Wednesday 28 December 2022

DIO BULDANA NEWS 28.12.2022

 









विभागस्तर शालेय किक बॉक्सिंग क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन

बुलडाणा, दि. 28 : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे दि. 28 ते दि. 29 डिसेंबर 2022 दरम्यान जिल्हा क्रीडा संकुलात आयोजित विभागस्तर शालेय 14, 17, 19 वर्षे मुले-मुली खेळाडूच्या किक बॉ‍क्सिंग क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.

स्पर्धेचे उद्घाटन मृत्युंजय गायकवाड यांच्याहस्ते पार पडले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून दिपक तुपकर, दिवानसिंग मानसिंग जाधव, ॲड. दिपकदादा पाटील, अरविंद अंबुसकर, अनिल अंबुसकर उपस्थित होते. श्री. गायकवाड यांनी क्रीडा संस्कृतीची जोपासना आणि संवर्धन होण्यासाठी, तसेच युवकांमध्ये खेळाची आवड निर्माण होण्यासाठी स्पर्धा उपयुक्त ठरतील, असा विश्वास व्यक्त केला.

तालुका क्रीडा अधिकारी बी. एस. महानकर यांनी सूत्रसंचालन केले. राज्य क्रीडा मार्गदर्शक अनिल इंगळे यांनी आभार मानले. स्पर्धेसाठी पंच म्हणून विजय अंबुसकर, रोशनी अंबुसकर, प्रविण राऊत, गायत्री दिग्रसकर, कृष्णा कथडे, रणजित कथडे हे पंचाधिकारी आहेत. स्पर्धेसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, क्रीडा अधिकारी रविंद्र धारपवार, वरिष्ठ लिपिक विजय बोदडे, व्यवस्थापक सुरेशचंद्र मोरे, विनोद गायकवाड, कैलास डुडवा, कृष्णा नरोटे, गोपाल गोरे यांनी पुढाकार घेतला.

00000

लम्पी चर्म रोगाचे पशूधनाचे नुकसान झाल्यास

पशूसहायता मोबाईल ॲपवर अर्ज करावेत

बुलडाणा, दि. 28 : लम्पी चर्मरोगाने मृत्यूमुखी पडलेल्या पशूधनास नुकसान भरपाई मिळविण्यासाठी पशूपालकांनी पशूसहायता मोबाईल ॲपवर अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

लम्पी चर्म रोगाने मृत्युमुखी पडलेल्या पशुधन नुकसान भरपाई देण्यासंबंधी ऑनलाईन प्रणालीनुसार mhpashuaarogya.com  या संकेतस्थळावर किंवा गुगल प्ले स्टोअर वरील मोबाईल ॲप पशूसहायता PASHUSAHAYATA वर नोंदणी करुन नुकसान भरपाईसाठी अर्ज करण्यात यावेत. पशुपालकांनी अर्ज भरण्याकरिता स्वत:च्या मोबाईलचा जास्तीत जास्त वापर करावा. अर्ज भरताना अर्जदाराने नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावर अर्जाच्या स्थितीबाबत संदेश पाठविण्यात येणार असल्यामुळे अर्जदाराने आपला मोबाईल क्रमांक बदलू नये. ऑनलाईन अर्ज तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी, विस्तार, पंचायत समिती यांच्याकडून कार्यक्षेत्रातील संबंधित पशूधन विकास अधिकारी, पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-1, यांना युजर आयडी पासवर्ड निर्धारित करुन फॉरवर्ड करण्यात यावेत. असे आवाहन जिल्हा उपआयुक्त पशूसंवर्धन डॉ. प्रविणकुमार घुले यांनी केले आहे.  

0000000

सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन

बुलडाणा, दि. 28 : दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. जानेवारी महिन्याचा लोकशाही दिन सोमवार, दि. 2 जानेवारी  2023 रोजी दुपारी 1 वाजता आयोजित करण्यात आला आहे. हा लोकशाही दिन ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे.

लोकशाही दिनात जिल्हाधिकारी व इतर शासकीय अधिकारी नागरिकांच्या तक्रारींचे निरसन करतील. या महिन्यातील लोकशाही दिन दूरचित्रवाणी परिषदेद्वारे घेण्यात येणार आहे. लोकशाही दिनी तक्रारदाराला स्वत: उपस्थित राहणे शक्य नसल्यास तक्रारदारानी तक्रार रजिस्टर पोस्टाने प्रभारी अधिकारी, लोकशही दिन, सामान्य प्रशासन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, बुलडाणा यांच्या नावे पाठवावे.

अर्जदाराने अर्ज करताना अर्ज विहित नमुन्यातील असावा, तक्रार, निवेदन वैयक्तिक स्वरुपाची असावी, विहित अर्ज नमून्यात 15 दिवस आधी दोन प्रतीत पाठवावेत. तालुकास्तरीय लोकशाही दिनानंतर एक महिन्याने जिल्हा लोकशाही दिनात अर्ज करावा.

लोकशाही दिनात न्यायप्रविष्ठ प्रकरणे, राजस्व व अपिल, सेवा व आस्थापना विषयक बाबी, विहित नमुन्यात नसलेले तसेच आवश्यक त्‍या कागदपत्रांच्या प्रती जोडल्या नसल्यास असे अर्ज, तक्रार, निवेदन वैयक्तिक स्वरूपाची नसल्यास अर्ज स्विकारले जाणार नाही.

00000








विभागस्तर शालेय पेट्यांक्यु क्रीडा स्पर्धेत यवतमाळ जिल्ह्याचे वर्चस्व

खेळाडूंनी एक खेळ निवडुन प्राविण्य संपादन करावे.

 - श्री.दिनेश गिते, निवासी जिल्हाधिकारी

          बुलडाणा, दि. 28 :   क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलढाणा व बुलढाणा जिल्हा पेट्यांक्यु असोसिएशन यांचे संयुक्त विद्यमाने जिल्हा क्रीडा संकुल, क्रीडानगरी, जांभरुन रोड, बुलढाणा येथे दि.27 डिसेंबर 2022 रोजी 19 वर्षाआतील मुले, मुलींच्या पेट्यांक्यु क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 

            स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते, बोलत होते.  यावेळी मंचकावर जिल्हा क्रीडा अधिकारी, गणेश जाधव, बुलढाणा, तहसिलदार, विजय पाटील. नायब तहसिलदार, हेमंत पाटील, एस.महानकर, मेश्राम यवतमाळ, इत्यादींची उपस्थिती होती.

            या स्पर्धेसाठी अमरावती विभागातुन पाच जिल्ह्याचे व दोन महानगर पालीका यांचे एकुण 60 खेळाडू सहभागी झाले होते.  आपल्या उद्घाटणीय मार्गदर्शन प्रसंगी मा.श्री.दिनेश गिते निवासी उपजिल्हाधिकारी, बुलढाणा यांनी आपल्या खुमासदार शैलीत खेळाडूंना मार्गदर्शन करतांना आयोजकांनी खेळ समजुन सांगण्यासाठी आमची एक मॅच खेळवली असा उल्लेख केला.  ह्या खेळामुळे आम्हाला आमच्या बालपणीच्या रम्य आठवणींना उजाळा देत आला असा आवर्जुन उल्लेख केला.  तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीचा एक खेळ निवडून त्यात प्राविण्य संपादन करावे.  खेळ हा मानसीक, शारीरिक स्वास्थ्यासाठी चांगला असुन, खेळामुळे मनाची प्रगती होते.  तसेच खेळाडूंनी मोबाईलपासुन दुर राहुन मैदानावर आले पाहिजे असेही सांगीतले.  तसेच जिल्हा प्रशासनाच्या वतीने विविध जिल्ह्यातुन आलेल्या खेळाडूंचे, क्रीडा शिक्षकांचे, पालकांचे स्वागत केले.  यावेळी मंचकावर उपस्थित सर्व मान्यवरांनी पेट्यांक्यु हा खेळ खेळून प्रशंसा केली. तसेच राज्यस्तरावर निवड झालेल्या खेळाडूंचे मा.गिते साहेबांच्या शुभ हस्ते सत्कार करण्यात आला.  याप्रसंगी राज्यस्तरावर एकुण 20 खेळाडूंपैकी 16 यवतमाळ जिल्हा, 03 वाशिम जिल्हा व 01 बुलढाणा जिल्हा पात्र ठरले.

            या स्पर्धेला पंच म्हणून प्रफुल्ल वानखेडे, विशाल खंडारे, प्रतीक राऊत, अमर सावळे, उपस्थित होते.  उद्घाटन कार्यक्रमाचे सुत्रसंचलन निलेश इंगळे यांनी तर आभार अनिल इंगळे, राज्य क्रीडा मार्गदर्शक यांनी आभार मानले.  सदर स्पर्धा मा.श्री.गणेश जाधव जिल्हा क्रीडा अधिकारी, बुलढाणा यांचे कुशल मार्गदर्शनाखाली स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी अनिल इंगळे, राज्य क्रीडा मार्गदर्शक तथा स्पर्धा संयोजक, रविंद्र धारपवार, क्रीडा अधिकारी, विजय बोदडे, वरिष्ठ लिपीक, सुरेशचंद्र मोरे, व्यवस्थापक, जिल्हा क्रीडा संकुल कार्यकारी समिती बुलढाणा, विनोद गायकवाड, कैलास डूडवा, कृष्णा नरोटे, गोपाल गोरे यांनी परिश्रम घेतले असे गणेश जाधव जिल्हा क्रीडा अधिकारी, बुलढाणा हे कळवितात.

 

000000



पैनगंगा नदीचे 84 किलोमीटरचे पात्र होणार स्वच्छ

*जिल्ह्यात ‘चला जाणूया नदीला’ उपक्रम

बुलडाणा, दि. 28 : राज्याच्या ‘चला जाणूया नदीला’ उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमात जिल्ह्यातील पैनगंगा नदीचा समावेश करण्यात आला आहे. समाजातील सर्व घटकांच्या सहभागाने नदी स्वच्छता मोहिम हाती घेण्यात येणार येणार आहे. यातून जिल्ह्यातील पैनगंगा नदीचे 84 किलोमीटरचे पात्र स्वच्छ करण्यात येणार आहे.

जिल्ह्यात चला जाणूया नदीला उपक्रम राबविण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार, दि. 28 डिसेंबर 2022 रोजी बैठक घेण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते, उपवनसंरक्षक अक्षय गजभिये, समन्वयक नंदकुमार देशमुख आदी उपस्थित होते.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील 75 नद्यांच्या क्षेत्रात चला जाणूया नदीला उपक्रम राबविण्यात येत आहे. यात जिल्ह्यातील पैनगंगा नदीचा समावेश करण्यात आला आहे. पैनगंगा नदीसोबतच नळगंगा आणि ज्ञानगंगा या नदीक्षेत्रातही हा उपक्रम राबविण्यात येईल. प्रामुख्याने नदी क्षेत्रातील नागरिकांमध्ये नदीचे महत्व पटवून देण्यासाठी जनजागृती करण्यात येणार आहे. लोकसहभागाची ही चळवळ विविध घटकांना एकत्र करून राबविण्यात येणार आहे.

नदीक्षेत्र स्वच्छ करण्यासोबतच पूरक्षेत्र, नदीतील अतिक्रमण, पाण्याचे प्रदूषण रोखण्यासाठी उपचारात्मक उपाययोजना करण्यात येणार आहे. नदी स्वच्छतेमुळे पाण्याचा नैसर्गिक प्रवाह कायम ठेवण्यासाठी श्रमदानातून कामे करण्यात येणार आहे. नदीचे महत्व पटवून देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी कुटुंबासह एक दिवसभर श्रमदान करणार आहे. यात राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना, रोटरी क्लब, शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी  यांनाही सहभागी करून घेण्यात येणार आहे.

नदीमध्ये सांडपाणी सोडण्यात येत असल्यामुळे पाण्याचे प्रदूषण होत आहे. त्यामुळे चला जाणूया नदीला या उपक्रमामुळे नदीकाठील गावांमध्ये जागृती होण्यास मदत होणार आहे. तसेच अधिकारी-कर्मचारी यांच्या या उपक्रमातील सहभागामुळे नागरिकांपर्यंत नदीच्या स्वच्छतेचा संदेश पोहोचविण्यास मदत होणार असल्यामुळे जिल्हा आणि क्षेत्रियस्तरावरील अधिकारी-कर्मचारी यांनी कुटुंबासह सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. तुम्मोड यांनी केले.

000000



No comments:

Post a Comment