Thursday 16 February 2023

DIO BULDANA NEWS 16.02.2023

 





रोजगारक्षम अभ्यासक्रमाची निर्मिती व्हावी

-जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड

*उदयनगर येथे रोजगार मेळाव्याचे उद्घाटन

बुलडाणा, दि. 16 : उद्योजकांकडून कुशल मनुष्यबळाची मागणी होत असते. मात्र त्या तुलनेत मनुष्यबळ उपलब्ध होत नाही. त्यामुळे कालानुरूप रोजगारक्षम अभ्यासक्रमाची निर्मिती होणे गरजेचे आहे. यासाठी प्रशिक्षण संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. ह. पि. तुम्मोड यांनी केले.

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागातर्फे उदयनगर, ता. चिखली येथील दयासागर महाले औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत रोजगार मेळावा घेण्यात आला. यावेळी आमदार श्वेता महाले, तहसिलदार अजित येळे, प्राचार्य एस. डी. गंगावणे, श्री. खुळे, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त प्रांजली बारस्कर आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. तुम्मोड म्हणाले, शिक्षण पुर्ण करून प्रत्येकालाच शासकीय नोकरी प्राप्त होण शक्य नाही. त्यामुळे खासगी कंपनीमध्ये रोजगार किंवा स्वत:चा उद्योग हे पर्यायही युवकांसमोर आहे. अनुभव घेण्यासाठी युवकांना संधी मिळावी, यासाठी रोजगार मेळावे घेण्यात येत आहे. उदयनगर येथील रोजगार मेळाव्यात नामांकित कंपन्यात रोजगार मिळवण्याची संधी निर्माण झाली आहे. बहुतांश कंपन्यांकडून स्थानिक पातळीवर रोजगार देण्यात येणार आहे. परंतु युवकांनी जिल्ह्याबाहेर जाऊन काम करण्याची मानसिकता ठेवावी.

विद्यार्थ्यांनी संकुचित वृत्ती न ठेवता आलेली संधी स्विकारून अनुभव प्राप्त करावा. या अनुभवामुळे मोठ्या पदावर जाण्याची आणि स्वत:चा उद्योग उभारणी करण्यासाठी मदत होते. जिल्ह्यातील युवकांमध्ये काम करण्याची क्षमता आहे. निवड झालेले विद्यार्थी नक्कीच उद्योगांच्या विकासासाठी हातभार लावतील. रोजगार देण्यासाठी आलेल्या कंपनीच्या प्रतिनिधींनी या ठिकाणाहून अधिकाधिक युवकांना संधी द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

आमदार श्रीमती महाले यांनी, सदर रोजगार मेळाव्यातून युवकांना स्थानिक स्तरावरच रोजगाराची संधी निर्माण झाली आहे. त्यामुळे युवक आपली वडीलोपार्जित शेतीसोबतच खासगी कंपनीत कामही करू शकतील. तसेच सहभागी झालेल्या कंपन्यांनी अनुभवाची अट ठेवलेली नसल्याने सर्वांना समान संधी चालून आली आहे. कंपन्यांनी वेतनही चांगले ठेवले असल्याने यास चांगला प्रतिसाद मिळेल. कोणत्याही परिस्थितीला युवकांनी आत्मविश्वासाने सामोरे जावे. रोजगार मिळवण्यासाठी युवकांनी उद्योग उभारणीसाठी प्रयत्न केल्यास शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल. नवउद्योजकांना मार्गदर्शन करण्यासाठी लवकरच विकास परिषद घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

योगेश लांडकर यांनी सूत्रसंचालन केले. योगेश राजपूत यांनी आभार मानले. मेळाव्यासाठी प्रमोद खोडे, पुरुषोत्तम अंभोरे, नंदू मेहेत्रे, सतीश शेळके, गोपाळ चव्हाण यांनी पुढाकार घेतला.


No comments:

Post a Comment