Tuesday 17 May 2022

माजी सैनिक, शहीद जवान व सेवेत असलेल्या जवानांसाठी अमृत जवान अभियान

 माजी सैनिक, शहीद जवान व सेवेत असलेल्या जवानांसाठी अमृत जवान अभियान

  • 15 जुन 2022 पर्यंत राबविण्यात येणार अभियान

बुलडाणा,(जिमाका) दि. 17 : माजी सैनिक, त्यांचे कुटूंबिय आणि हुतात्मा जवानाच्या कुटूंबियांच्या विविध शासकीय कार्यालयातील प्रलंबित कामांचा निपटारा करण्यासाठी 15 जुन 2022 पर्यंत अमृत जवान अभियान 2022 राबविण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांनी सर्व कार्यालय प्रमुखांना आदेश पारीत करून अमृत जवान अभियान 2022 राबविण्याचा संकल्प हाती घेतला आहे. जवानांच्या समस्या अभियानामुळे मार्गी लागणार आहे. सैन्य कालावधीत देशाच्या सीमेवर सेवा करताना जवानांना गावाकडील वैयक्तिक आणि कौटुंबिक कामाकडे लक्ष देता येत नाही. परिणामी, कामे प्रलंबित राहतात. सैनिकाची सेवा आणि देशासाठीचे समर्पण लक्षात घेवून जिल्हाधिकारी, बुलडाणा यांनी अमृत जवान अभियान 15 जुन 2022 पर्यंत राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

   या अभियानात महसूल विभागाकडील प्रलंबित फेरफार, बिनशेती व बांधकाम परवानगी, भुसंपादन व पुनर्वसन संबंधी अडचणी, विविध प्रकारचे दाखले, रेशनकार्ड, पोलीस विभागाकडे विविध तक्रारी / समस्या समाज कंटाकांडून त्रास होत असल्याबाबत तक्रारी, जमीन / जमिनीच्या हद्दी, पाणी यावरून होणारे फौजदारी स्वरूपाचे वाद ग्रामविकास विभागाकडील विविध योजनांचा लाभ, ग्रामपंचायत स्तरावरील रहिवास विषयक विविध बाबी, कृषि विभागाकडील विविध योजनांचा लाभ देण्यासाठी प्रस्ताव सादर करणे, सहकार विभागाकडील कर्ज प्रकरणे, परिवहन विभागाकडील परवाने तसेच अन्य विभागांकडील अशा कामांसाठी विशेष मेळावे घेवून माजी सैनिक, शहीद जवान व सेवेत कार्यरत सैनिकांचे प्रश्न विशेष प्राधान्याने मार्गी लावण्यात येतील. या अभियानात प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी तहसील कार्यालयात अमृत जवान सन्मान दिन आयोजित करण्यात येणार आहे. या दिवशी लोकशाही दिनाच्या धर्तीवर संबंधित विभागप्रमुख व सैनिक अर्जदार यांच्या उपस्थितीत सर्व विषयांचा समक्ष आढावा घेण्यात येणार आहे. अभियानाच्या कालावधीत त्यांच्या प्रश्नांच्या निरसनासाठी विशेष मेळावेही घेण्यात येतील. अभियानासाठी तालुका व जिल्हा स्तरावर स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात येत आहे.  त्यामध्ये तालुका व जिल्हा स्तरावर सर्व खातेप्रमुख, सैनिक संघटना प्रतिनिधींचा समावेश असणार आहे.

   हे अभियान राबविण्याकरीता एक जबाबदार अधिकाऱ्यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येत आहे. प्रत्येक तहसिल कार्यालयात एक खिडकी कक्ष स्थापन करण्यात येत आहे. कक्षासाठी स्वतंत्र कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येत आहे. या कक्षात दररोज दुपारी 12 ते 3 या वेळेत विविध विभागांकडील तक्रार अर्ज स्वीकारण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त माजी सैनिकांनी तालुका व जिल्हा स्तरावर विविध प्रकारच्या समस्येचे निरसन करण्यासाठी अमृत जवान अभियान 2022 अंतर्गत लाभ घ्यावा, असे आवाहन सहा. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी भास्कर पडघान यांनी केले आहे.

***********

पाच गावांसाठी पिण्याचे पाण्याचे टँकर मंजूर

बुलडाणा, (जिमाका) दि. 17 : दे.राजा तालुक्यातील धोत्रा नंदई, चिखली तालुक्यातील धोडप व पळसखेड सपकाळ, बुलडाणा तालुक्यातील देव्हारी, मोताळा तालुक्यातील पोखरी गावांना पिण्याच्या पाण्यासाठी प्रत्येकी एक टँकर मंजूर करण्यात आले आहे. धोत्रा नंदई येथील लोकसंख्या 2557 असून येथे दररोज 5 लक्ष 3 हजार 150 लीटर्स पाण्याचा पुरवठा करण्यात येणार आहे. धोडप येथील लोकसंख्या 2300 आहे. येथे दररोज 50 हजार लीटर्स पाणी पुरविण्यात येणार आहे. तसेच पळसखेड सपकाळ येथील लोकसंख्या 450 असून येथे दररोज 10 हजार 750 लीटर्स पाण्याचा पुरवठा होणार आहे. देव्हारी येथील लोकसंख्या 690 आहे. येथे दररोज 35 हजार 580 लीटर पाणी पुरविण्यात येईल. तर पोखरी येथील 750 लोकसंख्येकरीता 24 हजार 720 लीटर्स पाणी पुरविण्यात येणार आहे. पाणी टंचाई निकषानुसार सदर गावास पशुधनासह लागणारे पाणी, अस्तित्वातील सर्व पाणी पुरवठ्याची साधने / स्त्रोतांद्वारे मिळणारे पाणी या बाबी लक्षात घेवून टँकर पाण्याच्या खेपा टाकणार आहे. टँकरने केलेल्या खेपांची नोंद ग्रामपंचायतीने घ्यावी, असे उपविभागीय अधिकारी, मलकापूर, बुलडाणा व सिं. राजा यांनी कळविले आहे.

********

वसंतराव नाईक विजाभज महामंडळामार्फत व्याज परतावा योजनेची अंमलबजावणी

  • वैयक्तिक कर्ज व गट कर्ज योजना व्याज परतावा योजनेचा समावेश

बुलडाणा, (जिमाका) दि. 17 : वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळामार्फत विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गाच्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लाभार्थ्यांसाठी विविध योजना राबविण्यात येतात.  यामध्ये वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना व गट कर्ज व्याज परतावा योजनांचा समावेश आहे. या योजनांसंदर्भात माहिती महामंडळाच्या vjnt.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच बिज भांडवल कर्ज योजना, थेट कर्ज योजना ही ऑफलाईन असून योजनेचे अर्ज विक्रीसाठी महामंडळाच्या जिल्हा कार्यालयात उपलब्ध आहे. अर्जाची किंमत 10 रूपये आहे. थेट कर्ज योजनेच्या अर्जासाठी आधार कार्ड, जातीचा दाखला व राशन कार्ड सोबत ठेवणे अनिवार्य आहे. तसेच ज्या अर्जदाराने व्यवसाया संबंधीत प्रशिक्षण प्राप्त केले आहे. त्यांना व विधवा, निराधार महिलांना प्राधान्य देण्यात येणार आहे. पात्र इच्छूकांनी जिल्हा व्यवस्थापक, जिल्हा कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, बुलडाणा येथे संपर्क करावा. कर्ज मागणीचे अर्ज केवळ अर्जदारालाच विक्री करण्यात येणार असून त्यांच्याकडूनच स्वीकारण्यात येणार आहे. मध्यस्थामार्फत अर्जाची विक्री होणार नाही. तसेच स्वीकारल्याही जाणार नाही. तसेच अधिक माहितीसाठी 07262-295319 क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक एच.जी आत्राम यांनी केले आहे.

                                                                                ********

 

No comments:

Post a Comment