Thursday 8 December 2022

DIO BULDANA NEWS 08.12.2022










बदल्या युगातही ग्रंथांचे महत्व टिकून

-जिल्हाधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड

बुलडाणा, दि. 8 : आधुनिक युगात वाचन संस्कृतीमध्ये मोठे बदल झाले आहेत. डिजीटल क्रांतीमुळे टीव्ही, समाजमाध्यमे आली असली तरी ग्रंथांचे महत्व कमी झाले नाही. बदलत्या युगातही ग्रंथांचे महत्व आजही टिकून असल्याचे मत जिल्हाधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड यांनी व्यक्त केले.

जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांच्यातर्फे आयोजित ग्रंथोत्सवाचे उद्घाटन गुरूवार, दि. 8 डिसेंबर रोजी पार पडले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. तुम्मोड अध्यक्षस्थानी होते. यावेळी आमदार संजय गायकवाड, नगर पालिकेचे मुख्याधिकारी गणेश पांडे, जिल्हा कोषागार अधिकारी ऋषीकेश वाघमारे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे, राज्य ग्रंथालय संघटनेचे राज्य अध्यक्ष डॉ. गजानन कोटेवार. जिल्हा ग्रंथालय अधिकारी सतिश जाधव आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. तुम्मोड म्हणाले, माहितीच्या स्त्रोतामध्ये वर्तमानपत्रे, दूरचित्रवाहिन्या आणि आता समाजमाध्यमांमुळे ब्रेकींग न्यूज आले आहे. या क्रांतीमध्ये पुस्तकांचे महत्व कमी झालेले नाही. प्रत्यक्ष वाचनाने ग्रंथांची महती कळते. यासाठी ग्रंथोत्सवासारखे उपक्रम महत्वाचे ठरतात. यावर्षीच्या जिल्हा ग्रंथोत्सवाचे आयोजन उत्तम झाले आहे. जिल्ह्यात ग्रामीण भागात ग्रंथालयांची संख्या कमी आहे. ही संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. प्रत्येक गावात ग्रंथालय असावे, यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे सांगितले.

आमदार श्री. गायकवाड म्हणाले, ग्रंथलिखाण हे त्या-त्या काळाचा आरसा असतो. त्यामुळे समकाळातच इतिहासाचे लिखाण व्हावे, असे झाल्यास कालांतराने यावर होणारे वाद कमी होती. पूर्वीच्या काळी इंग्रजांच्या काळात महान व्यक्तींच्या कार्याचा इतिहास लिहील्या जायचा. आज हे दस्तावेज आपल्यासाठी मार्गदर्शक ठरत आहे. इतिहासाचे वाचन होण्याबरोबरच अर्जित केलेल्या ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार झाल्यास वाचनसंस्कृतीचा खरा फायदा होण्यास मदत होईल.

डॉ. कोटेवार यांनी ग्रंथपालांच्या समस्या मांडून यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले. जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्री. जाधव यांनी प्रास्ताविकातून ग्रंथोत्सवाच्या आयोजनाची माहिती ‍दिली. तसेच अभ्यासिकेतील 89 विद्यार्थ्यांची विविध पदांवर निवड झाली असल्याचे सांगितले. यावेळी कर सहायक म्हणून निवड झालेल्या संतोष कानफाडे यांचा सत्कार करण्यात आला. अनिल येंडे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. कि. वा. वाघ यांनी आभार मानले.

00000



जिल्हाधिकारी कार्यालयात संत जगनाडे महाराजांना अभिवादन

बुलडाणा, दि. 8 : संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड यांनी अभिवादन केले.

डॉ. तुम्मोड यांनी संत संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते, तहसिलदार शामला खोत, पुष्पा डाबेराव, नाझर गजानन मोतेकर यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. उपस्थितांनीही संत संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला पूष्प वाहून अभिवादन केले.

000000

दिव्यांगांच्या योजनेंतर्गत झेरॉक्स मशीनचे वाटप

बुलडाणा, दि. 8 : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातर्फे दिव्यांग कल्याण योजनेंतर्गत 5 टक्के निधीतून 2022-23 या वित्तीय वर्षासाठी ग्रामीण भागातील दिव्यांग लाभार्थ्याकरिता झेरॉक्स मशीन पुरविण्यात येणार आहे.

या योजनेचे अर्ज पंचायत समितीस्तरावर उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्रामीण भागातील दिव्यांग लाभार्थ्यांनी परीपूर्ण अर्ज, अनुषंगिक सर्व कागदपत्रांसह संबंधित गटविकास अधिकारी यांच्याकडे दि. 31 डिसेंबर 2022 पर्यंत सादर करावे लागणार आहे. सदर योजनेचा लाभ ग्रामीण भागातील दिव्यांगांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक भाग्यश्री विसपूते यांनी केले आहे.

0000000

 

गोवर प्रतिबंधासाठी लसीकरण करण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 8 : जिल्ह्यात यावर्षी गोवर, रूबेला सदृश्य 44 रूग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यामध्ये सध्यास्थितीत 24 हजार 810 लसीचा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे 9 महिने ते 5 वर्षे वयोगटातील बालकांना गोवर प्रतिबंधक लस देण्यात यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

गोवर हे लहान मुलांमधील प्रतिकारशक्ती कमी होणे, अतिसार, न्युमोनिया अशा गंभीर आजारांचे प्रमुख कारण आहे. त्यामुळे बालके विविध आजार आणि कुपोषणाच्या दुष्टचक्रात सापडतात. सध्या राज्यात सुरु असलेल्या गोवर उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर 9 महिने ते 5 वर्षे वयोगटातील बालकांना गोवर लस तातडीने द्यावी. सर्वांनी लसीकरण मोहिमेस सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

गोवर हा विषाणुमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे. गोवर आजार लसीकरणामुळे टाळता येणारा आहे. हा आजार मुख्यत्वे 5 वर्षांखालील मुलांमध्ये आढळतो. ताप, खोकला, वाहणारे नाक, डोळ्याची जळजळ, सुरुवातीला चेहऱ्यावर आणि नंतर उर्वरित शरीरावर लाल, सपाट पुरळ ही आजाराची लक्षणे आहेत. गोवरमुळे काही मुलांमध्ये अतिसार, मध्य कर्ण संसर्ग, न्युमोनिया, क्वचित फेफरे, अंधत्व किंवा मेंदूदाह अशी गुंतागुंत होऊ शकते. लसीकरणामुळे टाळता येणाऱ्या गोवर, रुबेला सारख्या आजारांचे नियमित सर्वेक्षण करण्यात येत आहे.

गोवर आजाराबाबत उपयोजना करण्यात येत आहे. यासाठी गोवर, रुबेला विशेष लसीकरण मोहिम राबविण्यात येत आहे. तसेच जिल्हास्तरीय शीघ्र प्रतिसाद पथक, ताप पुरळ रुग्णांचे गतिमान सर्वेक्षण, कुपोषित बालकांकडे प्राधान्याने लक्ष, आंतरविभागीय समन्वय, आरोग्य शिक्षण, सामाजिक प्रबोधन व लोकसहभाग आदी उपक्रम राबविण्यात येत आहे.

जिल्ह्यातील सर्व्हेक्षणात 43 रूग्ण ताप व पुरळ लक्षणे असलेले आढळून आलेले आहेत. या रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. यात तीन रूग्ण गोवर, रुबेला पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यात एक रूग्ण बुलडाणा, तर दोन रूग्ण देऊळगाव राजा येथील आढळून आले आहे. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा गोवर, रूबेलाबाबत सक्रीय झाली आहे. आतापर्यंत बुलडाणा येथील जोहरनगर आणि देउळगाव राजा येथील हकीम कॉलनी येथील 6 हजार 283 जणांचे सर्व्हेक्षण करण्यात आले आहे.

00000

टोमॅटोवरील किड, रोगाचे व्यवस्थापन करण्याचे आवाहन

बुलडाणा, दि. 8 : जिल्ह्यातील टोमॅटो पिकावरील रस शोषून घेणाऱ्या किडीचा प्रादूर्भाव जाणवत आहे. या किडीचे शेतकऱ्यांनी व्यवस्थापन करावे, असे आवाहन कृषि विभागाने केले आहे.

टोमॅटो पिकावरील किड व रोगाचे एकात्मिक व्यवस्थापन याबाबत विषाणूजन्य रोगांचा प्रादूर्भाव झाल्यानंतर त्यावर नियंत्रण मिळविणे कठीण असते. रोग येऊ नयेत म्हणून पूर्वनियंत्रणाचे उपाय करुन प्रादूर्भाव टाळता येऊ शकतो. विषाणूजन्य रोगाचा प्रसार प्रामुख्याने फुलकिडे, पांढरी माशी, मावा या किडीचे मार्फत होतो. विषाणू रोगाचा प्रादूर्भाव झाल्यानंतर त्यावर औषधांचा फारसा उपयोग होत नाही. त्यामुळे किडीमार्फत होणारा प्रसार थांबवणे हाच एक उपाय आहे. या रोगाची लागण रोपवाटिका पासून पिकाच्या वाढीपर्यंत होते. या रोगाच्या नियंत्रणासाठी रोपवाटिकेपासूनच काळजी घेणे महत्वाचे आहे.

टोमॅटो पिकावरील रसशोषण करणाऱ्या किडींच्या नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये रोपवाटिकेत रोप तयार करण्यासाठी विषाणूजन्य रोगाचा प्रतिकार टोमॅटोच्या वाणांची निवड करावी. शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतात रोपे तयार करणे शक्य झाले नसल्यास बाहेरुन रोपे घेताना ते परवानाधारक रोपवाटिकेतूनच खरेदी करावेत. तसेच त्या रोपवाटिकेला इन्सेक्ट नेट, विड मॅट, दोन दरवाजे पद्धत आणि रोपवाटिकेच्या नियमावलीप्रमाणे असावी. रोपे खरेदी करताना ज्या भागांमध्ये टोमॅटो पिकावर विषाणूजन्य रोगाचा प्रादूर्भाव झाला आहे, त्या ठिकाणच्या रोपवाटिकेतून रोपे खरेदी करु नयेत.

रोपवाटिकेत बियाण्याची पेरणी झाल्यानंतर गादीवाफ्यावर ६०-१०० मेश नायलॉन नेट किंवा पांढरे पातळ मलमल कापड २ मिटर उंचीपर्यंत मच्छरदाणीसारखे गादीवाफ्यास लावावे, यामुळे रोगप्रसार करणाऱ्या किडींपासून रोपाचे संरक्षण होईल. रोपवाटिकेमध्ये रसशोषक किडी मावा, फुलकिडे, पांढरी माशी यांचा प्रादूर्भाव होणार नाही, याची काळजी घ्यावी. पुन्हा लागवडीसाठी २५-३० दिवसांची रोपे पुरेसे हार्डनिंग करुन वापरावेत. पुन्हा लागवडीच्यावेळी वाफ्यावर प्लॅस्टिक पेपरचे आच्छादन करावे. यामुळे पांढऱ्या माशीचे प्रमाण कमी राहते. रोपाची पुन्हा लागवड करण्यापूर्वी २५-३० दिवस अगोदर शेताच्या सर्व बाजूने ५-६ ओळी मका, ज्वारी किंवा बाजरी अशी सापळा पिके म्हणून लावावे. त्यामुळे पांढऱ्या माशीला मोठ्या प्रमाणात अटकाव होतो.

रोपांची पूनर्लागवड करण्यापूर्वी इमिडॅक्लोप्रीड (१७.८ एसएल) ४ मिली प्रति १० लिटर पाणी या द्रावणात रोपाची मुळे १०-१५ मिनिट बुडवावी. टोमॅटो पिकास शिफारशी प्रमाणे खतांच्या मात्रा द्याव्यात. तसेच नत्रयुक्त खतांचा अति वापर टाळावा. टोमॅटो पिकाला आवश्यकतेप्रमाणेच पाणी द्यावे, पिक तण विरहित ठेवावे. ज्या भागात, शेतात वर्षानुवर्षे तिन्ही हंगामात टोमॅटो पिक घेतले जाते, अशा ठिकाणी रोग व किडी प्रस्थापित झालेले असतात. त्यामुळे पिक पद्धतीतील अशी साखळी खंडीत करण्यासाठी पिकांची फेरपालट करावी. रसशोषक किडींच्या नियंत्रणासाठी प्रति एकर ३०-३५ निळे व पिवळे चिकट सापळे शेतामध्ये लावावेत. टोमॅटोवरील टुटा नागअळीच्या व्यवस्थापनासाठी प्रति हेक्टरी २० कामगंध जलसापळे (वॉटर ट्रॅप) लावावेत. यामुळे टूटा किडीचे सामूहिक पतंग आकर्षण व मिलन प्रजोत्पादनामधील अडथळ्यांसाठी उपयोग होऊन किडींची संख्या आणि प्रादूर्भाव कमी करता येईल. टोमॅटोच्या फळांची शेवटची तोडणी झाल्यास झाडे उपटून नष्ट करावेत. रोगग्रस्त पिक शेतात तसेच राहिल्यास नवीन लागवड केलेल्या पिकावर अशा किडींद्वारे पुन्हा प्रसार होऊन विषाणू रोगाचा प्रादूर्भाव होतो.

या रोगावर उपचारात्मक उपाययोजना करताना टोमॅटो पिकावरील रसशोषण करणाऱ्या किडींचा प्रादूर्भाव आर्थिक नुकसान पातळीच्यावर गेलेला असल्यास विषाणूजन्य रोगांचे एकात्मिक व्यवस्थापनासाठी उपचारात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करावी. यात विषाणूजन्य रोगाची लक्षणे दिसताच रोगग्रस्त झाडे व फळे काढून वेळीच नष्ट करावीत. जेणेकरून पुढील प्रसार टाळता येईल. जर रसशोषक किडीचा प्रादूर्भाव झाल्यास ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. टोमॅटोवरील रसशोषक किडीच्या नियंत्रणासाठी लेकॅनीसिलियम लेकॅनी ५० ग्रॅम किंवा मेटॅऱ्हाझीयम अॅनीसोप्ली (१.१५ डब्लूजी) ५० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात वातावरणात आर्द्रता असताना संध्याकाळी फवारणी करावी.

पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रीड (१७.८% एसएल ३ मिली किंवा स्पायरोमेसिफेन (२२.१० टक्के डब्लूडब्लूएससी) १२ मिली किंवा थायोमेथोक्झाम (२५ टक्के डब्लूजी) ४ ग्रॅम किंवा प्रॉपरगाईट (५० टक्के) अधिक बायफेनथ्रीन (५ टक्के एसइ) २२ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून गरजेनुसार आलटून पालटून फवारण्या कराव्यात. फुलकिडे नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रीड (७० टक्के डब्लूजी) २ ग्रॅम किंवा सायॅनटॅनीलीप्रोल (१०.२६ टक्के ओडी) १८ मिली किंवा थायमिथोक्झम (१२.६० टक्के) अधिक लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (९.५० टक्के झेडसी) २.५ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून गरजेनुसार आलटून पालटून फवारण्या कराव्यात.

मावा किडीच्या नियंत्रणसाठी सायनट्रॅनिलीप्रोल १०.२६ ओडी १८ मिली किंवा डायमिथोएट (३० टक्के  ईसी) २० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. टूटा नागअळीच्या नियंत्रणासाठी सायनट्रॅनिलीप्रोल १०. २६ ओडी १८ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

लाल कोळी या किडीच्या नियंत्रणासाठी प्रॉपरगाईट (५० टक्के) डब्लूडब्लू अधिक बायफेथ्रीन (५ टक्के एसइ) २२ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. फळ पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी क्लोरॅनऍनीलीप्रोल १८.५० एससी ३ मिली किंवा इन्डोक्झाकार्ब १४.५० एससी १० मिली किंवा नोव्हॅल्युरॉन १० ईसी १५ मिली किंवा क्विनॉलफॉस २५ ईसी २० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून गरजेनुसार आलटून पालटून फवारण्या कराव्यात.

बुरशीजन्य रोगाचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी मॅन्कोझेब २५ ग्रॅम किंवा प्रॉपीनेब ३० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. फलोत्पादन पिकावरील किड रोग सर्वेक्षण, सल्ला व व्यवस्थापन प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांनी टोमॅटो पिकावरील किड व रोगांच्या नियंत्रणासाठी वेळोवेळी उपाययोजना सुचविण्यात येतात. या उपाययोजनांची अंमलबजावणी वेळेवर करावी, असे आवाहन फलोत्‍पादन संचालक डॉ. कैलास मोते यांनी केले आहे.

00000

प्लास्टिक फिल्मचा पुरवठा करण्यासाठी

वितरक, विक्रेत्यांकडून प्रस्ताव आमंत्रित

बुलडाणा, दि. 8 : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान आणि राष्ट्रीय कृषि विकास अभियानांतर्गत सामूहिक शेततळे वैयक्तिक अस्तरीकरण घटकांतर्गत प्लास्टिक फिल्म पुरवठा करणाऱ्या कंपन्यांचे विक्रेता, वितरक यांची नोंदणी करण्यात येणार आहे. यासाठी कृषी विभागाच्या योजनांर्गत शेततळे अस्तरीकरण व सामुहिक शेततळे घटकांकरिता प्लास्टिक फिल्मचा पुरवठा करणाऱ्या वितरक, विक्रेता यांच्याकडून प्रस्ताव आमंत्रित करण्यात आले आहे.

प्लास्टिक फिल्मचा पुरवठा करणाऱ्या वितरक, विक्रेता यांची नोंदणी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालय यांच्याकडे करावयाची आहे. ज्या उत्पादक कंपन्या राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ, पुणे यांच्याकडे राज्यस्तरीय नोंदणी करता पात्र असतील, अशा कंपन्यांची वितरक म्हणून नोंदणी करता येईल.

राज्यस्तरावर नोंदणीकृत उत्पादक कंपन्यांच्या अधिकृत विक्रेता, वितरकांना राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळ, पुणे या कार्यालयाने निर्गमित केलेल्या वैयत्तिक शेततळे अस्तरीकरण, सामुहिक शेततळे या घकाच्या मार्गदर्श्क सूचजनातील तांत्रिक निकषानुसार साहित्य पुरवठा करणे व कामे करणे बंधनकारक राहिल. तसेच कार्यालयामार्फत वेळोवेळी निर्गमित होणारी परिपत्रक आदेश कृतीपत्रक सुधारित सूचनांचा अवलंब करणे अनिवार्य राहील.

जिल्हा स्तरावरील वितरण नोंदणी करिता वितरण नोंदणी अर्ज फोटोसह प्रपत्र, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांच्या नावे 2 लाख रुपयांची बँकेची स्टॅम्प पेपरवरील मूळ गॅरंटी, व एक झेरॉक्स प्रत. वितरकांचे 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर नोंदणीच्या अटी व शर्तीबाबत करारनामा, मान्यताप्राप्त उत्पादक कंपनीचे वितरक प्रमाणपत्र, मान्यताप्राप्त उत्पादक कंपनीचे वितरक प्रमाणपत्र, मान्यता प्राप्त कंपनीचे राज्यस्तरीय नोंदणी प्रमाणपत्र, वितरक व उत्पादक कंपनी यांच्यातील करारनाम्याची साक्षांकीत प्रत, वितरक दुकान स्थळ, जागेचा पुरावा, आठ अ, ग्रामपंचायत किंवा नगरपालिका मालमत्ता पत्रक, दुकान भाड्याने घेतले असल्यास भाडेकरार व जागा मालकाचे नाव असलेल्या जागेचा उतारा किंवा ग्रामपंचायत, नगरपालिका कर भरणा पावतीची झेरॉक्स प्रत,  दुकान नोंदणी प्रामणपत्र, पॅन कार्ड झेरॉक्स प्रत, जीएसटी प्रमाणपत्राची झेरॉक्स प्रत, आधार कार्ड, झेरॉक्स प्रत, बँक पासबुक झेरॉक्स प्रत नोंदणीसोबत जोडणे आवश्यक आहे.

000000 

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात माजी सैनिकांची पदभरती

बुलडाणा, दि. 8 : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात माजी सैनिक प्रवर्गातून तात्पुरत्या स्वरुपात मानधनावर कंत्राटी पद्धतीने पदभरती करण्यात येणार आहे. यासाठी इच्छुकांनी अर्ज करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र एक्स सर्विसमन कार्पोरेशन लिमिटेड (मेस्को) कार्यक्षेत्र अमरावती मार्फत ही नियुक्ती करण्यात येणार आहे. यात कल्याण संघटक 1 पद, लिपिक टंकलेखक 1 पद भरती करण्यात येणार आहे. कल्याण संघटनासाठी शिक्षण किमान दहावी उत्तीर्ण, एमएससीआयटी प्रमाणपत्र, सैन्य दलातील सेवा किमान 15 वर्षे सेवा, सैन्य दलातील  सुबेदार, नायब सुबेदार हुद्दा, सैन्य दलातील चारित्र्य कमीत कमी गुड, मेडिकल – एवायई/शेप-1, लिपिक टंकलेखक पदासाठी किमान दहावी उत्तीर्ण, एमएससीआयटी प्रमाणपत्र, मराठी व इंग्रजी टंकलेखनाचा वेग दर मिनिटास किमान 40 शब्द, सैन्य दलातील सेवा कमीत कमी 15वर्षे सेवा, सैन्य दलातील हवालदार लिपिक, नायब सुबेदार लिपिक, सुबेदार लिपिक हुद्दा, चारित्र्य कमीत कमी गुड, मेडिकल एवायई/शेप-1 असणे गरजेचे आहे. कल्याण संघटकासाठी मासिक मानधन 29 हजार 835 रूपये आणि लिपिक टंकलेखकासाठी 23 हजार 282 रूपये मानधन राहणार आहे.

सैन्यदलातील सेवानिवृत्त झालेल्या आणि पात्रता पूर्ण करीत असलेल्या जिल्ह्यातील इच्छुक माजी सैनिकांनी दि. 12 डिसेंबर 2022 पर्यंत आपले डिस्चार्ज बुक, ओळखपत्र, इम्प्लॉयमेंट कार्ड व वैयक्त‍िक अर्ज जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी भास्कर पडघान यांनी केले आहे. अर्ज प्राप्त झालेल्या उमेदवारांची दि. 13 डिसेंबर 2022 रोजी मुलाखत व चाचणी परीक्षा घेऊन अंतिम निवड करण्यात येईल.

0000000

पदभरतीतील उमेदवारांनी आर्थिक फसवणुकीस बळी पडू नये

*जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे आवाहन

बुलडाणा, दि. 8 : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात विविध पदांसाठी पदभरती करण्यात येत आहे. या प्रक्रियेची निवड प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यात उमेदवारांनी कोणत्याही आर्थिक फसवणुकीस बळी पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियानात जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात विविध संवर्गामध्ये कंत्राटी पदभरती करण्यासाठी एप्रिल 2022 मध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. यातील पात्र उमेदवारांची गुणानुक्रमानुसार अंतिम गुणवत्ता यादी आणि विविध संवर्गाची कौशल्य चाचणीसाठी निवड व प्रतिक्षा यादी दि. 3 डिसेंबर 2022 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, बुलडाणा यांच्या buldhana.nic.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

उमेदवारांनी सदर भरती प्रक्रियेत निवड करण्यासाठी आर्थिक फसवणुकीस बळी पडू नये, तसेच याबाबत कुणीही आर्थिक फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधिताविरुद्ध पोलिस ठाण्यात रितसर तक्रार नोंदविवावी, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. भरती प्रक्रियेबाबत सर्व सूचना संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्या जातील. भरती प्रक्रियेत फसवणुकीला आळा घालणे आणि उमेदवारांच्या हितासाठी निवेदन प्रसिद्ध करण्यात आल्याचे राष्ट्रीय आरोग्य अभियानचे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक यांनी कळविले आहे.

000000000

No comments:

Post a Comment