Tuesday 21 February 2023

DIO BULDANA NEWS 21.02.2023

 जळगाव जामोद येथे शुक्रवारी रोजगार मेळावा

* उमेदवारांना 1000 जागांवर नोकरीची संधी

बुलडाणा, दि. 21 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने जळगाव जामोद येथे शुक्रवार, दि. 24 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 10 वाजता रोजगार मेळावा घेण्यात येणार आहे. हा मेळावा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जळगाव जामोद येथे घेण्यात येईल. या मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

या रोजगार मेळाव्यामध्ये 16 पेक्षा अधिक उद्योजकांनी 1 हजारपेक्षा अधिक रिक्त पदे अधिसुचित केली आहेत. नोंदणीकृत उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. मेळाव्यात इंडोरामा, महिंद्रा, हिताची यासारख्या नामांकित कंपनीचे प्रतिनिधी गरजू आणि रोजगार इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेऊन प्राथमिक निवड करतील. तसेच जिल्ह्यातील उमेदवारांना कौशल्य विकास प्रशिक्षणाची संधी नि:शुल्क उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. एल ॲण्ड टी, रेमंड, इंड्युरंस सारख्या नामांकित कंपनीमध्ये प्रत्यक्ष प्रशिक्षणाची संधी या मेळाव्याद्वारे उपलब्ध होणार आहे.

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नाव नोंदणी केलेल्या दहावी, बारावी, आयटीआय, पदवीधर पुरुष, महिला उमेदवारांनी जळगाव जामोद येथे प्रत्यक्ष उपस्थित राहावे. या रोजगार मेळाव्यात सहभागी होण्याकरीता कार्यालयात येण्याची आवश्यकता नाही.

 पात्र, गरजू आणि नोकरी इच्छुक महिला आणि पुरुष उमेदवार शैक्षणिक पात्रतेच्या आधारे एकापेक्षा जास्त पदाकरिता अर्ज करु शकतील. मुलाखतस्थळी आवश्यक त्या कागदपत्रासह उपस्थित राहून नाव नोंदणी करावी आणि उपस्थित कंपनींच्या प्रतिनिधीसमवेत मुलाखत द्यावी. जिल्ह्यातील उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी केले आहे. याबाबत अडचण आल्यास जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र, बुलडाणा या कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक 07262-242342 वर संपर्क साधावा, असे कळविले आहे.

0000

क्रीडा संकुल समितीची बैठक संपन्न

बुलडाणा, दि. 21 : जिल्हा क्रीडा संकुल कार्यकारी समितीची बैठक जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड यांच्या अध्यक्षेखाली सोमवार, दि. 20 फेब्रुवारी 2023 रोजी पार पडली. या बैठकीत समितीच्या विविध कामकाजाबाबत चर्चा करण्यात आली.

जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी दि. 10 नोव्हेंबर 2022 रोजी झालेल्या सभेचे इतिवृत्ताचे वाचन करून त्यास मान्यता देण्यात आली. तसेच सभेमध्ये सहा विषयावर चर्चा होऊन ठराव पारीत करण्यात आले.

यात जिजामाता क्रीडा आणि व्यापारी संकुलातील पहिला मजल्यावरील व्यापारी गाळा क्रमांक 42, 43 आणि तळ मजल्यावरील 44, 45 गाळे 11 महिन्यांच्या कालावधीसाठी भाड्याने देण्याबाबत कार्यवाही करण्याबाबत निर्णय घेण्यात आला. तसेच जिल्हा क्रीडा संकुल आणि जिजामाता क्रीडा व व्यापारी संकुल येथील क्रीडा सुविधांचे शासकीय यंत्रणांकडे असलेले थकीत भाडे प्राप्त करुन घेण्याबाबत निर्णय घेण्यात आला.

जिल्हा क्रीडा संकुल समितीच्या कार्यालयासाठी आवश्यक असणारे साहित्य खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच मानधनावरील पदांच्या सेवा, सहकार कायद्यांतर्गत नोंदणीकृत संस्थेमार्फत उपलब्ध करुन घेण्याबाबत निर्णय घेण्यात आला. जिल्हा क्रीडा संकुल कार्यकारी समितीच्या मालकीचे मिनी रोलर, वापराबाबत नियमावली, तसेच प्रतिदिन दोन हजार रुपये भाडे घेण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला.

00000

धनगर समाजातील विद्यार्थ्यांसाठी स्वयंम योजना

*अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना मिळणार लाभ

बुलडाणा, दि. 21 : वसतिगृहात प्रवेश मिळालेल्या धनगर समाजातील विद्यार्थ्यांना स्वयंम याजनेचा लाभ देण्यात येणार आहे. याठी शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावा लागणार आहे. विद्यार्थ्यांच्या थेट बँक खात्यात ही रक्कम वितरीत करण्यात येणार आहे.

जिल्हास्तरीय शैक्षणिक संस्थामध्ये शिक्षण घेत असलेल्या धनगर समाजातील विद्यार्थ्यांना सन 2022-23 या शैक्षणिक वर्षामध्ये बारावी आणि त्यानंतरच्या मान्यताप्राप्त जिल्हास्तरावरील तंत्रशिक्षण तसेच व्यवसाय शिक्षण घेतलेल्या परंतू शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश मिळालेल्या धनगर समाजातील विद्यार्थ्यांना पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेंतर्गत भोजन, निवास व इतर शैक्षणिक साहित्य घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न थेट बँक खात्यात रक्कम वितरीत करण्यात येणार आहे.

या योजनेच्या लाभासाठी विद्यार्थी हा धनगर समाजातील असावा, विद्यार्थ्यांने अर्जासोबत जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. विद्यार्थ्यांच्या पालकांचे उत्पन्न 2 लाख 50 हजार रूपयांपेक्षा अधिक नसावे. विद्यार्थ्यांने स्वत:चे आधार क्रमांक आपले राष्ट्रीयकृत बँक खात्याशी संलग्न करावे. विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या शहराच्या ठिकाणी आहे, अशा शहरातील विद्यार्थी रहिवासी नसणे आवश्यक आहे.

तसेच बारावीमध्ये 60 टक्के गुण असणे अवाश्यक. दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या अभ्यासक्रमासाठी या योजनेचा लाभ मिळणार नाही. बारावी आणि नंतरच्या मान्यताप्राप्त तंत्रशिक्षण, तसेच व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेला असावा. निवड करण्यात आलेला विद्यार्थी संबधित अभ्यासक्रमाच्या परीक्षेत उत्तीर्ण होणे आवश्यक राहील. एका विद्यार्थ्यांस जास्तीत जास्त 5 वर्षे योजनेचा लाभ घेता येईल. योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांचे कमाल वय 28 वर्षापेक्षा अधिक नसावे. विद्यार्थी कोणत्याही प्रकारची नोकरी व्यवसाय करत नसावा. विद्यार्थ्यांस आदिवासी विकास विभाग, सामाजिक न्याय विभाग किंवा संबंधित शैक्षणिक संस्थेच्या वसतिगृहामाध्ये प्रवेश मिळालेला नसावा.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना विजाभज, इमाव आणि विमाप्र कल्याण विभागाच्या महाडीबीटीमध्ये अर्ज केला आहे आणि सदर अर्ज मंजूर झाला आहे, त्यांना अनुज्ञेय राहील. वसतिगृह प्रवेश प्रणालीद्वारे ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक राहिल. संबंधित विद्यार्थी आणि शैक्षणिक संस्थेने अर्ज करणे अनिवार्य राहील, त्याप्रमाणे महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने सहाय्यक आयुकत, समाज कल्याण यांच्याकडे अर्ज करणे अनिवार्य राहील. त्याचप्रमाणे महाडीबीटी पोर्टलवर मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरलेले विद्यार्थी या योजनेच्या लाभास पात्र असतील. अधिक माहितीसाठी समाज कल्याण सहाय्यक आयुक्त कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी केले आहे.

0000000

नाफेडतर्फे तुरीला 6600 रूपये प्रति क्विंटल दर

बुलडाणा, दि. 21 : जिल्ह्यात नाफेडतर्फे तूर खरेदी सुरवात करण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत योजनेंतर्गत ६ हजार ६०० रूपये प्रति क्विंटल हमीदराने तूर खरेदी करण्यात येणार आहे. खरेदी बाबत नोंदणी दि. २१ जानेवारी २०२३ पासून सुरु करण्यात आली आहे.

तूर खरेदीसाठी नोंदणी दि. ६ मार्च २०२३ पर्यंत नोंदणी सुरु राहणार आहे. तसेच खरेदीचा कालावधी दि. १ फेब्रुवारी २०२३ पासून सुरु झाली असून दि. ३० एप्रिल २०२३ राहणार आहे. जिल्ह्यामध्ये तूर खरेदीसाठी जिल्ह्यामध्ये ६ खरेदी केंद्रांना मान्यता देण्यात आली आहे. यात तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री समिती मर्यादित बुलडाणा, मेहकर, सोनपाऊल ॲग्रो प्रोड्युसर कंपनी, अंजनी खु., केंद्र साखरखेर्डा, स्वराज्य शेतीपुरक सहकारी संस्था, चिखली, केंद्र - उंद्री, कृषि उत्पन्न बाजार समिती, सिंदखेडराजा, केंद्र - मलकापूर पांग्रा, बीबी फार्मर प्रोड्युसर कंपनी, बिबल केंद्र - किनगाव जट्टू या केंद्रांना मान्यता दिली आहे. त्यानुसार जिल्हा पणन अधिकारी यांनी सहा ठिकाणी तूर खरेदी सुरु करण्याचे आदेश दिले आहे.

त्यानुसार शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी खरेदी केंद्रावर नोंदणी करावी, तसेच ज्या शेतकऱ्यांना खरेदीसाठी एसएमएस येतील, त्या शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रवरील संस्थांकडे आपला माल विक्रीसाठी घेऊन जावे, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी एम. जी. काकडे यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment