Friday 9 December 2022

DIO BULDANA NEWS 09.12.2022

 



समृद्धी महामार्गावर होणार दोन कृषिसमृद्धी नवनगरांची निर्मिती

*साब्रा-काब्रा, सावरगाव माळ नवनगर होणार

*साडेसहा हजार शेतकऱ्यांचा प्रत्यक्ष सहभाग

बुलडाणा, दि. 9 : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गामुळे जिल्ह्यात समृद्धी येणार आहे. जिल्ह्यातील सुमारे 89 किलोमीटर असणाऱ्या महामार्गावर साब्रा-काब्रा आणि सावरगाव माळ या दोन कृषिसमृद्धी नवनगरांची निर्मिती होणार आहे. यात तब्बल साडेसहा हजार शेतकऱ्यांचा प्रत्यक्ष सहभाग राहणार असल्याने कृषि विकासासह पर्यटनालाही या मार्गामुळे चालना मिळणार आहे.

जिल्ह्यातील मेहकर, लोणार, सिंदखेड राजा, देऊळगाव राजा या चार तालुक्यातून गेलेल्या समृद्धी महामार्गावरील मेहकर तालुक्यातील 283 किलोमीटरवर सब्रा-काब्रा तर 340 किलोमीटरवरील सिंदखेड राजा तालुक्यातील सावरगाव मल अशी दोन कृषिसमृद्धी नगरे प्रस्तावित आहे. जिल्ह्यात दोन कृषिसमृद्धी नगरे होणार असल्याने याचा कृषि क्षेत्राला लाभ होणार आहे.

मेहकर तालुक्यातील साब्रा-काब्रा येथील नवनगरामध्ये साब्रा, काब्रा, भुमरा, फैजलापूर, गौंढाळा पाच गावांचा समावेश राहणार आहे. यात सुमारे चार हजार शेतकरी सहभागी राहतील. यासाठी सुमारे 1 हजार 348 हेक्टर भूसंपादन करण्यात आले आहे. सिंदखेड राजा आणि देऊळगाव राजा या तालुक्यातील सावरगाव माळ, गोळेगाव, निमखेड सावरगाव माळ या नवनगरामध्ये समाविष्ट राहणार आहे. यात सुमारे अडीच हजार शेतकरी सहभागी होणार असून यासाठी सुमारे 1946 हेक्टर जमिन संपादीत करण्यात आली आहे.

जिल्ह्यात समृद्धी महामार्ग दोन पॅकेजमध्ये पूर्ण करण्यात आला आहे. यातील सहाव्या पॅकेजची लांबी 36.100 किलोमीटर आहे. समृद्धी महामार्गातील बेलगाव ते पारडा, ता. मेहकर या 259.900 ते 296 किलोमीटरचे अंतर यात समाविष्ट आहे. तसेच सातव्या पॅकेजची लांबी 51.190 किलोमीटर आहे. यात बांडा, ता. लोणार ते सावरगाव माळ, ता. सिंदखेड राजा या 296 ते 347.190 किलोमीटरचा रस्ता पूर्णत्वास आला आहे. यासाठी थेट खरेदी आणि भूसंपादन अशी एकूण 1 हजार 204.27 हेक्टर जमिनीचे भूसंपादन करण्यात आले आहे.

जिल्हा मुख्यालयापासून समृद्धी महामार्ग 75 किलोमीटर अंतरावर असून जागतिक पर्यटनाचा केंद्रबिंदू असलेले लोणार सरोवर केवळ 18 किलोमीटर अंतरावर आहे. तसेच संतनगरी शेगाव 74 किलोमीटरवर आहे. महामार्गाला मेहकर येथील फर्दापूर आणि देऊळगाव येथे दोन इंटरचेंज देण्यात आले आहे. यामुळे जिल्ह्यातील वाहतूक याठिकाणाहून समृद्धी महामार्गावर जाऊ शकतील. 120 मीटर रूंद, सहा मार्गीका, कमाल 150 किलोमीटर प्रति तास वेग यामुळे हा भव्यदिव्य असा महामार्ग जिल्ह्याच्या विकासात हातभार लावेल.

00000

सात पौष्टिक तृणधान्य भरडधान्य प्रक्रिया प्रकल्पांना मान्यता

बुलडाणा, दि. 9 :  मुख्यमंत्री कृषि व अन्न प्रक्रिया योजना सन २०१७ पासून राबविण्यात येत आहे. या योजनेस पुढील पाच वर्षासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. सन २०२२-२३ हे आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष म्हणून पौष्टीक तृणधान्य भरडधान्य प्रक्रिया प्रकल्पांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. प्रकल्पांना आर्थिक सहाय म्हणून ३० टक्के किंवा ५० लाख रूपयांचे अनुदान मर्यादा निश्चित केली आहे. सन २२-२३ या वर्षाकरिता ७ प्रकल्पांना मान्यता देण्यात आली आहे.

या योजनेत कृषि व अन्न प्रक्रियाकरिता प्रशिक्षित मनुष्यबळ निर्मिती करणे, ग्रामीण भागात पिक समूह आधारित कृषि व अन्न प्रक्रिया उद्योगांना प्राधान्य देऊन रोजगारांच्या संधी उपलब्ध करणे, उत्पादित मालास बाजारपेठ निर्माण करून निर्यातीस प्रोत्साहन देणे, नवीन प्रकल्प स्थापित करण्यास कार्यरत असलेल्या प्रकल्पांचे आधुनिक तंत्रज्ञानानुसार स्तर वृद्धी, विस्तारीकरण व आधुनिकीकरणास प्रोत्साहन देणे, तृणधान्य, कडधान्य, फळे, भाजीपाला, तेलबिया, मसाला आदी पिक समूह आधारित प्रक्रिया उद्योगांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

पात्रतेचे निकषात वैयक्तिक उद्योगिक, सक्षम शेतकरी, बेरोजगार, युवक, महिला, नवउद्योगक, अॅग्रीग्रेटर, भागीदारी प्रकल्प, भागीदारी संस्था, शेतकरी उत्पादक गट, संस्था, कंपनी, स्वयंसहाय्यता गट, उत्पादक सहकारी संस्था, शासकीय संस्था, खाजगी संस्था यांचा समावेश आहे. शासनाच्या कुटुंब या संज्ञेनुसार (पती पत्नी व त्यांची अपत्ये) एका कुटुंबातील केवळ एकाच लाभार्थ्याला योजनेत लाभ घेता येणार आहे. मुख्यमंत्री कृषि व अन्न प्रक्रिया योजनेत एका अर्जदारास एकदाच लाभ घेता येणार आहे.

योजनेच्या तत्वत: मान्यतेसाठी आवश्यक कागदपत्रे तपासणीसुची, लाभार्थ्याचा अर्ज, बँक कर्जमंजूरी पत्र (मुळप्रत चालू वर्षाचे), बँकेचे ॲपरेजल (मुळप्रत), 7/12, 8अ (मुळप्रत) किंवा भाडे करारनामा, व्यक्ती, उद्योगाचे पॅनकार्ड, आधार कार्ड उद्यम नोंदणी प्रमाणपत्र, प्रकल्पाचा डीपीआर (मुळप्रत), प्रक्रिया फ्लो चार्ट, नोटराईज्ड करारनामा, बांधकाम ब्ल्यू प्रिंट, बांधकाम अंदाजपत्रक, मशिनरी कोटेशन, मागील तीन वर्षाचे लेखा परिक्षण अहवाल (फक्त स्तरवृद्धी, विस्तारीकरण व आधुनिकीकरण प्रकल्पांसाठी) याप्रमाणे आहेत. योजनेसाठी दि. १९ डिसेंबर २०२२ पर्यंत प्रस्ताव सादर करावे लागणार आहे.

मुख्यमंत्री कृषि व अन्न प्रक्रिया योजनेंतर्गत वैयक्तिक उद्योगक, सक्षम शेतकरी, बेरोजगार, युवक, महिला, नवउद्योगक, अॅग्रीग्रेटर, भागीदारी प्रकल्प, भागीदारी संस्था, शेतकरी उत्पादक गट, संस्था, कंपनी, स्वयंसहाय्यता गट, उत्पादक सहकारी संस्था, शासकीय संस्था, खाजगी संस्था प्रकल्प सादर करतील त्यांना प्रथम प्राप्त प्रथम प्राधान्य देण्यात येईल. अधिक माहितीसाठी तालुका कृषि अधिकारी कार्यालय किंवा जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000

शेतकऱ्यांनी रब्बी पिक स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन

          बुलडाणा, दि. 9 :  जिल्ह्यात पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्याकडून विविध प्रयोग करण्यात येतात. अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी रब्बी पिक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यात शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कृषि विभागातर्फे करण्यात आले आहे.

प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन विजेत्या शेतकऱ्यांना गौरव  केल्यास, त्यांचे  मनोबल वाढण्यास मदत होऊन अधिक उमेदीने नवनवीन व अद्ययावत तंत्रज्ञानचा वापर केला जाईल. यामुळे कृषि उत्पादनामध्ये भर घालण्यासाठी शेतकऱ्यांचे योगदान मिळेल, तसेच मार्गदर्शक परिसरातील इतर शेतकऱ्याना होवून जिल्ह्याच्या पर्यायाने राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेवून कृषि विभागामार्फत पिक स्पर्धा योजना राबविण्यात येते.

         सध्याच्या पिक स्पर्धेत जिल्ह्याकरिता रब्बी हंगामासाठी ज्वारी, गहू, हरभरा, करडई, जवस ही पिके समाविष्ट करण्यात आली आहेत. स्पर्धेत प्रती तालुका किमान स्पर्धक संख्या ही  सर्वसाधारण गटासाठी १० आणि आदिवासी गटासाठी-५ शेतकरी आहे. पिकस्पर्धेमध्ये सहभागी लाभार्थीचे शेतावर त्या पिकाखालील किमान ४० आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे. पुरेशे अर्ज प्राप्त झाल्यानंतर संबंधित पिकाची पिकस्पर्धा संबधित तालुका कृषि अधिकारी जाहीर करतील. स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकांसाठी स्पर्धेत सहभाग घेता येईल. सर्व गटासाठी पिकनिहाय प्रत्येकी ३०० रुपये  प्रवेश शुल्क राहणार आहे. यासाठी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत दि. ३१ डिसेंबर २०२२ आहे.

पिकस्पर्धेत सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी अर्ज विहित नमुन्यामध्ये भरून त्यासोबत ठरवून दिलेले प्रवेश शुल्क चलन, सात बारा, आठ अ चा उतारा व अनुसूचित जमातीचे असल्यास जात प्रमाणपत्र या कागदपत्रांची पूर्तता करून संबधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयात अर्ज सादर करावेत. या स्पर्धेत सर्वसाधारण व आदिवासी असे दोन गट राहणार आहे.

तालुका पातळीवर पहिले पाच हजार, दूसरे तीन हजार, तिसरे दोन हजार रूपये बक्षीस राहणार आहे. जिल्हा पातळीवर पहिले दहा हजार, दूसरे सात हजार, तिसरे पाच हजार रूपये बक्षीस राहणार आहे. राज्य पातळीवर पहिले 50 हजार, दूसरे 40 हजार, तिसरे 30 हजार रूपये बक्षीस राहणार आहे.

पिक स्पर्धेच्या मार्गदर्शक सूचना कृषि विभागाच्या krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. ज्वारी, गहू, हरभरा, करडई,जवस या पिकासाठी ३१डिसेंबर २०२२ पूर्वी अर्ज सादर करून पिकस्पर्धेमध्ये जास्तीत संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. एस जी.डाबरे  यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment