Wednesday 15 February 2023

DIO BULDANA NEWS 15.02.2023



 जिल्हाधिकारी कार्यालयात संत सेवालाल महाराज यांना अभिवादन

बुलडाणा, दि. 15 : जिल्हाधिकारी कार्यालयात संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड यांनी अभिवादन केले.

यावेळी अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, जिल्हा पुरवठा अधिकारी पाटील, नाझर संजय वानखेडे आदी उपस्थित होते. उपस्थितांनी संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस अभिवादन केले.

00000



चिखली औद्योगिक परिसरातील समस्या सोडविण्यावर भर

-जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड

बुलडाणा, दि. 15 : चिखली औद्योगिक परिसर हा जिल्ह्यातील एक विकसित परिसर आहे. याठिकाणी उद्योगधंदे सुरळीत सुरू आहेत. याठिकाणी उद्योग यावेत, त्यातून रोजगार उत्पन्न व्हावेत, यासाठी चिखली औद्योगिक परिसरातील समस्या सोडविण्यावर भर देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड यांनी दिली.

चिखली येथील औद्योगिक परिसरात जिल्हा उद्योग मित्र समितीची सभा पार पडली. यावेळी आमदार श्वेता महाले, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सुनिल पाटील यांच्यासह परिसरातील उद्योजक उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. तुम्मोड म्हणाले, उद्योग उभारणीसाठी सर्वात मोठा मुद्दा हा पतपुरवठ्याचा आहे. त्यामुळे उद्योग उभारणीसाठी मुबलक प्रमाणात कर्ज पुरवठा करण्याच्या सुचना बँकांना करण्यात आल्या आहेत. यासोबत उद्योग उभारणीसाठी लागणाऱ्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. चिखली येथील औद्योगिक परिसरात आता उद्योग उभारणीसाठी जमिन शिल्लक राहिलेली नाही. त्यामुळे आता विस्तारीत परिसरासाठी भूखंड शोधावा लागणार आहे. या कामास आजपासूनच सुरवात करण्यात येत आहे. जमीन तातडीने उपलब्ध व्हावी, यासाठी थेट खरेदीने जमीन संपादन करण्यात येईल.

औद्योगिक परिसरातील वीज, पाणी, रस्त्यांची सुविधा योग्य प्रकारे करण्यात येईल. याठिकाणच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी असलेल्या निधीतून ही कामे प्राधान्याने करण्यात येतील. यासाठी प्रस्ताव सादर करण्यात यावा. पोलिस चौकीची मागणी उद्योजकांकडून करण्यात येत आहे. भूखंड आणि त्यासाठी करण्यात आलेला पाठपुरावा लक्षात घेता याठिकाणी पोलिस चौकी उभारण्यासाठी पावले उचलण्यात येतील. परिसरात टेक्सटाईल, खवा, मिरची, बियाणे, आदी उत्पादन समूह विकसित करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.

आमदार श्रीमती महाले यांनी प्रत्यक्ष ठिकाणी येऊन उद्योजकांच्या समस्या जाणून घेतल्याबद्दल समाधान व्यक्त केले. प्रामुख्याने नवउद्योजकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यात यावा, यासाठी विकास परिषद घेण्याचे आवाहन केले. उद्योगांचा विकास होण्यासाठी त्यांना भौतिक सुविधा देण्यात याव्यात. पाणी, वीज यासारख्या मुलभूत सुविधा उपलब्ध झाल्यास उद्योगपुरक वातावरण होण्यास मदत होईल, असे सांगितले.

यावेळी 2021चा उत्कृष्ट उद्योजक पुरस्कार प्रथम नितीन चौधरी, द्वितीय वैभव काटे यांचा सत्कार करण्यात आला. अमित जैन यांनी प्रास्ताविकातून चिखली औद्योगिक परिसराची माहिती दिली.

00000

दहावी, बारावीतील खेळाडूंनी क्रीडा गुण सवलतीसाठी प्रस्ताव सादर करावेत

*क्रीडा विभागाचे आवाहन

            बुलडाणा, दि. 15 : यावर्षी दहावी, बारावीची परीक्षा देणाऱ्या खेळाडूंनी क्रीडा गुण सवलतीसाठी दि. 5 एप्रिल 2023 पर्यंत प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन क्रीडा विभागाने केले आहे.

माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा देणाऱ्यांनी जिल्हा, विभाग, राज्य स्तरावरील क्रीडा स्पर्धेत प्राविण्यप्राप्त, तसेच राष्ट्रीय अथवा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत प्राविण्य संपादन केलेल्या आणि सहभागी झालेल्या खेळाडूंना क्रीडा सवलतीचे वाढीव गुण देण्यात येणार आहे. शाळा, खेळाडूंनी शासन निर्णयाचे अवलोकन करून प्रस्ताव सादर करावा लागणार आहे.

अमरावती विभागीय मंडळाचे विभागीय सचिव यांनी दिलेल्या विहित नमुन्यात शालेय किंवा संघटनेद्वारा आयोजित जिल्हा, विभागीय, राज्य व राष्ट्रीयख्‍ आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत प्राविण्य संपादन केलेल्या, सहभागी झालेल्या खेळाडूंचे प्रस्ताव, विहित नमुन्यात योग्य माहिती, आधार क्रमांक नमूद करून, परिक्षेचे प्रवेशपत्र, मान्यताप्राप्त खेळाचे प्रमाणपत्र प्रमाणित करून संबंधित शाळांचे, मुख्याध्यापक, प्राचार्य यांच्यातर्फे दोन प्रतीत प्रस्ताव सादर करावे लागणार आहे. तसेच प्रती खेळाडू २५ रूपयांप्रमाणे एकूण खेळाडूचे शुल्क् जिल्हा क्रीडा अधिकारी बुलढाणा यांच्या नावे धनाकर्ष तयार करून शाळेने पाठवावे. दहावी आणि बारावी करीताचे  प्रस्ताव स्वतंत्ररित्या सादर करावे लागणार आहे.

एकविध खेळाच्या अधिकृत संघटनांनी जिल्हा, विभाग, राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे अहवाल dsobld@gmail.com या ईमेल वर पाठवावेत. त्याशिवाय संबंधित क्रीडा स्पर्धांचे प्रस्ताव विभागीय सचिव यांचेकडे सादर करता येणार नाही. अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी केले आहे.

000000

No comments:

Post a Comment