Friday 10 February 2023

DIO BULDANA NEWS 10.02.2023

 













शेतकऱ्यांच्या हितसाठी फुड पार्क संकल्पना राबविणार

-आमदार संजय गायकवाड

*जिल्हास्तरीय कृषि महोत्सवाचे उद्घाटन

* 200 स्टॉलमधून शेतीविषयक मार्गदर्शन

बुलडाणा, दि. 10 : शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या शेतमालाला योग्य भाव मिळण्यासाठी जिल्ह्यातील येळगाव येथे फुड पार्क ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. याठिकाणी शेतमाल विकत घेण्यापासून त्यावर प्रक्रिया आणि तो योग्य ठिकाणी पाठविण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात निश्चितच भर पडणार असल्याचे मत आमदार संजय गायकवाड यांनी व्यक्त केले.

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी आणि प्रकल्प संचालक, आत्मा यांच्यातर्फे आयोजित जिल्हास्तरीय कृषि महोत्सवाचे उद्घाटन आज जिजामाता प्रेक्षागार येथे करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापिठाचे विस्तार संचालक डॉ. धनंजय उंदिरवाडे, विभागीय कृषि सहसंचालक किसन मुळे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी संतोष डाबरे, ओमसिंग राजपूत आदी उपस्थित होते.

श्री. गायकवाड म्हणाले, प्रामुख्याने भाजीपाला पिके हे नाशवंत आहेत. त्यावर योग्य वेळीच प्रक्रिया करावी लागते. अन्यथा शेतकऱ्यांवर ही पिके टाकून देण्याची वेळ येते. त्यामुळे फुड पार्कसारखी संकल्पना शेतकऱ्यांना योग्य भाव मिळवून देण्यासोबतच बाजारेपठेत ज्या ठिकाणी उत्तम भाव मिळेल, त्या ठिकाणी विक्रीसाठी पाठविण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. शेतीमध्ये उत्पादन वाढीसाठी तंत्रज्ञानात अमुलाग्र बदल होत आहे. इस्त्राईलसारख्या देशात प्रगत तंत्रज्ञानाने शेती करण्यात येते. तेथील मार्गदर्शकांना कृषि महोत्सवात बोलाविण्यात यावे. त्यांच्या ज्ञानाचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना निश्चितच लाभ होईल.

आपली शेती पावसावर अवलंबून आहे. त्यामुळे निसर्गाने सोबत दिली तरी चांगले पिक आल्यानंतरही जागतिक बाजारपेठेच्या परिणामामुळे निश्चित हमी भाव मिळेल याची शाश्वती नाही. त्यामुळे शेतीमध्ये पेरताना जागतिक पातळीवर कोणत्या मालाला भाव मिळेल, याचा अंदाज घेऊन त्याला येत्या काळात पिकांची निवड करावी लागणार आहे. जिल्ह्यातून गेलेल्या समृद्धी महामार्गामुळे आपला माल थेट जेएनपीटीपर्यंत पोहोचण्याची सुविधा निर्माण झाली आहे. याठिकाणाहून आपण इतर देशात निर्यात करू शकू. शेतीमधून उत्पादन वाढविण्यासाठी सिंचन हा एकमेव पर्याय आहे. येत्या काळात सिंचनाच्या विविध योजना राबविण्यात येणार असून प्रामुख्याने अवर्षण क्षेत्रात याचा लाभ होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

जिल्हाधिकारी डॉ. तुम्मोड यांनी शेतकऱ्यांच्या पाठिशी शासन नेहमीच खंबीरपणे उभे राहणार आहे. पाठपुराव्यामुळे विम्यापोटी मिळणारी 9 कोटी 87 लाखाची रक्कम प्राप्त झाली आहे. तसेच येत्या काळात 49 हजार शेतकऱ्यांच्या पिक विम्याचा प्रश्न निकाली काढण्यात येईल. यावर्षी जिल्ह्यात रब्बीचे क्षेत्र वाढले आहे. तसेच पिक घेण्याच्या पद्धतीत बदल होणे ही चांगली बाब आहे. शेतकऱ्यांनी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा उपयोग केल्यास शेतीला चांगले दिवस येतील. कृषि प्रदर्शनातील स्टॉल आणि मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

श्री. मुळे शासनाच्या योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा. शेततळे, सेंद्रीय शेतीचा अवलंब करण्यासोबत मुल्य साखळीचा लाभ घेण्याचे आवाहन केले. डॉ. उंदिरवाडे यांनी कृषि प्रदर्शनातील तंत्रज्ञान, प्रात्यक्षिकांचा लाभ घेऊन उत्पादन वाढविण्याचे आवाहन केले. श्री. डाबरे यांनी प्रास्ताविकातून प्रदर्शनीविषयी माहिती दिली.

यावेळी आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षानिमित्त तृणधान्य पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले. कृषि सहायक रूपाली गायकवाड यांनी लिहिलेल्या तृणधान्याच्या पाककला पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. तसेच अनिता पवार, प्रल्हाद गवते, बाळकृष्ण पाटील, विठ्ठल दंदाळे या प्रगतशिल शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

कृषि महोत्सव 14 फेब्रुवारी 2023 पर्यंत सर्वांसाठी खुला राहणार आहे. दरम्यान विविध विषयांवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. शनिवार, दि. 11 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता डॉ. सुभाष टाले शेतावर करावयाचे मृद व जलसंधारण तंत्रज्ञान यावर मार्गदर्शन करतील. दुपारी दोन वाजता घातखेड येथील कृषि विज्ञान केंद्राच्या विषयतज्ज्ञ डॉ. प्रणीता कडू पीएमएफएमई अंतर्गत अन्न प्रक्रिया उद्योग आणि संधी, तर सिताफळ महासंघचे अध्यक्ष श्याम गट्टाणी सिताफळ लागवड आणि प्रक्रिया याबाबत मार्गदर्शन करतील.

रविवार, दि. 12 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता रेशिम संचालनालयाचे सहायक संचालक महेंद्र ढवळे रेशीम उद्योग व्यवसाय, संधी व बाजारपेठेबाबत मार्गदर्शन करतील. दुपारी दोन वाजता ग्रीन ॲग्रो बाजार एक्सपोर्टचे संदिप शेळके शेतकरी उत्पादक कंपनी यांना निर्यातीतील संधी, तसेच दुपारी चार वाजता संजय वाघ ग्लोबल गॅप, फायटोसॅनिटरी, न्युनतम अंश मर्यादा याबाबत मार्गदर्शन करतील.

सोमवार, दि. 13 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठाचे सहायक प्राध्यापक डॉ. योगेश इंगळे संत्रा पिक व्यवस्थापन, दुपारी दोन वाजता विषयतज्ज्ञ श्रीमती के. सी. गांगडे पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्व याबाबत मार्गदर्शन करतील.

मंगळवार, दि. 14 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सी. पी. जायभाये पौष्टिक तृणधान्य लागवड तंत्रज्ञान व बाजारपेठ याबाबत मार्गदर्शन करतील. दुपारी दोन वाजता कृषि महोत्सवाचा समारोप करण्यात येईल. या महोत्सवाचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कृषि विभागातर्फे करण्यात आले आहे.

00000




जागृक पालक सुदृढ बालक अभियानास सुरूवात

बुलडाणा, दि. 10 : ‘जागृक पालक, सुदृढ बालक’ अभियानांतर्गत जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थामध्ये 0 ते 6 आणि 6 ते 18 वर्ष वयोगटातील शालेय मुलांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. या अभियानाची सुरवात बुलडाणा येथील एडेड हायस्कुल आणि ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र, हतेडी येथे करण्यात आली.

शहरी भागात बुलडाणा शहरातील एडेड हायस्कुल आणि ग्रामीण भागासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र, हतेडी येथे या मोहिमेची सुरवात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एम. एम. राठोड यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सरपाते, हतेडीच्या सरपंच श्रीमती जाधव, वैद्यकीय अधिकारी डॉ. वनिता रिंढे, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. तुषार शेळके, डॉ. अरुणधंती ठोंबरे, आरोग्य सहायक एम. पी. चव्हाण, तालुका आरोग्य सहाय्यक लता गुर्जर उपस्थित होते.

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जिल्ह्यामध्ये गुरूवार, दि. 9 फेब्रुवारी 2023 पासून राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमात 0 ते 6 आणि 6 ते 18 वयोगटातील शालेय विद्यार्थ्यांची वर्षातून एकदा आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. जागृक पालक व सुदृढ बालक या अभियानांतर्गत या वयोगटातील सर्व बालकांची तपासणी व संदर्भ द्यावयाची आहे.

कार्यक्राला आरोग्य सेवक पुरूषोत्तम साळोख, रविंद्र गारवे,  नितीष आमल, आरोग्य सेविका लक्ष्मी सुरोशे, शारदा डुकरे, शारदा सुरडकर, रेखा जाधव, सुनिता जवंजाळ, सिमा इंगळे, रुपाली विरहार, शिला जेउघाले, आरोग्य सहाय्यक सुषमा जाधव, औषध निर्माण अधिकारी श्री. नरवाडे, प्रयोग शाळा तंत्रज्ञ श्रीमती साखरे उपस्थित होते.

000000

राज्य वाङमय पुरस्कार स्पर्धेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

बुलडाणा, दि. 10 : मराठी भाषेतील उत्कृष्ट वाङमय निर्मितीसाठी 2022 मध्ये प्रकाशित पुस्तकासाठी स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङमय पुरस्कार देण्यात येत आहेत. त्यासाठी अर्ज करण्याची मुदत दि. 2 मार्चपर्यंत वाढविण्यात आली आहे.

स्पर्धेसाठी दि. 1 जानेवारी 2022 ते 31 डिसेंबर 2022 या कालावधीत प्रकाशित झालेली प्रथम आवृत्ती पुस्तके पात्र आहेत. या स्पर्धेची नियमावली व प्रवेशिका सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाट्य मंदिर इमारत, दुसरा मजला, सयानी मार्ग, प्रभादेवी, मुंबई 400025 यांच्या कार्यालयात, तसेच जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात (सर्वसाधारण शाखा अथवा करमणूक शाखा) विनामूल्य उपलब्ध होतील. महाराष्ट्र शासनाच्या maharashtra.gov.in या संकेतस्थळावर नवीन संदेश या सदरात स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड्.मय पुरस्कार 2022 नियमावली व प्रवेशिका या शीर्षाखाली व ‘व्हाटस् न्यूया सदरात पुरस्काराच्या शीर्षाखाली, तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या sahitya.marathi.gov.in या संकेतस्थळावर प्रवेशिका व नियमपुस्तिका उपलब्ध होतील.

प्रवेशिका पूर्णत: भरुन आवश्यक साहित्यासह सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात दि. 2 मार्च 2023 पर्यंत पोहचतील अशा बेताने पाठवाव्यात. लेखक व प्रकाशक या स्पर्धेसाठी प्रवेशिका दाखल करू शकतात. त्याचप्रमाणे, जिल्हाधिकारी कार्यालयातही दि. 2 मार्च 2023 पर्यंत प्रवेशिका दाखल करता येतील. लेखक व प्रकाशकांनी मंडळाकडे प्रवेशिका व पुस्तके पाठविताना सदर बंद लिफाफ्यावर किंवा पाकिटावर स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङमय पुरस्कार 2022 साठी प्रवेशिका असा स्पष्ट उल्लेख करावा. विहित कालमर्यादेनंतर येणाऱ्या प्रवेशिका स्पर्धेसाठी स्वीकारल्या जाणार नाहीत.

00000

नवोदयच्या नववी प्रवेशासाठी आज निवड चाचणी

बुलडाणा, दि. 10 : जवाहर नवोदय विद्यालयातील नववीच्या प्रवेशासाठी निवड चाचणी परीक्षा शनिवार, दि. 11 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 11.15 वाजता होणार आहे. तीन परिक्षा केंद्रावर ही परिक्षा घेण्यात येणार आहे.

ही परिक्षा जवाहर नवोदय विद्यालय, शेगाव, बुरुंगले विद्यालय, शेगाव आणि जे. व्ही. मेहता हायस्कूल, खामगाव तीन केंद्रावर होणार आहे. या परीक्षेकरीता विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर सकाळी 10.30 वाजता उपस्थित राहणे आवश्यक आहे. परीक्षेचे प्रवेश पत्र navodaya.gov.in. या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. संबधित शाळेतील मुख्याध्यापक, पालक, विद्यार्थी यांनी प्रवेश पत्र डाउनलोड करून परिक्षेस उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000







रक्तदान शिबिरात 57 जणांचे रक्तदान

*ग्रामीण रुग्णालयात आरोग्य शिबिराचा शुभारंभ

*शिबिरात एक हजार 365 रूग्णांची तपासणी

बुलडाणा, दि. 10 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यातील महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेंतर्गत अंगीकृत रुग्णालय आणि ग्रामीण रूग्णालयात रक्तदान शिबिर  पार पडले. यात 25 रूग्णालयांमध्ये शिबिर घेण्यात आले. या शिबिरात एक हजार 365 रूग्णांची तपासणी करण्यात आली असून 57 जणांनी रक्तदान केले.

जिल्हा रूग्णालयासह ग्रामीण रुग्णालय मेहकर, ग्रामीण रुग्णालय चिखली, उपजिल्हा रुग्णालय मलकापूर, रक्तपेढी यांच्या माध्यमातून रक्तदान शिबिर घेण्यात आले. यात 61 आभा कार्ड, 16आयुष्मान कार्ड वितरीत करण्यात आले.

जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. नितिन तडस अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणुन मृत्यूंजय कुणालभाऊ गायकवाड उपस्थित होते. यावेळी डॉ. सुशिल चौहान, डॉ. सौरभ संचैती, डॉ. अमोल कोथळकर, जिल्हा रक्तपेढी प्रमुख डॉ. शितल सोलंकी, जिल्हा समन्वयक डॉ. विवेक सावके बुलढाणा, डॉ. धारणा चारपे, डॉ. शेळके उपस्थित होते.

रक्तदानाच्या जनजागृतीसाठी सकाळी प्रभातफेरी काढण्यात आली. त्यानंतर सकाळी 10 वाजता जिल्हा रुग्णालयात दिपप्रज्वलन करून शिबिरास सुरुवात करण्यात आली. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र आणि आरोग्यवर्धिनी केंद्रामध्ये आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले.  एकत्रित आयुष्मान भारत योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत अंगीकृत रुग्णालये शिबिरात सहभागी झाले.

मधुसूदन पवार, योगेश्वर झगरे, ओशो मानकर, सपकाळ,बनसोडे, श्री. सावळे, पियूष चौहान, चेतन जाधाव, जिल्हा पर्यवेक्षक सूरज पवार यांनी शिबिरासाठी सहकार्य केले.

00000

पेट्रोल पंपाच्या ना हरकत प्रमाणपत्रासाठी

ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 10 : उद्योग संवर्धन आणि आंतरित व्यापार विभाग वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने पेट्रोल पंप सुरु करण्यासाठी लागणारे नाहरकत प्रमाणपत्रासाठी आता ऑनलाईन अर्ज सुविधा उपलब्ध करण्यात आली. नागरिकांनी या सुविधांचा उपयोग करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्हादंडाधिकारी कार्यालयात नविन पेट्रोल पंप सुरू करण्याकरीता नाहरकत प्रमाणपत्र मिळण्यासंदर्भात परिपूर्ण प्रस्ताव isda.peso.gov.in संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीनेच सादर करावे लागणार आहे. यानंतर नविन प्रस्ताव ऑफलाईन पद्धतीने स्विकारल्या जाणार नाहीत, असे जिल्हादंडाधिकारी यांनी कळविले आहे.

000000


No comments:

Post a Comment