Friday 24 February 2023

DIO BULDANA NEWS 24.02.2023


जळगाव जामोद येथील रोजगार मेळाव्यात

१२ उमेदवारांना मेळाव्यातच ऑफर लेटर
बुलडाणा, दि. २४ : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, बुलडाणा मॉडेल करिअर सेंटर आणि जळगाव जामोद शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने आज दि. 24 फेब्रुवारी रोजी जळगाव जामोद येथे रोजगार मेळावा उत्साहात पार पडला. यात १२ उमेदवारांना मेळाव्यातच ऑफर लेटर देण्यात आले. 
सदर मेळाव्यासाठी 1 हजार 959 उमेदवारांनी नोंदणी केली. यातील 856 उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखत दिली. सदर मेळाव्यात 635 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली आहे. 
आमदार डॉ. संजय कुटे यांनी दीप प्रज्वलन करून मेळाव्याचे उद्घाटन केले. जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सुनील पाटील अध्यक्षस्थानी होते. यावेळी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य श्री. महाले, श्री. काळे, श्री. भावले, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर, स्वीय सहाय्यक वसंत पालवे उपस्थित होते.
आमदार डॉ. कुटे यांनी, कौशल्य, मेहनत करण्यासाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. युवकांनी सुरवातीला कमी पगारापासून सुरुवात करून प्रगती करावी आणि आयुष्यात सन्मानाचे स्थान मिळवावे. कोणतेही काम लहान नसून आपला आत्मसन्मान हा सगळ्यात मोठा आहे. आयुष्यात शून्यातून विश्व निर्माण करता येऊ शकते. कोणतीही लाज न बाळगता
काम केल्यास त्यामधून यश प्राप्ती होते. अनुभवातून आलेले कौशल्य उपयोगात आणून त्याचा आपल्या जीवनात फायदा करून घ्यावा, असे आवाहन केले.
श्री. पाटील यांनी जिल्हा उद्योग केंद्राच्या योजनांची माहिती देवून युवकांनी स्वयंरोजगाराचा मार्ग निवडावा असे आवाहन केले. श्रीमती बारस्कर यांनी प्रास्ताविकातून मेळाव्यासाठी १८ उद्योगानी सहभाग नोंदवून एक हजारावर पदे अधिसूचित केली असल्याची माहिती दिली. प्राचार्य श्री. महाले यांनी आभार मानले.
मेळाव्यासाठी कौशल्य विकास कार्यालय, जळगाव जामोद शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
00000



केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे

पांडुरंग फुंडकरांना अभिवादन

बुलडाणा, दि. 24 : केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज, दि. 24 फेब्रुवारी 2023 रोजी जिल्ह्याला भेट दिली. यावेळी त्यांनी खामगाव येथील स्व. पांडुरंग फुंडकर यांच्या समाधीस्थळी अभिवादन करून पुतळ्याला पुष्पहार अर्पण केले.

श्री. गडकरी यांचे खामगाव येथील सिद्धीविनायक अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या हेलिपॅडवर आगमन झाले. याठिकाणी असलेल्या स्व. पांडुरंग फुंडकर यांच्या समाधीस्थळी त्यांनी भेट देऊन अभिवादन केले. यावेळी स्वागत बेटी बचाव बेटी पढाव अभियानाचे राष्ट्रीय संजोजक डॉ राजेंद्र फडके, आमदार अॅड. आकाश फुंडकर, विजयराज शिंदे, खविसचे अध्यक्ष शिवशंकर लोखंडकार, महेंद्र रोहनकार, डॉ. गोपाल गव्हाळे, उपविभागीय अधिकारी अतुल पतोळे आदी उपस्थित होते.

त्यानंतर श्री. गडकरी यांनी सतीश जळगावकर यांच्या निवासस्थानी भेट दिल्यानंतर नांदेडकडे प्रयाण केले.

000000

मोफत निवासी उद्योजकता विकास कार्यक्रमासाठी सोमवारी निवड

बुलडाणा, दि. 24 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष सामूहिक प्रोत्साहन योजनेंतर्गत मोफत निवासी उद्योजकता विकास कार्यक्रम अमरावती येथे घेण्यात येणार आहे. या प्रशिक्षणासाठी सोमवार, दि. 27 फेब्रुवारी 2023 रोजी 12 वाजता चिखली रोडवरील सैनिकी वसतिगृहात निवड करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रातर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष सामूहिक प्रोत्साहन योजनेंतर्गत उद्योग संचालनालयातर्फे अनुसूचित जाती प्रवर्गातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवती, नवउद्योजकांसाठी मोफत निवासी उद्योजकता विकास कार्यक्रम दि. 28 फेब्रुवारी ते 17 मार्च 2023 या कालावधीत अमरावती येथे करण्यात येणार आहे. या प्रशिक्षणाचा परिचय कार्यक्रम आणि लाभार्थींची निवड करण्यासाठी उद्योजकता परिचय कार्यक्रम आणि प्रत्यक्ष मुलाखतीची आयोजन करण्यात आले आहे, असे जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सुनील पाटील यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment