्रेक्षक गॅलरी, आसन व्यवस्था, प्रेक्षक गॅलरीवर, आसन व्यवस्थेवर शेड, क्रीडांगण भोवती ड्रेनेज व्यवस्था, मैदानावर पाणी मारण्यासाठी स्प्रिंकलर यंत्रणा, मैदानावर रोलींग करण्यासाठी मिनी रोलर, आदी क्रीडा विषयक सुविधा निर्माण करण्यात येणार आहे. यामुळे ग्रामीण भागातील खेळाडू आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्यस्तर स्पर्धांमध्ये सहभागी होऊ शकेल.

000000

जिल्ह्यात ३.५४ लाख आयुष्मान ई कार्ड

*पाच लाखांपर्यंत मोफत उपचार

बुलडाणा, दि. 28 : आयुष्मान भारत योजनेंतर्गत मोफत वैद्यकीय उपचार मिळण्यासाठी जिल्ह्यातील ३.५४ लाख लाभार्थीनी ई-कार्ड काढले आहेत. यात अजून ४ लाख ३९ हजार ७१८ लाख लाभार्थ्यांचे ई-कार्ड काढण्यात येणार आहे.

आयुष्मान भारत योजनेत गोरगरीब, आर्थिकदृष्ट्या दुर्बल, मागासवर्गीय प्रवर्गातील नागरिकांना मोफत उपचार मिळावेत, याकरिता महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या एकत्रितरित्या आयुष्मान भारत योजना राबविली जात आहे. यात वर्षाला एक लाखापर्यंत उत्पन्न असल्यास १ हजार २०९ आजारांवर पाच लाखांपर्यंतचे उपचार मोफत मिळणार आहेत. सन २०११ च्या सामाजिक, आर्थिक व जातीय सर्वेक्षणातून जिल्ह्यातील लाभार्थ्याची जनआरोग्य योजनेसाठी निवड करण्यात आली आहे. जिल्ह्यात या योजनेसाठी ७ लाख ४५ हजार १९१ लाभार्थी पात्र ठरले आहेत.

आजपर्यंत ३ लाख ४५ हजार ७३ लाभार्थ्यांनी आयुष्मान भारतचे ई-कार्ड, गोल्डन कार्ड काढले आहे. जिल्ह्यातील २ हजार ९ सीएससी केंद्र आणि ८०० आपले सरकार सेवा केंद्रांतून हे ई-कार्ड, गोल्डन कार्ड काढण्याची मोहिम राबविण्यात येत आहे. सर्व कुटुंबाला शिधापत्रिकेवरून निवडक गंभीर १ हजार २०९ आजारांवर शस्त्रक्रिया उपचाराची सुविधा नोंदणीकृत खासगी आणि सर्व शासकीय रुग्णालयात मोफत उपलब्ध आहे. प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत एक लाख रुपये उत्पन्न असणाऱ्या लाभार्थीला पाच लाख रुपयांचे विमा कवच आहे.

ई-कार्ड काढण्यासाठी आयुष्मान भारत पत्र, रेशन कार्ड आणि आधारकार्ड ही कागदपत्रे घेऊन सीएससी किंवा आपले सरकार सेवा केंद्रात जावे लागणार आहे. स्वतःच्या मोबाइलवर आलेला ओटीपी क्रमांक हा नोंदणी करणाऱ्या व्यक्तीला दिल्यानंतर ई-कार्ड त्वरित तयार होते. गोरगरीब, आर्थिकदृष्ट्या दुर्बल मागासवर्गीय प्रवर्गातील नागरिकांना रेशन कार्डनुसार आयुष्मान ई-कार्ड काढता येणार आहे.

योजनेतून जिल्ह्यात २५ रुग्णालयांमध्ये आरोग्य सुविधा उपलब्ध आहे. यात ५ शासकीय, तर २० खासगी रुग्णालयांचा समावेश आहे. पात्र लाभार्थ्यांनी आयुष्मान भारत ई-कार्ड, गोल्डन कार्ड काढावे. लाभार्थ्यांनी आपले सरकार केंद्र किंवा सीएससी सेंटरवरूनदेखील ई-कार्ड मोफत काढता येणार असल्याचे जिल्हा समन्वयक डॉ. विवेक सावके यांनी कळविले आहे.

00000

शुक्रवारी माजी सैनिक आरोग्य योजनेबाबत बैठक

बुलडाणा, दि. 28 : माजी सैनिक अंशदायी आरोग्य योजनेबाबत असणाऱ्या समस्यांबाबत शुक्रवार, दि. 3 मार्च 2023 रोजी बैठक आयोजित करण्यात आली आहे. यावेळी माजी सैनिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

माजी सैनिक अंशदायी आरोग्य योजनेतील समस्यांचे निवारणासाठी उत्तर महाराष्ट्र नागपूर सब एरियाचे कर्नल विकास वर्मा शुक्रवारी सकाळी ११ वाजता सैनिकी सभा मंडपात आढावा बैठक घेणार आहेत.

माजी सैनिक, माजी सैनिक विधवा पत्नी, युद्ध विधवा, विरमाता, पिता, अवलंबित, जिल्हा सैनिक मंडळ व जिल्हा पोलीस संरक्षण समिती सदस्य, विविध माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष तथा पदधिकारी, शासकीय पुर्ननियुक्त माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष आणि पदधिकारी यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी रुपाली सरोदे यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment