Monday 16 May 2022

DIO BULDANA NEWS 16.5.2022

 





जिजाऊ गाथा महोत्सवाने सिंदखेडराजा नगरीचा नाव लौकिक वाढला पाहिजे

- पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे
*जिजाऊ गाथा महोत्सवाचे उद्घाटन
बुलडाणा, (जिमाका) दि. 16 : जिजाऊ गाथा महोत्सव हा लोकोत्सव झाला पाहिजे. त्यासाठी लोकांचा सहभाग वाढविला पाहिजे. कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये लोकांची मते विचारात घेऊन यशस्वीपणे आयोजन करता येते जिजाऊ महोत्सव भविष्यात या नगरीचा नावलौकिक वाढणार आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी सिंदखेड राजा येथे केले.
  आजादी का अमृत महोत्सवा निमित्त सांस्कृतीक कार्य विभागाच्या वतीने जिजाऊ गाथा महोत्सव 2022 चे सिंदखेड राजा येथील जिजाऊ सृष्टी येथे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन 15 मे रोजी पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते पार पडले. त्यावेळी ते बोलत होते.  राष्ट्रमाता जिजाऊ यांचा प्रेरणादायी इतिहास नवीन पिढीला कळावे, तरुण पिढीने राष्ट्रमातेच्या कार्याची प्रेरणा घ्यावी या हेतूने सांस्कृतीक कार्य मंत्री यांच्या सूचनेप्रमाणे  15 मे ते 17 मे 2022 या कालावधीत  जिजाऊ गाथा महोत्सव 2022 या कार्यक्रमाचे आयोजन दररोज सायं. 6 ते रात्री 10 वेळेत करण्यात आले आहे.
      उद्घाटन सोहळ्यासाठी जिल्हाधिकारी एस. रामामुर्ती, अर्जुन  तनपुरे, प्राचार्य रामकिसन पवार, गंगाधर जाधव, विजयसिंह राजे जाधव, प्रा.मधुकर गव्हाड, ज्योतीताई जाधव, तहसीलदार श्री. सावंत, सुभाष कोल्हे, प्रामुख्याने उपस्थितीत होते. जिजाऊ गाथा महोत्सवाची सुरवात सर्वप्रथम सकाळी दिंडीने जिजाऊ मातेच्या राजवाड्यापासून करण्यात आली.
   उद्घाटन कार्यक्रमावेळी पालकमंत्री पुढे म्हणाले, सिंदखेड राजा येथे 21 मे रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार येत आहेत. ते येथील विविध ऐतिहासिक स्थळांना भेटी देणार आहेत. त्यांच्या भेटीमुळे निश्चितच  या नगरीच्या विकासाला चालना मिळणार आहे.  या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांस्कृतिक कार्य विभागाचे सहाय्यक संचालक संदीप शेंडे यांनी केले. त्यांनी महोत्सवाच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट करीत 16 व 17 मे रोजी होणाऱ्या कार्यक्रमांची माहिती दिली.  कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शिवाजी राजे जाधव यांनी केले.
        कार्यक्रमादरम्यान कोल्हापूरचे हलगी सम्राट संजय आवळे यांचे रणवाद्य वादन होणार असून सुप्रसिद्ध गायिका शिवमती वैशाली माडे यांच्या गायनातून शौर्यगाथा सादर  करण्यात आली. सिंदखेड राजा येथील महिला कीर्तनकार ज्योती ताई जाधव यांचे  मासाहेब जिजाऊ यांच्या जीवनावर आधारित  व्याख्यान रुपी कीर्तनाने कार्यक्रमांची रंगत   आली.
महोत्सवात 16 मे 2022 रोजी महाराष्ट्राचे  सुप्रसिद्ध  शाहीर, गायक नंदेश उमप, मुंबई यांचे शाहिरी पोवाडा या सोबतच सातारा येथील उदय यादव यांचे मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक होणार आहे . तसेच महाराष्ट्रातून येणाऱ्या स्थानिक कलावंतांचा एक रंगारंग महोत्सव यादरम्यान सादर होणार आहे. यात पोवाडा, लोकगीत , एक पात्री,  गवळण यासारख्या विविध गायन प्रकाराचा आनंद रसिकप्रेक्षकांना घेता येईल.
    तसेच 17 मे रोजी नांदेड येथील शिवश्री डॉ.शिवराज शिंदे यांचा शाहिरी जलसा तर वाशीम येथील समाज प्रबोधनकार शिवश्री शामभाऊ वानखडे यांचा लोक जागर हा कार्यक्रम होणार आहे .तसेच बाल कलाकार सप्त खंजीरी वादक शिव कुमारी क्रांती काळे - दर्यापूर, बाल शाहीर सतीश कुरांगड सिदखेडराजा आणि अंकुश परिहार जाफराबाद यांचे  बहारदार कार्यक्रमाचा आस्वाद घेता येणार आहे.  त्यासोबतच अतिशय महत्त्वाचा, सुंदर ,दैदिप्यमान व नेत्रदीपक कार्यक्रम म्हणजे सांगली येथून भूपाळी ते भैरवी या कार्यक्रमाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याची सुंदर प्रतिकृती सादर केली जाणार आहे.
       अशा या भरगच्च कार्यक्रमामध्ये जिजाऊ सृष्टी येथे प्रेक्षकांसाठी सेल्फी पॉइंट्स, रोशनाईचा झगमगाट ,‌ थोर महापुरूष यांच्या जीवनावर आधारीत  पुस्तकांचे स्टॉल, सनई चौघड्यांचे वादन व ऐतिहासिक रांगोळीचे रेखाटन केले गेले होते. जिजाऊ सृष्टी सारख्या निसर्गरम्य परिसरामध्ये होणाऱ्या  या कार्यक्रमास सर्व रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला.  तरी प्रेक्षकांनी कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून लाभ घ्यावा असे आवाहन सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. 

No comments:

Post a Comment