Monday 20 February 2023

DIO BULDANA NEWS 20.02.2023

 दहावी, बारावीच्या परीक्षा केंद्रावर जमावबंदी आदेश

*जिल्हाधिकाऱ्यांनी केले कलम 144 लागू

बुलडाणा, दि. 20 : यावर्षीच्या दहावी, बारावीच्या परीक्षा सुयोग्य वातावरणात पार पाडण्यासाठी विविध उपायोजना करण्यात येत आहे. परीक्षेतील गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी कॉपीमुक्त अभियान राबविण्यासोबतच आता जिल्हाधिकारी यांनी परीक्षा केंद्राच्या ठिकाणी जमावबंदी आदेश लागू केला आहे. यासाठी फौजदारी प्रक्रीया संहीता 1973 चे कलम 144 लागू करण्यात आले आहे.

माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळातर्फे बारावीची परीक्षा दि. 21 फेब्रुवारी 2023 ते दि. 21 मार्च 2023 आणि दहावीची परीक्षा दि. 2 ते 25 मार्च 2023 या कालावधीत घेण्यात येणार आहे. या परिक्षांच्या कालावधीत परिक्षामध्ये होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी संपुर्ण राज्यात कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येणार आहे. दरम्यान सदर परिक्षेतील गैरव्यवहार टाळण्यासाठी खबरदारीची उपाययोजना, तसेच परिक्षेदरम्यान कोणताही गैरप्रकार होऊ नये, यासाठी परीक्षा केंद्राच्या परिसरामध्ये परीक्षा कालावधीत फौजदारी प्रक्रिया संहिता 1973चे कलम 144 लागू करण्यात आले आहे.

जिल्हादंडाधिकारी म्हणून प्राप्त अधिकाराचा वापर करून जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड यांनी जिल्ह्यातील परिक्षेदरम्यान होणारे गैरव्यवहार टाळण्यासाठी सर्व परीक्षा केंद्राच्या परिसरामध्ये परीक्षा कालावधीत परिक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात संगणक सेंटर, झेरॉक्स सेंटर, मोबाईल सेंटर परीक्षा सुरू होण्यापूर्वी एक तास आधीपासून परीक्षा संपेपर्यंत बंद ठेवण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू केले आहे.

000000



जिल्हाधिकारी कार्यालयात बाळशास्त्री जांभेकरांना अभिवादन

बुलडाणा, दि. 20 : जिल्हाधिकारी कार्यालयात आचार्य बाळशास्त्री जांभेकरांना अभिवादन करण्यात आले.

निवासी उपजिल्हाधिकारी गौरी सावंत यांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी तहसिलदार श्यामला खोत, पुष्पा डाबेराव, पी. के. करे, विधी अधिकारी गजानन पदमने, नाझर संजय वानखेडे आदी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

00000

सर्वांनी कॉपीमुक्त अभियानास सहकार्य करावे

खासदार प्रतापराव जाधव यांचे आवाहन

बुलडाणा, दि. 20 : येत्या काळात दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेण्यात येणार आहे. ही परीक्षा स्पर्धात्मक वातावरणात व्हावी, यासाठी कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानास संस्थाचालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी मनापासून सहकार्य करावे, असे आवाहन खासदार प्रतापराव जाधव यांनी केले आहे.

खरोखर अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवर गैरप्रकाराने अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांकडून अन्याय होतो. कॉपी करून वरच्या श्रेणीत आलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक आणि इतर ठिकाणी चांगली संधी प्राप्त होते. मात्र खरोखरची गुणवत्ता असणारे विद्यार्थी मागे पडत असल्याने कॉपीमुक्त अभियान काळाची गरज झाली आहे.

राज्य शासनाने दहावी आणि बारावीच्या परीक्षेत कॉपी सारख्या गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी कडक उपाययोजना केल्या आहेत. या उपाययोजनांची अंमलबजावणी दहावी आणि बारावीचे परीक्षा केंद्र असलेल्या शाळांनी करावी. समाजातील सर्व घटकांनी या अभियानास सहकार्य करावे. जेणेकरून समाजात एक चांगले वातावरण निर्माण होऊन सुदृढ आणि गुणवत्तायुक्त नवीन पिढी तयार करण्यास मोलाचा हातभार लागेल, असे श्री. जाधव यांनी सांगितले.

00000

राज्य वाङमय पुरस्कार स्पर्धेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ

        बुलडाणा, दि. 20 : मराठी भाषेतील उत्कृष्ट वाङमयनिर्मितीसाठी 2022 मध्ये प्रकाशित पुस्तकासाठी स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङमय पुरस्कार देण्यात येत आहेत. त्यासाठी अर्ज करण्याची मुदत दि. 2 मार्च पर्यंत वाढविण्यात आली आहे.

          स्पर्धेसाठी दि. 1 जानेवारी 2022 ते 31 डिसेंबर 2022 या कालावधीत प्रकाशित झालेली प्रथम आवृत्ती पुस्तके पात्र आहेत. या स्पर्धेची नियमावली व प्रवेशिका सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाट्य मंदिर इमारत, दुसरा मजला, सयानी मार्ग, प्रभादेवी, मुंबई 400025 यांच्या कार्यालयात, तसेच जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात (सर्वसाधारण शाखा अथवा करमणूक शाखा) विनामूल्य उपलब्ध होतील. महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर नवीन संदेश या सदरात स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाड्.मय पुरस्कार 2022 नियमावली व प्रवेशिका या शीर्षाखाली व ‘व्हाटस् न्यू’या सदरात पुरस्काराच्या शीर्षाखाली, तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या http://sahitya.marathi.gov.in या संकेतस्थळावर प्रवेशिका व नियमपुस्तिका उपलब्ध होतील.

        प्रवेशिका पूर्णत: भरुन आवश्यक साहित्यासह सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात दि. 2 मार्च 2023 पर्यंत पोहचतील अशा बेताने पाठवाव्यात. लेखक व प्रकाशक या स्पर्धेसाठी प्रवेशिका दाखल करू शकतात. त्याचप्रमाणे, जिल्हाधिकारी कार्यालयात दि. 2 मार्च 2023 पर्यंत प्रवेशिका दाखल करता येतील. लेखक व प्रकाशकांनी मंडळाकडे प्रवेशिका व पुस्तके पाठविताना सदर बंद लिफाफ्यावर किंवा पाकिटावर स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङमय पुरस्कार 2022 साठी प्रवेशिका असा स्पष्ट उल्लेख करावा. विहित कालमर्यादेनंतर येणाऱ्या प्रवेशिका स्पर्धेसाठी स्वीकारल्या जाणार नाहीत.

00000

No comments:

Post a Comment