Wednesday 18 May 2022

DIO BULDANA NEWS 18.5.2022

 



जिजाऊ गाथा महोत्सवाची देदीप्यमान शिवराज्याभिषेक सोहळ्याने सांगता

         बुलडाणा, (जिमाका) दि.18: आजादी का अमृत महोत्सव या उपक्रमांतर्गत सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख  यांच्या संकल्पनेतून व सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय तसेच सांस्कृतीक कार्य विभागाचे संचालक श्री. चवरे  यांच्या नियोजनाने तीन दिवसीय जिजाऊ गाथा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. हा महोत्सव राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या मातृभूमीत सिंदखेड राजा येथील जिजाऊ सृष्टीवर भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमांनी पार पडला. सर्वांना प्रेरणा देणाऱ्या जिजाऊ गाथा या महोत्सवाची सांगता 17 मे 2022 रोजी महाराष्ट्रातील प्रसिद्ध भूपाळी ते भैरवी कार्यक्रमाच्या दैदीप्यमान शिवराज्याभिषेक सोहळ्याने झाली.

   राष्ट्रमाता जिजाऊ यांचा प्रेरणादायी इतिहास आजच्या पिढीला अवगत व्हावा या उद्देशासाठी सांस्कृतीक कार्य विभागमार्फत या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. जिजाऊ गाथा या महोत्सवाची सुरुवात राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या राजमाता जिजाऊ यांच्या राजवाड्यापासुन  राज्याच्या विविध जिल्ह्यातील शिवप्रेमी व जिजाऊप्रेमी कलावंताच्या स्फूर्तिदायक भरगच्च दिंडीने करण्यात आली.

         महोत्सवाच्या 15 मे रोजी झालेल्या उदघाटन प्रसंगी जिल्ह्याचे पालकमंत्री राजेंद्र शिंगणे, जिल्हाधिकारी एस. रामामूर्ति हे प्रामुख्याने उपस्थित होते. यासोबतच आमदार ॲड. किरण सरनाईक यांनी या महोत्सवास उपस्थिती दर्शवून सर्वांना शुभेच्छा दिल्या व राष्ट्रमाता जिजाऊ यांना वंदन करून दरवर्षी या महोत्सवाचे आयोजन करावे अशी मागणी केली. पालकमंत्री डॉ. शिंगणे यांनी राज्य शासनामार्फत राबविला जाणारा जिजाऊ गाथा महोत्सव हा सिंदखेड राजा या ठिकाणचा व राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या पावन भुमिचा नावलौकिक वाढविणारा उपक्रम असल्याने दरवर्षी या महोत्सवाचे आयोजन शासनामार्फत करण्यात यावे, याबाबत प्रयत्न करणार असल्याचे सांगम राष्ट्रमाता जिजाऊ यांचे प्रेरणादायी विचार सर्वांनी घेण्याचे आवाहन केले.

   या तीन दिवसीय  महोत्सवात हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीचे सुप्रसिद्ध पार्श्वगायिका वैशाली माडे, महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध शाहीर नंदेश उमप यांनी 16 मे रोजी बुद्ध पौर्णिमा असल्याने सादर केलेली बुद्ध वंदना, सोबतच मी शिवाजीराजे भोसले बोलतोय या प्रसिद्ध चित्रपटात स्वतः गायलेले व अंगावर शहारे आणणारा पोवाडा सादर करून कार्यक्रमाची उंची वाढविली. तसेच चक्क प्रतापगड च्या पायथ्याशी अफजल खान व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भेटीचा ज्वलंत प्रसंग उभा केला. शिवराज्यकालीन मर्दानी खेळ आणि भूपाळी ते भैरवी कलाकारांसोबतच स्थानिक कलावंतांनी व बालशाहिरांनी जिजाऊ गाथा महोत्सवात आपली कला सादर करून जिजाऊ मातेचा प्रेरणादायी इतिहास सर्व रसिक प्रेक्षकांना अनुभवून दिला.

   शिवराज्याभिषेक सोहळा म्हणजे प्रत्येक प्रेक्षकांनी डोळ्यात साठवलेला एक जिवंत अविस्मरणीय प्रसंग. या प्रसंगी भूपाळी ते भैरवी या कलाकारांमार्फत सादर करण्यात आलेला शिवराज्याभिषेक सोहळा बघितल्यानंतर स्थानिक प्रेक्षकांनी दरवर्षी हा महोत्सव राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या पावन भूमीत आयोजित करावा अशी मागणी आयोजकांना केली. जिजाऊ गाथा महोत्सवाच्या सांगता सोहळ्याकरिता प्रामुख्याने पुरुषोत्तम खेडेकर उपस्थित होते. त्यांनी जिजाऊ गाथा महोत्सवाचे उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांचे आभार व्यक्त केले.  महोत्सवातील तीन दिवसीय कार्यकमांना परीसरातील नागरिक उपस्थित होते.

                                                                                                *******

 

जिल्ह्यात 19 ते 21 मे दरम्यान उद्यमित्रा यात्रेचे आयोजन

  • बुलडाणा नगर पालिकेच्या सभागृहात तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम

बुलडाणा, (जिमाका) दि.18: महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी मुंबई यांनी युथ एड फाऊंडेशन संस्था, पुणे यांच्या समवेत प्रोमोटींग माइक्रो एंटरप्रीनरशीप करीता विना अनुदान तत्वावर सामंजस्य करार केला आहे. या करारातंर्गत जिल्ह्यातील तळागाळातील उमेदवारांचे समुपदेशन करून स्वयंरोजगाराकरीता सदर संस्थेमार्फत बीज भांडवल प्रदान करण्यात येत आहे. या अनुषंगाने बुलडाणा शहरात नगर पालिकेच्या सभागृहात 19 ते 21 मे 2022 दरम्यान तीन दिवसीय उद्यमित्रा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.                             

  या यात्रेद्वारे जिल्हास्तरावर तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून त्याद्वारे जिल्ह्यातील नव उद्योजकांना प्रोत्साहन व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच युथ एड फाऊंडेशन संस्था, पुणे येथील मान्यवरांचे मार्गदर्शनही मिळणार आहे. सदर कार्यक्रम पुर्णपणे नि:शुल्क आहे. कार्यक्रमात उद्योगाची बाजारपेठेतील मार्केटींग, उद्योग कसा वाढवावा, आर्थिक साक्षरता, लागणारे भांवल/ निधी याबाबतही विस्तृत मार्गदशन करण्यात येणार आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमाचा जिल्ह्यातील सुशिक्षीत बेरोजगार युवक व युवतींना निश्चितपणे भविष्यात नवउद्योजक होण्यासाठी मोठा फायदा होणार आहे. तरी या प्रशिक्षण कार्यक्रमात जिल्ह्यातील जास्तीत जास्त सुशिक्षीत बेरोजगार युवक-युवतींनी तथा नवीन उद्योग / व्यवसाय  करण्यास इच्छूक असणाऱ्या नवउद्योजकांनी सहभागी होऊन लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास विभागाच्या सहायक आयुक्त श्रीमती बारस्कर यांनी केले आहे.

***********

कंत्राटी कला व संगणक शिक्षक पदांकरीता 29 मे रोजी लेखी परीक्षेचे आयोजन

बुलडाणा, (जिमाका) दि.18: प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अकोला यांच्या अधिनस्थ शासकीय आश्रम शाळांवर कला व संगणक शिक्षक या कंत्राटी पदांकरीता 24 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर 2019 दरम्यान अर्ज मागविण्यात आले. प्राप्त झलेल्या अर्जांनुसार कंत्राटी कला शिक्षक पदासाठी 144 व पदवीधर अंशकालीनचे 5 असे एकूण 149 अर्ज प्राप्त झाले. तसेच संगणक शिक्षक पदासाठी 114 उमेदवार लेखी परीक्षेस पात्र ठरले. तरी या पदांसाठी लेखी परीक्षेचे आयोजन 29 मे 2022 रोजी सकाळी 11 वाजता सिताबाई कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सिव्हील लाईन रोड, अकोला येथे करण्यात आले आहे. परीक्षेकरीता 100 प्रश्न असणार आहे. प्रती प्रश्न 2 गुणाप्रमाणे एकूण 200 गुणांची लेखी परीक्षा राहील. यामध्ये कला शिक्षक पदाचे परीक्षेकरीता सामान्य ज्ञानचे 70 व आर्ट टिच डिप्लोमा अर्हतेवर आधारीत 30 प्रश्न राहतील. संगणक शिक्षक पदासाठी सामान्य ज्ञान 70 व संगणक अर्हतेवर 30 प्रश्न असणार आहे. परीक्षेचे प्रवेशपत्र उमेदवारांनी आवेदन पत्रात नमूद केलेल्या पत्त्यावर रजिष्टर पोस्टाने पाठविण्यात येणार आहे. ज्या उमेदवारांना 24 मे 2022 पर्यंत प्रवेशपत्र प्राप्त होणार नाहीत, त्यांनी प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, महसूल भवन इमारत, माहेश्वरी भवन जवळ, न्यु राधाकिसन प्लॉट, अकोला येथील कार्यालयातून 25 व 26 मे रोजी कार्यालयीन वेळेत प्राप्त करून घ्यावीत, असे आवाहन प्रकल्प अधिकारी यांनी केले आहे.

                                                                                                **********

No comments:

Post a Comment