Tuesday 7 February 2023

DIO BULDANA NEWS 07.02.2023

 उमेदवारांनी नियुक्तीच्या खोट्या आदेशाला बळी पडू नये

*सुरक्षा रक्षक मंडळाचे आवाहन

बुलडाणा, दि. 7 : सुरक्षा रक्षक मंडळातील नियुक्तीबाबतच्या खोट्या आदेशांना उमेदवारांनी बळी पडू नये, असे आवाहन जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळातर्फे करण्यात आले आहे.

अमरावती जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळामार्फत सरकारी, निमसरकारी, मंडळे, महामंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था, कारखाने व खाजगी आस्थापना येथे नोंदीत सुरक्षा रक्षकांचा नियमानुसार व आस्थापनेच्या मागणीनुसार पुरवठा करण्यात येतो. मंडळाचे कार्यक्षेत्र पाच जिल्ह्याचे असून अमरावती येथील मुख्य कार्यालयातूनच पाचही जिल्ह्याचे कामकाज करण्यात येते. त्यामुळे मंडळाचे इतर जिल्ह्यात कोणतेही सद्यस्थितीत कार्यालय नाही. परंतु सुरक्षा रक्षक मंडळातील नियुक्ती बाबतचे खोटे आदेश उमेदवारांना देऊन त्यांची आर्थिक फसवणूक करण्यात येत असल्याचे लक्षात आले आहे. यामुळे अशा घटनेसंबंधी सतर्कता बाळगण्याचे आवाहन अमरावती जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाचे प्र. सहायक कामगार आयुक्त प्र. रा. महाले यांनी केले आहे.

दि. 25 जानेवारी 2023 मंडळाच्या लेटर पॅडप्रमाणे, बनावट लेटर पॅडचा वापर करुन बुलडाणा जिल्ह्यातील काही व्यक्तीस (उमेदवारास) नोंदीत सुरक्षा रक्षक म्हणून महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि.मि. बुलडाणा येथे कार्यालयीन नियुक्ती आदेश देण्यात आल्याचे प्रथम दर्शनी निदर्शनास आले. या आदेशाची शहानिशा केली असता हा आदेश खोटा व बनावट असल्याचे मंडळाच्या निदर्शनास आले आहे.

अमरावती जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाकडून उमेदवारांना आवाहन करण्यात येते की, कोणत्याही त्रयस्थ व्यक्तीकडून बनावट रुजू आदेश, मंडळात नोंदणी करण्याचे आमिष, सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी देण्याचे आमिष, इत्यादीबाबत आर्थिक व्यवहार जर होत असल्यास किंवा त्रयस्थ व्यक्ती मागणी करीत असल्यास अध्यक्ष अथवा सचिव, अमरावती जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ यांच्याकडे ताबडतोब संपर्क साधावा. तसेच नजिकच्या पोलीस स्टेशनमध्ये संबंधिताविरुध्द तक्रार नोंदवावी, असे अमरावती जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळामार्फत कळविण्यात आले आहे.

00000

गुरूवारी रक्तदान, आरोग्य तपासणी शिबिर

बुलडाणा, दि. 7 : महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यातील अंगीकृत रुग्णालय आणि ग्रामीण रूग्णालयात गुरूवार, दि. 9 फेब्रुवारी 2023 रोजी रक्तदान आणि आरोग्य तपासणी शिबिर आयोजन करण्यात आले आहे.

जनआरोग्य योजनेतील रूग्णालये आणि ग्रामीण रुग्णालय मेहकर, ग्रामीण रुग्णालय चिखली, जिल्हा रुग्णालय बुलडाणा, उपजिल्हा रुग्णालय मलकापूर, रक्तपेढी यांच्यावतीने रक्तदान शिबिर घेण्यात येणार आहे.

शिबिराची सुरुवात प्रभात फेरीने होणार आहे. जिल्हा रुग्णालय येथे सकाळी ९ वाजता दिपप्रज्वलन करून शिबिराला सुरुवात करण्यात येणार आहे. यादिवशी सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र आणि आरोग्यवर्धिनी केंद्रामध्ये आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केल्या जाणार आहे. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

000000

No comments:

Post a Comment