Wednesday 21 December 2022

DIO BULDANA NEWS 21.12.2022

 सिल्लोड येथे राज्यस्तरीय कृषि महोत्सवाचे आयोजन

*जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी भेट देण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 21 : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सिल्लोड येथे राज्यस्तरीय कृषि महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 1 ते 5 जानेवारी 2023 दरम्यान हा महोत्सव होणार आहे. यात शेतकऱ्यांना आवश्यक असणारी माहिती आणि प्रगत तंत्रज्ञान सादर करण्यात येणार असल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या महोत्सवात भेट द्यावी, असे आवाहन कृषि विभागाने केले आहे.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त आणि कृषी विद्यापीठांना ५० वर्षे पूर्ण झाली असून या विद्यापीठांनी आतापर्यंत केलेली वाटचाल व त्यांची संशोधने ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावेत, यासाठी कृषी विभागाने पुढाकार घेत राज्यस्तरीय कृषि महोत्सव आयोजित केला आहे.

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहूरी (अहमदनगर), डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ (अकोला), डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली (जि. रत्नागिरी), वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ (परभणी) या चार विद्यापीठांनी केलेली संशोधने, कृषी विभागाची प्रात्यक्षिके, परिसंवाद, तंत्रज्ञान, राज्यातील शेतकऱ्यांच्या यशोगाथा, असे एकत्रित सादरीकरण करणारा हा पहिलाच राज्यस्तरीय कृषी महोत्सव आहे.

रब्बीचा हंगाम उत्तरार्धात आल्यानंतर शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञान पाहण्यासाठी वेळ मिळतो. त्यामुळे या कृषी महोत्सवाबद्दल शेतकऱ्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. महोत्सवातील प्रात्यक्षिकांमध्ये राज्यभरातील विविध प्रयोग ज्यामध्ये उत्पादनक्षम शेती, एकात्मिक पीक व्यवस्थापन, एकात्मिक किटक व्यवस्थापन, एकात्मिक शेती व्यवस्थापन, सेंद्रिय आणि रासायनिक शेतीची प्रात्यक्षिके विद्यापीठांकडून सादर केली जाणार आहेत.

आंतरराष्ट्रीय स्तरावर २०२३ हे वर्ष भरड धान्याचे वर्ष म्हणून साजरे होणार आहे. यामध्ये महाराष्ट्राची भुमिका, महाराष्ट्राच्या कृषी विभागाचे कार्यक्रम यावरही महोत्सवातील चर्चासत्रांमध्ये विचारमंथन होणार आहे. महोत्सवात कृषि विद्यापीठाच्या समन्वयाने विविध पिके जसे, आंबा, संत्रा, मोसंबी, भेंडी, टोमॅटो, सोयाबीन, कापूस मका इ. पिकांच्या लागवड तंत्रज्ञान पासून ते विपणनापर्यंत चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. पाच दिवसांमध्ये वेगवेगळी कृषीविषयक चर्चासत्रांचं आयोजन करण्यात आले आहे.

कापूस, सोयाबीन आणि इतर तेलबियांच्या व्हॅल्यू चेन डेव्हलपमेंट, त्यासंबंधी होणारे संशोधन, नवीन वाणांचे संशोधन, बदलेले वातावरण पर्जन्य आणि उष्णता यांच्या बदलांचा वेध घेऊन करण्यात येत असलेलं संशोधन याचेही सादरीकरण यावेळी महोत्सवात करण्यात येणार आहे.

कृषी विभागाच्या एकात्मिक दालनामध्ये एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन, पोकरा, स्मार्ट, काढणी पश्चात तंत्रज्ञान, फळप्रक्रिया यांचे सादरीकरण केले जाणार आहे. बाजारपेठांचं नवीन तंत्रज्ञान, ड्रोन तंत्रज्ञान याची माहिती दिली जाणार आहे.

याशिवाय कृषी विज्ञान केंद्र, महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ, महाबीज, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान अशा योजनांची माहिती देणारी दालने देखील महोत्सवात असतील. कृषी निविष्ठा, तंत्रज्ञान, सिंचन साधने यांचीही माहिती देणारी १६० पेक्षा अधिक दालने महोत्सवात असतील. शिवाय शेतीविषयक अवजारे, मशिनरी, नवनवीन यांत्रिकीकरण, ऑटोमेटेड फार्मिंग, यांची दालने असतील. शेतीपूरक लघुउद्योगांसाठी विशेष दालन, यामध्ये राज्यभरातील विविध शेतकरी गटांनी तयार केलेली उत्पादने शेतकऱ्यांना पाहावयास मिळणार आहेत. पाच दिवस चालणाऱ्या या महोत्सवाचा लाभ सकाळी १० ते रात्री दहा यावेळेत घेता येणार आहे.

सदर महोत्सवात ६०० दालन असून त्यापैकी ३६० दालने शासकीय योजना, विविध शासकीय विभाग, शेतकरी गट, शेतकरी कंपन्यांसाठी असून उर्वरित खाजगी संस्थाकरिता आहे. याशिवाय महोत्सवात सायंकाळी विविध प्रबोधानात्मक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.

राज्यातील चारही कृषि विद्यापीठांना दोन स्वतंत्र दालन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामध्ये ८००० स्के. फु. चे एक बंदिस्त दालन असून एक मोकळे दालन आहे. या दालनात विद्यापिठाच्या सर्व विभागांनी विकसित केलेल्या तंत्रज्ञानाची प्रात्याक्षिके, थेट प्रात्यक्षिक, विविध मॉडेल्स, वाण, सिंचन, कृषि व अन्न प्रक्रिया, लागवड पध्दती, जैविक तंत्रज्ञान, पिक संरक्षण, पशुसंवर्धन, इत्यादी बाबतचे तंत्रज्ञान प्रदर्शित करण्यात येणार आहे.

कृषि प्रदर्शन आणि चर्चासत्राचा लाभ घेण्यासाठी दररोज कोणत्या जिल्ह्याचे शेतकरी कधी येतील, याचे नियोजन करण्यात आलेले आहे. कृषि व संलग्न विभागाच्या शेतकरी सहली, शेतकरी प्रशिक्षणे इत्यांदींच्या माध्यामातून शेतकऱ्यांना प्रदर्शन व चर्चासत्राचा लाभ देण्यात येणार आहे.

महोत्सवाचे यशस्वी आयोजना करण्यासाठी संचालक, विस्तार व प्रशिक्षण विकास पाटील (मो. नं. ९४२२४३०२७८) यांची राज्यस्तरीय नियंत्रक अधिकारी तसेच तुकाराम मोटे, कृषि सहसंचालक, (मो. नं. ९४२२७५१६००) यांची समन्वयक अधिकारी म्हणुन नियुक्ती करण्यात आलेली आहे.

00000

 

बुलडाणा आयटीआयमध्ये निर्लेखित साहित्यासाठी निविदा आमंत्रित

बुलडाणा, दि. 21 : बुलडाणा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत निर्लेखित करण्यात आलेल्या साहित्याचा लिलाव करण्यात येणार आहे. यासाठी इच्छुकांनी दि. 31 डिसेंबर 2022 पर्यंत निविदा सादर करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, बुलडाणा, जि. बुलडाणा येथील कार्यरत विविध व्यवसायाचे प्रशिक्षणासाठी वापरण्यात येऊन पुर्णपणे खराब झालेल्या तसेच कालबाह्य झालेल्या निरुपयोगी मशिनरी लिलाव किंवा निविदा पद्धतीने विकण्यात येत आहे. सदर मशिनरी, साहित्याची यादी दि. 28 डिसेंबर 2022 पासून कार्यालयीन वेळेत संस्थेत पाहण्यासाठी ठेवण्यात आले आहे. साहित्य खरेदीसाठी इच्छुकांनी सदर साहित्याची निविदा दि. 31 डिसेंबर 2022 पर्यंत सायंकाळी 4 वाजता सर्वासमोर उघडण्यात येणार आहे. निविदेच्या शर्ती व अटी कार्यालयात उपलब्ध करण्यात आल्या आहेत, असे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य यांनी कळविले आहे.

00000

No comments:

Post a Comment