Monday 23 May 2022

DIO BULDANA NEWS 23.5.2022

 विज पडण्याची सूचना देणार ‘दामिनी

  • दामिनी ॲप वापरून पडणाऱ्या वीजेपासून संरक्षण करण्याचे आवाहन

बुलडाणा,(जिमाका) दि.23 :  मान्सून कालावधीत विशेषतः जुन व जुलै या महिन्यात विज पडून जिवीतहानी होत असते. विज पडुन जिवीत हानी होऊ नये, या करीता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणुन पृथ्वी मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली यांनी दामिनी  अॅप तयार केले आहे. हे दामिनी ॲप विज पडण्याची सूचना देणारआहे. त्यामुळे नागरिकांनी वीज पडून होणाऱ्या धोक्यापासून वाचण्यासाठी ॲप वापरण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

   सदरचे अॅप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. सुरक्षात्मक उपाययोजना म्हणून सर्व नागरिकांना तसेच  शासकीय यंत्रणा, शासकीय अधिकारी , कर्मचारी, नागरिक, क्षेत्रीय अधिकारी, मंडळ अधिकारी, गाव स्तरावरील सरपंच, पोलिस पाटील, तलाठी, ग्रामसेवक, कृषीसेवक, कोतवाल, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक, ग्रामपंचायत डाटा एंन्ट्री ऑपरेटर यांना सदरचे अॅप डाऊनलोड करुन त्याचा वापर करणेबाबत प्रवृत्त करण्यात यावे. तसेच सदरचे अॅप GPS लोकेशन ने काम करीत असून विज पडण्याच्या 15 मिनिटापूर्वी सदरच्या अॅपमध्ये स्थिती दर्शविण्यात येते.   अॅपमध्ये आपले सभोवताल विज पडत असल्यास सदरचे ठिकाणापासुन सुरक्षीत स्थळी जावे. तसेच सदर वेळी झाडाचा आश्रय घेऊ नये.

         गावातील सर्व स्थानिक शासकीय अधिकारी कर्मचारी यांना सदर ॲप डाऊनलोड करुन त्यामध्ये प्राप्त होणाऱ्या अलर्ट नुसार आवश्यक पूर्वसुचना गावातील सर्व नागरिकांना देऊन होणारी जीवितहानी टाळावी, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संभाजी पवार यांनी केले आहे .

                                                                        ******

            आदिवासी पारंपारिक नृत्य पथकांच्या नृत्य स्पर्धेचे आयोजन

  • 31 मे रोजी होणार नृत्य स्पर्धा

बुलडाणा,(जिमाका) दि.23 :  आदिवासी संस्कृतीचे जतन करण्यासाठी आदिवासी समाजाच्या पारंपारिक नृत्य कलेला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. नृत्य कलेला वाव मिळावा, लोकनृत्याबाबत जागृती व्हावी, याकरीता आदिवासी पारंपारिक नृत्य पथकांच्या नृत्य स्पर्धा घेण्यात येत आहे. सदर स्पर्धेसाठी नाव नोंदणी ही 29 मे 2022 पर्यंत करण्यात येणार आहे. नोंदणी प्रकल्प अधिकारी कार्यालय अकोला व शासकीय आश्रम शाळा, कोथळी ता. बार्शिटाकळी, जि. अकोला येथे करण्यात येत आहे. इच्छूकांनी 29 मे पर्यंत नोंदणी करावी, त्यानंतर नविन संस्थेची नोंदणी करून घेतल्या जाणार नाही. नृत्यस्पर्धा ही मंगळवार, 31 मे 2022 रोजी शासकीय आश्रम शाळा, कोथळी ता. बार्शिटाकळी जि अकोला येथे आयोजित करण्यात येणार आहे. आदिवासी पारंपारिक नृत्य सर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या कलाकारांना येण्या- जाण्याचा खर्च, मानधन, वेशभुषेचा खर्च शासकीय नियमाप्रमाणे अदा करण्यात येणार आहे. तसेच विजेत्या प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाला रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. तरी इच्छूक नृत्य पथकांना नाव नोंदणी करून सहभाग घ्यावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला यांनी केले आहे.

**********

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने बांधकाम कामगार मंडळाचा आयकॉनिक सप्ताह

  • मंडळातंर्गत आतापर्यंत 65 हजार 503 बांधकाम कामगारांची नोंदणी

बुलडाणा,(जिमाका) दि.23 :  महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातंर्गत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्ताने आयकॉनिक सप्ताह 7 ते 13 मार्च 2022 दरम्यान राबविण्यात आला. या सप्ताहादरम्यान बांधकाम कामगारांच्या विविध कल्याणकारी योजनांबाबत जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आला. प्रत्यक्ष बांधकाम स्थळी भेटी देवून उपस्थित सर्व बांधकाम कामगारांना मंडळात नोंदणी करण्याचे आवाहनही करण्यात आले. बांधकाम कामगारांना विविध कल्याणकारी योजनांची माहिती देवून जनजागृती करण्यात आली. आतापर्यंत जिल्ह्यात मंडळामध्ये 65 हजार 503 बांधकाम कामगारांची नोंदणी करण्यात आली आहे. तर 28 हजार 45 बांधकाम कामगारांनी नोंदणीचे नुतनीकरण केले आहे. नोंदणी झालेल्या जिवीत असलेल्या एकूण 22 हजार 185 बांधकाम कामगारांना विविध कल्याणकारी योजनांचा लाभ डीबीटी पद्धतीने प्रदान करण्यात आलेला आहे, असे सरकारी कामगार अधिकारी आ. शि. राठोड यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

                                                                        *******

बुलडाणा डाक विभागात ग्रामीण डाकसेवक 65 पदांची ऑनलाईन भरती

बुलडाणा,(जिमाका) दि.23 :  अधिक्षक डाकघर बुलडाणा विभाग या कार्यालयातंर्गत जीडीएस ब्रँच पोस्टमास्टर, सहायक ब्रँच पोस्टमास्टर, डाक सेवक अशा एकूण 65 पदांची ऑनलाईन भरती करण्यात येत आहे. संबंधित पदांविषयी सविस्तर माहिती, नियम व अटी https: //indiapostgdsonline.cept.gov.in/Home.aspx या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्यानुसार इच्छूक उमेदवारांनी आपला अर्ज या संकेतस्थळावर अपलोड करावा. अर्ज अपलोड करण्याची अंतिम मुदत 5 जुन 2022 आहे. ब्रँच पोस्टमास्टरला वेतन 12 हजार रूपये व ग्रामीण डाकसेवक पदासाठी 10 हजार रूपये प्रति महिना आहे. वयोमर्यादा 18 ते 40 वर्ष असून एसएससी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, असे डाक अधिक्षक यांनी कळविले आहे.

                                                                                                **********


--

No comments:

Post a Comment