Monday 13 February 2023

DIO BULDANA NEWS 13.02.2023

 

गुरूवारी उदयनगर येथे रोजगार मेळावा

*इच्छुक उमेदवारांना खासगी नोकरीची संधी

बुलडाणा, दि. 13 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने उदयनगर (उंद्री) येथे गुरुवार, दि. 16 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 10 वाजता रोजगार मेळावा घेण्यात येणार आहे. हा मेळावा स्व. दयासागरजी महाले औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत घेण्यात येईल. या मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

या रोजगार मेळाव्यामध्ये 16 पेक्षा अधिक उद्योजकांनी 1 हजार 178 पेक्षा अधिक रिक्त पदे अधिसुचित केली आहेत. नोंदणीकृत उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. मेळाव्यात टाटा, महिंद्रा, हिताची यासारख्या नामांकित कंपनीचे प्रतिनिधी गरजू आणि रोजगार इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेऊन प्राथमिक निवड करतील. तसेच जिल्ह्यातील उमेदवारांना कौशल्य विकास प्रशिक्षणाची संधी नि:शुल्क उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. टाटासारख्या नामांकित कंपनीमध्ये प्रत्यक्ष प्रशिक्षणाची संधी या मेळाव्याद्वारे उपलब्ध होणार आहे.

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नाव नोंदणी केलेल्या दहावी, बारावी, आयटीआय, पदवीधर पुरुष, महिला उमेदवारांनी उदयनगर (उंद्री) प्रत्यक्ष उपस्थित राहावे. या रोजगार मेळाव्यात सहभागी होण्याकरीता कार्यालयात येण्याची आवश्यकता नाही. जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांना नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी मंत्री मंगलप्रभात लोढा आणि आमदार श्वेता महाले यांच्या मार्गदर्शनात हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

 

पात्र, गरजू आणि नोकरी इच्छुक महिला आणि पुरुष उमेदवार शैक्षणिक पात्रतेच्या आधारे एकापेक्षा जास्त पदाकरीता अर्ज करु शकतील. मुलाखतस्थळी आवश्यक त्या कागदपत्रासह उपस्थित राहून नाव नोंदणी करावी आणि उपस्थित कंपनींच्या प्रतिनिधीसमवेत मुलाखत द्यावी. जिल्ह्यातील उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर यांनी केले आहे. याबाबत अडचण आल्यास जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र, बुलडाणा या कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक 07262-242342 वर संपर्क साधावा, असे कळविले आहे.

00000

थेट कर्ज योजनेसाठी कागदपत्रांची पुर्तता करण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 13 : वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळातर्फे थेट कर्ज योजना राबविण्यात येत आहे. या योजनेतील त्रृटी असलेल्या प्रस्तावांच्या कागदपत्रांची पुर्तता करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ मर्यादित विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाच्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील व्यक्तींना सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक उन्नतीकरीता शासनाच्या विविध योजना राबविण्यात येतात.

विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांसाठी महामंडळातर्फे एक लाख रूपयांपर्यंतच्या मर्यादेत थेट कर्ज योजना राबविली जाते. या कर्ज योजनेचे अर्ज ज्या लाभार्थीने घेऊन गेले असतील आणि अद्यापपर्यंत कार्यालयात कागदपत्राची पुर्तता करुन सादर केले नसतील, त्यांनी ते संपुर्ण कागदपत्रासोबत आठ दिवसाच्या आत कार्यालयात जमा करावेत. ज्यांनी अर्ज सादर केलेले आहेत, परंतु कागदपत्रे अपुर्ण आहेत, अशा लाभार्थ्यांने जिल्हा कार्यालयात कागदपत्रांची पूर्तता करावी. यानंतर येणाऱ्या कर्ज अर्ज आणि त्रुटीची पुर्तता करण्यात येणार नाही. कर्ज उद्दिष्ट कमी असून अर्ज अधिक आल्यामुळे लाभार्थ्यांची निवड लकी ड्रॉ पद्धतीने करण्यात येणार आहे. काही अडचणी निर्माण झाल्यास महामंडळाचे कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, चिखली रोड, बुलडाणा व दूरध्वनी क्र. 07262-295311 यावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आल आहे.

00000000

लिंबूवर्गीय फळ पिकातील कोळी कीड नियोजन करण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 13 : जिल्ह्यात लिंबूवर्गीय फळ पिकावर कोळी किडीचा प्रादूर्भाव दिसून येत आहे. कोळी किडीमुळे लिंबू आणि संत्रा फळावर विकृती येत असल्यामुळे, तसेच जखमामधून जिवाणूचा शिरकाव होत असल्याचे फ्रुटलेट ब्लाईट रोग वाढत असल्यामुळे या रोगाचे व्यवस्थापन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

कोळी कीड ही आकाराने लहान असल्याने डोळ्याने सहजपणे दिसत नाही. प्रौढ आणि पिल्ले पानातील व फळातील रस शोषण करतात. त्यामुळे पानांवर राख किंवा धूळ साचल्यासारखे दिसते. प्रादूर्भाव अधिक प्रमाणात असल्यास तपकिरी, करड्या, लाल रंगाचे चट्टे दिसून येतात. फळाची साल खडबडीत व टणक दिसते. फळांची प्रत खालवते. त्यावर प्रादूर्भावग्रस्त फळ काढून ती नष्ट करणे, तसेच कोळीच्या व्यवस्थापनासाठी अबामेकटीन 1.9 ईसी, 3.7 मिली प्रोपरागाइट 57 ईसी, 20 मिली किंवा एथिनओन 50 ईसी, 20 मिली किंवा डायफेन्थूरोन 50 डब्लूपी 20 ग्रॅम 10 लीटर पाण्यात मिसळून 20 दिवसाच्या अंतराने आलटून पालटून फवारणी करावी.

संत्रा फळबाग उत्पादक शेतकऱ्यांनी क्षेत्रीय अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधून लिंबूवर्गीय फळपिकातील कोळी किडीचे नियोजन करावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी एस. जी. डाबरे यांनी केले आहे.

000000

 

No comments:

Post a Comment