Sunday 1 May 2022

DIO BULDANA NEWS 1.5.22







जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबध्द
- पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे
*महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६२ वा वर्धापन दिन थाटात साजरा
बुलडाणा, (जिमाका) दि.१: आपण सर्वजण मागील काळात कोरोना विषाणूच्या संसर्गाला सामोरे गेलो. राज्य शासनाने प्रशासनासोबत उपाययोजना हाती घेत कोरोना संसर्गाची तिसरी लाट  नियंत्रणात आणली. मात्र आता कोरोना संसर्गाच्या चौथ्या लाटेची चर्चा सुरू झाली आहे.  कोरोना संसर्ग सुरक्षा नियमांचे पालन व पात्र लाभार्थ्यांना लसीकरण पूर्ण करून ही लाट आपणाला थोपवायची आहे. कोरोनावर मात करीत जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. पुढील काळात जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबध्द आहे, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी आज केले. 
  महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६२ वा वर्धापन दिन आज महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करण्यात आला.  पोलीस  कवायत मैदानावर पालकमंत्री डॉ. शिंगणे यांनी मुख्य शासकीय कार्यक्रमात ध्वजारोहण केले. यावेळी जिल्हाधिकारी एस रामामूर्ती, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया आदी उपस्थित होते. सर्वप्रथम  पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी परेड निरीक्षण केले. 
  ध्वजारोहण नंतर जिल्ह्याला उद्देशून ते बोलत होते.  शासनाने आता 12 ते 14 वर्षे वयोगटातील मुला-मुलींसाठी लसीकरण सुरू केले असल्याचे सांगत पालकमंत्री डॉ शिंगणे म्हणाले, जिल्ह्यात या वयोगटातील 33 हजार 791 लाभार्थ्यांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. तसेच 15 वर्ष पुढील 71 हजार 163 व 18 वर्षापुढील 16 लाख 97 हजार 174 लाभार्थ्यांना लसीचा पहिला डोस दिला आहे. त्याचप्रमाणे पात्र असलेल्या लाभार्थ्यांना लसीचा ‘प्रिकॉशन डोस’ ही सुरू करण्यात आला आहे. कोरोना कालावधीत दोन्ही पालक गमावलेल्या जिल्ह्यातील एकूण 15 बालकांना 5 लाख रूपये  रकमेचे मुदत ठेव प्रमाणपत्र आणि अनाथ प्रमाणपत्र देण्यात आले आहे. तसेच कोविडमुळे पतीचे निधन झालेल्या विधवा महिलांसाठी शासनाने मिशन वात्सल्य योजना सुरू केली आहे. त्याअंतर्गत 337 विधवा महिलांना विविध योजनांचा लाभ देण्यात येत आहे. 
      ते पुढे म्हणाले, गरीब व आर्थिक दुर्बल घटकांना नाममात्र दरात शिवभोजन थाळी योजनेतून  दर्जेदार जेवण देण्यात येत आहे. या योजनेत जिल्ह्यातील 23 शिवभोजन केंद्रांतून मागील वर्षात 9 लाख 36 हजार थाळी सवलतीच्या दरात वितरीत करण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यात शासनाकडून दरमहा अंत्योदय, प्राधान्य कुटूंब व शेतकरी योजनेतील लाभार्थ्यांना 1 लाख 20 हजार 400 क्विंटल धान्याचे नियमीत वितरण करण्यात येत आहे.  शेतातील शेतमाल सुरक्षितरित्या घरी आणण्यासाठी मातोश्री पाणंद रस्ते योजनेअंतर्गत 340 रस्ते पूर्ण करण्यात आले आहे. त्याची एकूण लांबी 551 किलोमीटर आहे महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतून जिल्ह्यात 1 लाख 74 हजार 728 लाभार्थी शेतकऱ्यांना 1153 कोटी रूपये त्यांच्या कर्ज खात्यात थेट जमा झाले आहे. पंतप्रधान आवास योजनेतून आजपर्यंत 18 हजार 979 घरकूल पूर्ण करण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यात रमाई आवास योजनेतून सन 2021-22 मध्ये  माध्यमातूनही 8 हजार 462 घरकुलांना मंजूरी देण्यात आली आहे. 
   जिल्ह्याला संपन्न करणाऱ्या पुर्णा नदीवरील जिगांव प्रकल्पाचे काम सुरू असल्याचे सांगत पालकमंत्री म्हणाले,  जिगांव सोबतच जिल्ह्यात अरकचेरी, चौंढी, आलेवाडी या लघू प्रकल्पांची कामे सुरू आहे. जिगांव प्रकल्पामध्ये एकुण 32 गावे पुर्णत: व 15 गावे अंशत: बाधीत होत असुन त्यापैकी पहिल्या टप्प्यामधील 22 गावांपैकी 6 गावांचे पुनर्वसन पुर्ण करण्यात आले आहे. या गावात नागरी सुविधांची कामे पुर्णत्वास आली आहे, तसेच 10 गावांचे पुनर्वसन प्रगतीपथावर आहे.  मागणीनुसार वाढीव वीजपुरवठा करण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करीत आहे. वीज निर्मिती पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे भारनियमनातून दिलासा मिळाला आहे. तरीही नागरिकांनी विजेचा वापर काटकसरीने करावा. जिल्ह्यात गुटखा विक्री तथा तत्सम प्रतिबंधित अन्न पदार्थांच्या विक्रीला प्रतिबंध करण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या मार्फत कारवाई करण्यात येत आहे.  जिल्ह्यात अशा 20 जप्ती कारवायांमध्ये एकूण 12 लाख 69 हजार 266 रूपये किमतीच्या प्रतिबंधित  अन्नपदार्थाचा  साठा जप्त करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. 
       ते पुढे म्हणाले, मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना आर्थिक अडचण येवू नये, म्हणून    सामाजिक न्याय विभागाअंतर्गत जिल्ह्यात 29 हजार 401 विद्यार्थ्यांना 43 कोटी 38 लाख रूपये शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले आहे. शासकीय वसतिगृहात प्रवेश  मिळाला नसलेल्या अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य देण्याकरीता डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविण्यात येत आहे. या योजनेत सन 2021-22 मध्ये 509 विद्यार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. जिल्ह्यात सामाजिक न्याय विभागाच्या 17 शासकीय वसतिगृहे व 5 शासकीय निवासी शाळा आहेत. यामध्ये क्षमतेनुसार 100 टक्के विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले आहे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतून जिल्ह्यात 259 कामांना मंजूरी देण्यात आली आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घेता यावे, यासाठी परदेश शिष्यवृत्ती योजनेतून जिल्ह्यात 5 विद्यार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. त्यामुळे परदेशातील महागडे शिक्षण विद्यार्थ्यांच्या आवाक्यात आले आहे. 
  भाषणानंतर पालकमंत्री यांनी स्वांतत्र्य सैनिक, विविध पदाधिकारी, अधिकारी आदींची भेट घेतली. कार्यक्रमा दरम्यान जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून पोलिस विभागाला देण्यात आलेल्या दुचाकी, चार चाकी वाहनांना पालकमंत्री डॉ शिंगणे यांनी हिरवी झेंडी दाखविली. तसेच वाहतूक मार्गदर्शिका पुस्तिकेचे विमोचनही यावेळी करण्यात आले.  कार्यक्रमाचे संचलन साहेबराव सोळंके व निलेश रत्नपारखी यांनी केले.  कार्यक्रमाला स्वातंत्र्य सैनिक, पदाधिकारी, अधिकारी, पत्रकार, नागरिक उपस्थित होते. 
*******


समाज कल्याण विभागाच्या योजनांची माहिती देणाऱ्या स्टॉलचे उद्घाटन
बुलडाणा, (जिमाका) दि.१: महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची माहिती देणाऱ्या स्टॉलचे उद्घाटन आज पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते पोलिस कवायत मैदानावर करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी एस रामा मूर्ती, मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चावरीया, सहाय्यक आयुक्त डॉ अनिता राठोड आदी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री यांनी सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने प्रकाशित माहिती पत्रके, पुस्तिका चाळल्या. तसेच या उपक्रमाची माहिती घेतली. 
*******

No comments:

Post a Comment