Monday 12 December 2022

DIO BULDANA NEWS 10.12.2022

 87 किलोमीटर लांब, 120 मीटर रूंद, 4 तालुके, 50 गावे, 3 इंटरचेंज

*भव्य दिव्य समृद्धी मार्गाचे आज लोकार्पण

*समृद्धी महामार्गाने जिल्ह्याचे रूप पालटणार

बुलडाणादि. 10 : राज्याच्या चेहरामोहरा बदलण्याची क्षमता असलेला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग जिल्ह्यातून गेला आहे. चार तालुके, 50 गावांमधून जाणाऱ्या एका समृद्धी महामार्गामुळे जिल्ह्यात दोन पॅकेजमध्ये 87 किलोमीटर लांब रस्ता, 120 मीटरच्या सहा मार्गिका, 3 इंटरचेंज, दोन कृषि समृद्धी नवनगरे जिल्ह्याला लाभली आहेत. जिल्ह्यातून गेलेल्या भव्य दिव्य अशा महामार्गाचे रविवारी, दि. 11 डिसेंबर 2022 रोजी लोकार्पण होणार आहे.

जिल्‌ह्यातून दोन पॅकेजमध्ये 87.291 किलोमीटर लांबीचा रस्ता गेला आहे. 120 मीटर रूंदीचा हा रस्ता मेहकर, लोणार, सिंदखेड राजा, देऊळगाव राजा या चार तालुक्यातील 50 गावांमधून गेला आहे. या समृद्धी मार्गावरील प्रवेशासाठी जिल्ह्यात फैजलापूर, ता. मेहकर, दूसरबीड, ता. सिंदखेड राजा आणि पळसखेड मलकदेव, ता. देऊळगाव राजा येथे इंटरचेंज देण्यात आले आहेत.

समृद्धी महामार्गावर जिल्ह्यात दोन कृषिसमृद्धी नवनगरे प्रस्तावित आहेत. यातील साब्रा-काब्रा, ता. मेहकर येथे 1 हजार 348 हेक्टर, तर सावरगाव माळ, ता. सिंदखेड राजा येथे 1 हजार 947 हेक्टर संपादीत जमीनीवर ही नवनगरे उभी राहणार आहेत.  मांडवा, ता. लोणार येथे रस्त्याच्या बाजूला सोयीसुविधांसाठी 11 हेक्टर जमीन उपलब्ध करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील महामार्गासाठी एक हजार 204 हेक्टर जमीन संपादीत करण्यात आली आहे. यापैकी 28 हेक्टर ही शासकीय वन जमीन आहे. तसेच 39 हेक्टर जमीन ही शासकीय ई क्लास आहे. एकूण 1 हजार 136 हेक्टर खासगी जमीनपैकी 1 हजार 6 हेक्टर जमीन थेट खरेदीने घेण्यात आली आहे. 130 हेक्टर जमीन भूसंपादन कायद्याद्वारे घेण्यात आली आहे.

जिल्ह्यात दोन पॅकेजमध्ये महामार्गाचे बांधकाम करण्यात आले. यातील सहाव्या पॅकेजमध्ये मेहकर तालुक्यातील बेलगाव ते पारडा या दरम्यान 36.100 किलोमीटर रस्ता बांधण्यात आला आहे. या पॅकेजमध्ये 20 गावांतून हा रस्ता गेला आहे. सातव्या पॅकेजमध्ये 51.190 किलोमीटरचा रस्ता लोणार, सिंदखेड राजा, देऊळगाव राजा या तीन तालुक्यातील 30 गावांमधून गेला आहे. हा मार्ग बांडा, ता. लोणार, ते सावरगाव माळ, ता. सिंदखेड राजा या दरम्यान आहे.

जिल्ह्यातील समृद्धी महामार्गाच्या बांधकामासाठी तब्बल तीन हजार कोटी रूपये खर्च झाले आहे. मेहकर, सिंदखेड राजा येथे टोलप्लाझा, पैनगंगा आणि खडकपूर्णा नदीवर दोन मोठे पूल, 33 छोटे पूल, वाहनांसाठी 18 अंडर पास, 10 ओव्हर पास, 3 छोट्या वाहनासाठी अंडर पास, जनावरांसाठी 40 अंडर पास, 53 चौकोनी बोगदे, 87 बहुउपयोगी बोगदे, प्राण्यांसाठी दोन ओव्हरपासच्या सुविधा या मार्गाच्या निमित्ताने जिल्ह्यात निर्माण झाल्या आहेत.

00000 

No comments:

Post a Comment